गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (19:02 IST)

कोरोनाः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट- सर्वेक्षण

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शक्तिशाली नेता या प्रतिमेवर झाला आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यात आलेल्या अपयशाने मोदी यांच्या ताकदवान नेता या गुणांकनात घट झाली असल्याचं दोन सर्वेक्षणांतून स्पष्ट झालं आहे.
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार 2014 मध्ये दणदणीत बहुमतासह सत्तेत आलं. 2019मध्येही मोदींच्या करिष्म्याने जादू केली आणि त्यांचंच सरकार पुन्हा निवडून आलं. या दोन विजयांमुळे देशातील सगळ्यात मोठे नेते अशी मोदींची प्रतिमा तयार झाली.
 
मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने 25 दशलक्षचा आकडा ओलांडला आहे. या लाटेला सामोरं जाण्यासाठी मोदी सरकारने पुरेशी तयारी केली नव्हती हे स्पष्ट झालं. यामुळे मोदी समर्थकांमध्ये घट होऊ लागली आहे असं अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग मॉर्निंग कन्सल्टने म्हटलं आहे. ही कंपनी जागतिक नेत्यांसंदर्भात घडामोडींचा अभ्यास करत असते.
मोदींचं गुणांकन या आठवड्यात 63 टक्के एवढं आहे. ऑगस्ट 2019 पासून अमेरिकेची ही कंपनी मोदींच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या पाठीराख्यांचा अभ्यास करते आहे. एप्रिल महिन्यात मोदींच्या गुणांकनात 22 गुणांनी एवढी मोठी घट झाली.
भारताच्या सी व्होटर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातही हीच बाब उघड झाली आहे. मोदींच्या कामगिरीवर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांमध्ये घट झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
 
गेल्या वर्षी मोदींच्या प्रदर्शनावर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांची संख्या 65 टक्के होती. ती आता 37 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच, सात वर्षात मोदी सरकारप्रती नाराजी असणाऱ्यांची संख्या मोदी सरकारची भलामण करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.
 
पंतप्रधानांच्या राजकीय कारकीर्दीतलं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असं सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.
 
कोरोनाचा संसर्ग शहरांच्या बरोबरीने ग्रामीण भागात पसरू लागला आहे तसतसं पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट होऊ लागली आहे. शहरांमध्ये नागरिकांना ऑक्सिजन, बेड्स, औषधं यांच्यासाठी वणवण करावी लागते आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पार्थिवांची रांग लागल्याचं चित्र आहे. सरकारची साथ नसल्याने असहाय्य नागरिक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
 
दिल्ली आणि मुंबई या मोठ्या शहरांना कोरोनाने घातलेला विळखा हळूहळू सैल होऊ लागला आहे. मात्र आता हा व्हायरस ग्रामीण भागात वेगाने पसरतो आहे. या भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही.
 
देशातल्या लोकांना हे उमगून चुकलं आहे की त्यांना त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांचीच साथ आहे. सरकार मदतीला येणार नाही असं काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी सांगितलं.
 
कोव्हिडविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने बाजूला राहिलं आहे असं ते म्हणाले. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मोदी सरकारने म्हटलं आहे. शतकात एकदाच येणारी अशी ही संसर्गाची साथ आहे असं मोदी सरकारने म्हटलं आहे.
 
कोरोनाला रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या मुद्यावर सरकारला घेरता न आल्याने मोदींच्या गुणांकनात घट झाली असली तरी तेच अजूनही देशातील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत असं सी व्होटर सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.
2024 पर्यंत पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय निवडणुकांना सामोरं जायचं नाहीये.