सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (15:53 IST)

मोदींची लोकप्रियता घटली, राहुल गांधी यांच्याबद्दल जाणून घ्या

गेल्या दीड वर्षापासून जगात तसेच देशात कोरोना महामारीमुळं संकट उभं असताना आरोग्य व्यवस्था डगमगली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटीत अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या विविध घटनांमध्ये एका इंग्लिश चॅनेलनं घेतलेल्या सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं जात आहे.
 
इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलच्या सर्व्हेतून हे चित्र समोर आलं आहे. या सर्व्हेत विचारण्यात आलं होतं की- भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा? यावर ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली. तर जानेवारी २०२१ मध्ये याच प्रश्नाला ३८ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती. तर मागील ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांची पसंती मिळाली होती. 
 
याप्रमाणे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली आहे तर भाजपाशी संबंधित दोन बड्या नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सर्व्हेप्रमाणे, ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला ११ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा १० टक्के इतका होता. ऑगस्ट २०२० मध्ये केवळ ३ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती. 
 
तर ऑगस्ट २०२१ मध्ये ७ टक्के लोकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ८ टक्के तर ऑगस्टमध्ये केवळ ४ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी अमित शहांच्या नावाला पसंती दर्शवली होती. 
 
राहुल गांधी यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये १० टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये ८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाला ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली होती. 
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट २०२० केवळ २ टक्के लोकांनी तर जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा दुप्पट होऊन ४ टक्के झाला तर ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली. 
 
या सर्वेक्षणनात प्रियंका गांधी यांच्या लोकप्रियतेत किंचित वाढ झालेली दिसून येत आहे. तर सोनिया गांधी यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २ टक्के लोकांनी प्रियंका गांधींच्या नावाला पसंती दर्शवली तर ऑगस्ट २०२१ मध्ये ४ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 
 
Mood of the Nation August 2021 हा सर्व्हे १० जुलै ते २० जुलै यादरम्यान करण्यात आला आहे. या पोलमध्ये देशातील १९ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघ आणि २३० विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.