गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (15:56 IST)

कोरोनाः वाफ घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही?

साईराम जयरामन
गेल्या वर्षभरापासून कोरोना संपूर्ण जगभरात पसरल्याचं आपल्याला दिसतं. अनेक देशांमध्ये कोरोनाची लस, औषधं, घरगुती उपचार यावर चर्चा सुरू आहे.
 
या उपचारांमध्ये लिंबू, काळी मिरी सारख्या वस्तूंची चर्चा करण्यात येते. मात्र कोरोनाबाबत केले जाणारे दावे वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरले नाहीत.
 
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी वाफ घ्यावी असंही अनेक ठिकाणी सुचवलं जातं, तसंच कोरोनाच्या विषाणूवर या वाफेचा परिणाम होतो असा दावा काही लोकांनी केला आहे. हा दावा खरंच उपयोगी आहे का याची चर्चा येथे करणार आहोत.
तामिळनाडूमध्ये भाजपाच्या आमदार वनती श्रीनिवासन यांनी कोइमतूरमध्ये वाफ घेण्यासाठी केंद्राची स्थापना केली तसेच एक चालतं फिरतं वाफ केंद्रही सुरू केलं. रेल्वे संरक्षण दलानंही चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर असं केंद्र प्रवाशांसाठी सुरू केलंय.
 
मात्र तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमणियन यांनी वाफ घेण्याची पद्धत गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वापरू नये, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
"काही लोक सार्वजनिक ठिकाणी वाफ घेत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले आहेत. डॉक्टरांच्या मते त्यामुळे फुप्फुसाला इजा होऊ शकते. लोकांनी अशा कोणत्याही मार्गाचा वापर करू नये. असं केल्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीद्वारे 400 जणांना संसर्ग होऊ शकतो", असं मत सुब्रमणियन यांनी व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "जर संसर्ग झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाफ घेतली तर त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच त्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे."
 
मात्र तामिळनाडूमधील मंत्र्यांमध्ये याबाबत वेगवेगळी मतं असल्याचं दिसून येतं.
 
तामिळनाडूतील माध्यमांच्या संपादकांबरोबर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दोन दिवसांपूर्वी एक बैठक घेतली. त्यात टेलिव्हिजन कार्यक्रमांमधून 'स्टीमर वापरा, कोरोना पळवा' अशा घोषणांचा प्रसार करण्यास सुचवले अशी टीका काही वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियातून झाली.
 
वाफ घेण्यानं खरंच फायदा होतो का?
वाफ घेण्यामुळे खरंच कोरोना विरोधात लढण्यासाठी फायदा होतो का? हा प्रश्न बीबीसी तमिळने पल्मोनोलॉजिस्ट शबरीनाथ रवीचंद्रन यांना विचारला.
 
ते म्हणाले, "वाफ किंवा औषधी वाफ घेतल्यामुळे कोरोना विषाणू मरतो ही पसरवली जाणारी बातमी पूर्णतः चुकीची आहे."
वाफ घेतल्यामुळे मग नक्की काय फायदा होतो असं विचारताच ते म्हणाले की, वाफ घेण्याचा फायदा होतो. पण त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्तीने कोरोना नसलेल्या लोकांजवळ वाफ घेतल्यास इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीने एखाद्या बंद खोलीत जाऊन एकट्याने वाफ घ्यावी.
 
वाफ घेण्याने काही तोटा होतो का? तसेच साधी सर्दी झालेली असताना वाफ कशी घ्यावी या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. शबरीनाथ म्हणाले, "वाफेमुळे सर्दीची तीव्रता थोडी कमी होते. मात्र अधिक प्रमाणात वाफ घेतल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जर एका दिवसात दोनपेक्षा जास्तवेळा वाफ घेतली तर नाकामध्ये दाह होतो तसेच श्वसनमार्गाला सूजही येऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही पाण्यात बाम किंवा निलगिरी तेल न घालता वाफ घेतली पाहिजे."
 
अभ्यास आणि निरीक्षणं काय सांगतात?
अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन तसेच जागतिक आरोग्य संघटनेने वाफेला कोरोनावरील उपचार म्हणून घोषित केलेले नाही, असं रॉयटर्सही वृत्तसंस्था सांगते.
 
स्पॅनिश चिल्ड्रन मेडिकल असोसिएशनने कोरोना विषाणूविरोधात वाफेचा उपचार म्हणून वापर करणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
 
कोरोनाः वाफ घेतल्यामुळे कोरोना जातो का?
फोटो स्रोत,GETTY IMAGES
साधी सर्दी किंवा श्वसनासंदर्भातील आजारांवर वाफ घेणं एक उपचार समजला जातो, त्या उपचाराचा कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपयोग झाल्याचं कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, असं 'लॅन्सेट' या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियतकालिकानं म्हटलं आहे.
 
गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या विविध शोध निबंधांतील माहितीनुसार, 'वाफेमुळे कफ सुटतो, सूज कमी होते आणि विषाणूचा प्रसार कमी होतो याला अद्याप पुरेसा पुरावा मिळालेला नाही.'
 
त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध न झालेल्या कोणत्याही गोष्टींचा प्रसार सरकारतर्फे केला जाऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. लोकांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा साथीच्या काळात माहितीवर विश्वास ठेवून स्वतःच उपचार सुरू करू नयेत असंही हे तज्ज्ञ सांगतात.