तब्बल ८ वर्षांनंतर 'तो' माथेफिरू गजाआड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर २०११ मध्ये हल्ला केलेल्या माथेफिरू तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ८ वर्षांनंतर हा माथेफिरु तरुण पोलिसांना सापडला. अरविंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथून बाहेर निघताना अरविंदरने अचानक हल्ला केला होता. त्यावेळी अरविंदरने शरद पवार यांच्या श्रीमुखात लगावली होती. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रसुद्धा उपसले होते.
या घटनेनंतर अरविंदर फरार झाला होता. २०१४ मध्ये दिल्ली न्यायालयाने अरविंदरला गुन्हेगार घोषित केलं होतं. आता अरविंदरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अरविंदर सिंग दिल्लीत ट्रान्सपोर्टर म्हणून काम करत होता. वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराने वैतागून योजना करून कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करायला आलो होतो, अशी कबुली अरविंदरने दिली आहे.