1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2023 (07:31 IST)

मोदींकडून INDIAची तुलना इंडियन मुजाहीदिनशी, ‘मोदींनी पळ काढू नये’ विरोधकांचं प्रत्युत्तर

narendra modi
विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया' या नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टिपण्णीवर काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.मंगळवारी झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह 26 विरोधी पक्षांच्या 'इंडिया'आघाडीवर निशाणा साधलाय.
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील भाजप खासदारांच्या बैठकीनंतर भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की,"पंतप्रधान मोदी बोलले की, इंडियन नॅशनल काँग्रेस इंग्रजांनी स्थापन केलीय. इस्ट इंडिया कंपनीही इंग्रजांनी स्थापन केली होती. आजकाल लोक इंडियन मुजाहीदिन हे नाव देखील ठेवतात. इंडियन पीपल्स फ्रंटही नाव ठेवतात."
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिशाहीन असल्याचं म्हणत असे लोक देशाच्या नावाचा वापर करून जनतेची दिशाभूल करू शकत नाहीत,असं म्हटलंय
 
भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेची माहिती देताना सांगितलं की, "जगाला माहिती आहे की पंतप्रधान मोदी यांनी नवी अशा निर्माण केलीय. विरोधकांनाही हे समजलंय, पण तरीही पुन्हा पुन्हा विरोध करत आहेत. त्यांनी एकप्रकारे मान्य केलंय की, या पुढे आपण सत्तेत येणार नाहीत."
 
पंतप्रधान दिशाहीन झाले आहेत - खरगे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की,"आम्ही जळत असलेल्या मणिपूरबद्दल बोलत आहोत. पण पंतप्रधान मोदी इस्ट इंडिया (कंपनी) बद्दल बोलत आहेत आणि भारताचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनी असं सांगत आहेत."
 
यांनतर त्यांनी ट्वीट केलं "तुम्हाला North East वर Act EAST Policy दिसत नाहीय. पण तुम्हाला EAST India Company दिसत आहे. या INDIAनेचं इंग्रजांच्या East India Company चा पराभव केला होता. आणि Indian Mujahideen लाही पराभूत केलं होतं."
 
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणतात, "मणिपूरमध्ये होत असलेल्या भीषण हिंसाचारावर तुम्ही संसदेत निवेदन कधी करणार? मणिपूरच्या जखमा भरून तिथे शांतता कधी प्रस्थापित होणार? विरोधक देशाला दिशा देत आहेत. खुद्द पंतप्रधान दिशाहीन झाले आहेत."
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या 'इंडिया' आघाडीवर केलेल्या टीकेला उत्तर देत म्हटलंय, "पंतप्रधान मोदी तुम्ही कोणत्याही नावानं आम्हाला बोला, पण आम्ही India आहोत."
 
राहुल गांधी यांनी ट्वीट केलं की, "आम्ही मणिपूरच्या जखमा भरून काढण्यात मदत करू,आम्ही मणिपूरच्या महिला आणि लहान मुलांचे अश्रू पुसू. आम्ही मणिपूरच्या लोकांमध्ये प्रेम आणि शांतता परत आणू आणि मणिपूरमध्ये भारताचे विचार पुन्हा रुजवू."
 
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, "पंतप्रधानांना 26 पक्षांच्या भारतामुळं खूप त्रास झाल्याचं स्पष्ट झालंय."
 
ते सांगतात "पंतप्रधान मोदींचं विधान म्हणजे मृत एनडीएला नवीन जीवन देण्याचा प्रयत्न आहे. तर मोदींनी आज केलेल्या वक्तव्याद्वारे त्याला एक नवीन नाव दिल आहे ते म्हणजे राष्ट्रीय बदनामी आघाडी (राष्ट्रीय मानहानि गठबंधन) होय." जेव्हा मोदींना कोंडीत पकडलं जातं, तेव्हा ते त्याचं धोरणाचा अवलंब करतात-नकार देणे, दिशाभूल करणे आणि बदनामी करणे."
 
'इंडिया'मुळं पंतप्रधान मोदी घाबरले आहेत -शिवानंद तिवारी
काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत ट्विटरवर म्हणाल्या, "विरोधी नेत्यांना बोलताना पंतप्रधान मोदींनी 'इंडिया'ला ही बरं-वाईट म्हणायला सुरुवात केलीय."
 
पंतप्रधान मोदींच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्या म्हणाल्या,"एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही तुमच्या टुकार ट्रोल आर्मीला सूचना देतात. विरोधक दिशाभूल करत नाहीयत. तर तुम्हाला नैतिक दिवाळखोरीनं ग्रासलंय." त्यापुढे म्हणतात, "तुमची नुसती बडबड थांबवा. हिमंत दाखवा आणि मणिपूरवर बोला."
 
आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, "‘इंडिया'मुळं पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. त्यामुळं स्वतःला कसं सावरायचं ,कसा सामना करायचा. त्यांची बत्ती गुल झालीय. म्हणूनच 'इंडिया'मध्ये त्यांना कधी इस्ट इंडिया कंपनी दिसतेयं तर कधी इंडियन मुजाहिद्दीन."
 
ते पुढे म्हणतात की, "मोदीजींची मानसिक स्थिती हे सिद्ध करते की,'इंडिया' आघाडीचा मोदीजींवर हा पहिला विजय आहे. प्रवचनाच्या रूपात प्रत्येक विषयात ज्ञान देणाऱ्या मोदीजींच्या ज्ञानाचा दिवा इंडिया आघाडीमुळं विझण्याच्या तयारीत आहे."
 
पंतप्रधानांनी संसदेत येऊन उत्तर द्यावं, पळून जाऊ नये: तृणमूल काँग्रेस
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी ट्वीट केले आहे. "सशक्त विरोधी पक्षांची भीती लपवण्याच्या प्रयत्नात त्यांनी 'इंडिया'ची तुलना एका अतिरेकी संघटनेशी केली आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. I.N.D.I.A नं मणिपूरबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची मोदींनी संसदेत येऊन उत्तरं द्यावीत, पळ काढू नये."
 
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "हे अत्यंत दुःखद आहे की, पंतप्रधान आपला देश इंडियाची तुलना एका अतिरेकी संघटनेशी करत आहेत."
 
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना पंतप्रधान मोदींबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, "मी पंतप्रधानांवर भाष्य करणार नाही, ते या देशाचे पंतप्रधान आहेत, मी त्यांच्या खुर्चीचा आदर करते."
 
मणिपूरबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधानांनी सभागृहात येऊन बोलावं, अशी मागणी विरोधी पक्ष सातत्यानं करत आहेत. या मुद्द्यावर दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहे.
 
सभागृहात पंतप्रधानांनी मणिपूरबाबत बोलावं, अशी मागणी करत असताना झालेल्या गदारोळ प्रकरणी राज्यसभा खासदार संजय सिंह याना निलंबित करण्यात आलं आहे.
 
पंतप्रधानांनी मणिपूरवर संसदेत निवेदन देण्याच्या मागणीवर भाजप नेत्या स्मृती इराणी म्हणाल्या की, "विरोधी पक्ष स्वतः मणिपूर हिंसाचारावर चर्चा करू इच्छित नाहीत. कारण मग त्यांना राजस्थान आणि पश्चिम बंगाल मधील महिलांवरील हिंसाचारावरही बोलावं लागेल."
 
मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये अडीच महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या हिंसक संघर्षांदरम्यान दोन महिलांचे व्हीडिओ वायरल झाले होते. वायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये या महिलांना नग्नावस्थेत परेड करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधानांनी संसदेत येऊन मणिपूरवर बोलावं,अशी मागणी विरोधी पक्ष सातत्यानं करत आहेत.



 
Published By- Priya Dixit