शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (08:00 IST)

मुलांना बाहेर शिकायला पाठवायला भीती वाटेल', दिल्लीतल्या UPSC क्लासमध्ये प्राण गमावलेल्या मुलीच्या पालकांचा शोक

Tanya soni
FB/TANYASON
दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील राव आयएएस अॅकेडमीच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यात बिहारच्या औरंगाबादमधील तान्या सोनीचा समावेश आहे.
सोमवारी दुपारी (30 जुलै) तिचा मृतदेह तिच्या मूळगावी पोहोचला तेव्हा कुटुंबीयच नाही तर शेजारच्या लोकांच्या डोळ्यांत पाणी होतं. संपूर्ण परिसरावरच शोककळा पसरली होती.
 
तान्याचे आजोबा गोपाल प्रसाद बाबू त्यांच्या घराबाहेर असलेल्या लाल भिंतीशी बसून एकटे ओक्साबोक्शी रडत होते.
ते सारखे हुंदके देत होते, काहीतरी पुटपुटत होते.
 
शांत आणि नम्र स्वभावाची तान्या
तान्या बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नबीनगर गावातील मशीद गल्लीत राहायची. तिचे वडील विजय सोनी तेलंगणामध्ये खनिकर्म विभागात इंजिनिअर आहेत. आई बबिता सोनी मूळची झारखंडच्या गढवा गावातली आहे आणि ती गृहिणी आहे.
 
हे कुटुंब तेलंगणाला कसं पोहोचलं याबबात तान्याचे काका अजय सोनी सांगतात, “तान्याचे वडील आम्हा भावंडांमध्ये सर्वांत लहान आहेत. ते 1995-96 च्या सुमारासच तेलंगणाला गेले होते.
 
“तान्या शांत स्वभावाची मुलगी होती. बोलायलाही अतिशय गोड होती. अभ्यासात ती सुरुवातीपासूनच चांगली होती. अंदाजे दोन वर्षांपूर्वी घरी आली होती तेव्हा तिची जिद्द पाहून वाटलं होतं की ही नक्की आयएएस होणार.”
"विजय आणि बबिता सोनी यांना तीन मुलं आहेत. तान्या सर्वांत मोठी आहे. तान्याची छोटी बहीण पलक उत्तर प्रदेशातील प्रयागराजहून इंजिनिअरिंग करत आहे आणि भाऊ आदित्य हैदराबादमध्येच शिकतोय,” असं अजय सोनी यांनी सांगितलं.
 
या महिन्यातच साजरा केला होता 21 वा वाढदिवस
तान्याचं प्राथमिक शिक्षण सिकंदराबादमध्येच झालं. पदवीसाठी ती 2021 मध्ये दिल्लीला गेली होती. तिने दिल्ली विद्यापीठातील महाराजा अग्रसेन कॉलेजमधून शिक्षण घेतलं. याच वर्षी तिने युपीएससीच्या परीक्षेसाठी राव कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता.
 
ऋषभ आणि तान्या कॉलेजपासून मित्र आहेत. तो तान्याचं पार्थिव घेऊन दिल्लीहून औरंगाबादला आला आहे.
 
बीबीसीसाठी स्थानिक पत्रकार म्हणून काम करणाऱ्या दीनानाथ मौआर यांच्याशी बोलताना तो दिल्ली महारपालिका, कोचिंग क्लासेसचे संचालक, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचं प्रशासन आणि पोलिसांप्रति नाराजी व्यक्त करतो.
तो म्हणतो, “आमचा अजून एक मित्र पाण्यात अडकला होता. तो बाहेर निघाला आणि आम्हाला फोन केला आणि पुन्हा बेशुद्ध झाला. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा त्यांचं वर्तन बेफिकीर होतं. मृतदेहांवर नावं सुद्धा चुकीची टाकली होती. शवागारात मृतदेह नेण्यासाठी ते आम्हाला मदत मागत होते. आम्ही स्वत:लाच शवागारात सोडायला जातोय असं वाटत होतं.”
 
तान्याच्या मृत्यूच्या दहा दिवस आधीच तिचा 21वा वाढदिवस झाला होता.
 
तान्याच्या मावशीचे पती सुनील कुमार सांगतात, “ती एक स्वतंत्र बाण्याची मुलगी होती. ती तिची सगळी कामं स्वत: करायची. क्लासेस पासून ते घर शोधण्यापर्यंत तिला कुणाचीच गरज भासली नाही.”
 
‘मुलांना बाहेर पाठवायला आता भीती वाटते’
तान्याच्या मृत्यूनंतर तिची आई बबिता शुद्ध हरपून बसली आहे. वडील विजय सोनी त्यांच्या आप्तेष्टांच्या गळ्यात पडून रडत आहेत.
 
काका अजय सोनी यांचं याच भागात दागिन्यांचं दुकान आहे. ते म्हणतात, “आमच्या घरातली मुलगी गेली. क्लासेसवाल्यांनी अशा ठिकाणी क्लास घ्यायला नको होता. हा आमच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आता आम्हाला मुलांना बाहेर शिकायला पाठवायला भीती वाटेल. सरकारने या प्रकरणात योग्य कारवाई करायला हवी.”
 
या घटनेचा स्थानिक लोकांनाही प्रचंड धक्का बसला आहे. तान्याचे आजोबा गोपाल प्रसाद या भागात गोपाल बाबू या नावाने ओळखले जातात.त्यांच्या ओळखीचे गुलाम मोहम्मद सांगतात, “सरकारला या प्रकरणी कारवाई करायला हवी. क्लासेस चालवणाऱ्यांची योग्य चौकशी व्हायला हवी. ही नबीनगरवासियांसाठी अतिशय दु:खद घटना आहे.”
तान्यासह तीन मुलांच्या मृत्यूमुळे क्लासेसच्या पायाभूत सोयीसुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. क्लासेसमध्ये एकावेळी शिकणारे हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
 
दरम्यान पटना जिल्हा प्रशासनाने पटना जिल्ह्यात सुरू असलेल्या 20 हजार क्लासेसच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
सहा सदस्यीय चौकशी समितीला दोन आठवड्यात चौकशी अहवाल द्यायचा आहे. त्यात क्लासेस चालवताना असलेली सुरक्षा मानकं, इमारतींचे नियम, फायर एक्झिट, आत बाहेर जाण्याची व्यवस्था, आपात्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींची चौकशी होणार आहे.
 
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील राजेंद्र नगर भागात एका क्लासच्या इमारतीत पाणी भरल्यामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
या क्लासेसमध्ये नागरी सेवा परीक्षा देणारे विद्यार्थी मार्गदर्शन घेत असत. इमारतीत अचानक पुरासारखं पाणी भरलं, तेव्हा तळघरात काही विद्यार्थी होते.
 
या इमारतीत शनिवारी संध्याकाळी पावसानंतर सात वाजता पाणी भरलं. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि एनडीआरफच्या टीमने अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांना बाहेर काढणं सुरू केलं.
 
त्यानंतर नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या परिसरात पाऊस आल्यावर लगेच पाणी साठत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या घटनेनंतर क्लासेसला टाळं लावण्यात आलं आहे.
Published By- Priya Dixit