शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (10:40 IST)

मुख्तार अन्सारी: भाजप आमदारावर 500 गोळ्या झाडणारा गँगस्टर, शिक्षा भोगत असतानाच मृत्यू

गुरुवारी (28 मार्च) संध्याकाळी उत्तरप्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बांदा तुरुंग प्रशासनाने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची माहिती दिली. बांदा जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीला गुरुवारी संध्याकाळी राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. मेडिकल बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “तुरुंगाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 63 वर्षीय मुख्तार अन्सारी यांना रात्री 8.45 वाजता वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल केलं. त्यांना उलट्या होत होत्या आणि दवाखान्यात आले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते." बुलेटिनमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, अन्सारीला दवाखान्यात आणल्यानंतर नऊ डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ उपचार सुरु केले होते पण 'कार्डियाक अरेस्ट'(हृदयविकाराचा झटका)मुळे रुग्णाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी तब्येत बिघडल्याने अन्सारीला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं आणि आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी अन्सारी यांची तब्येत खालावल्याची बातमी आली, तेव्हापासूनच गाझीपूर येथील त्याच्या घराच्या परिसरात लोक जमा होऊ लागले होते.अन्सारीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर उत्तर प्रदेशात संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच अन्सारी ज्या मऊ जिल्ह्यातील होता तिथे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केलीय. अन्सारीच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अलीगढ, फिरोजाबाद, प्रयागराज, कासगंजसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी निमलष्करी दलांसोबत फ्लॅग मार्च काढला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी काल रात्रीच एक उच्चस्तरीय बैठकही घेतली.
 
जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं
गेल्या वर्षी मुख्तार अन्सारी यांचा मुलगा उमर अन्सारी याने त्याच्या वडिलांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असं म्हटलं होतं की, अन्सारी यांना त्यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती आणि बांदा तुरुंगात त्यांच्या हत्येचा कट रचला जात होता. मुख्तार अन्सारीला खंडणीच्या प्रकरणात 2019 पासून पंजाबच्या रुपनगर तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांनी 2021 ला त्याला बांदा तुरुंगात आणलं आणि तेव्हापासून तो तिथेच तुरुंगवास भोगत होता. काँग्रेसने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले आहे, काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच मुख्तार अन्सारीने त्याला विष (स्लो पॉयझन) दिलं जात असल्याचा आरोप केला होता आणि आज प्रशासन असं म्हणतंय की त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निरीक्षणात याचा तपास केला गेला पाहिजे जेणेकरून लोकांना तुरुंगात नेमकं काय घडतंय हे कळू शकेल." समाजवादी पक्षानेही मुख्तार अन्सारीच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अमीक जामेई यांनी या मृत्यूचा सविस्तर तपास करण्याची मागणी केली आहे. बीबीसीचे पत्रकार अनंत झणाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच त्याचा भाऊ अफझल अन्सारी, मुलगा उमर आणि इतर काही नातेवाईक बांदाकडे निघाले होते. गुरुवारी 28 मार्चच्या रात्रीच अन्सारीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. त्यानंतर गाजीपूर येथील घरात त्याचं पार्थिव नेण्यात येणार आहे.
 
खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत होता
माफिया ते राजकीय नेता बनलेला मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या मऊमधून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आला होता. मागच्या वर्षी भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्या प्रकरणात अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गाझीपूरचे खासदार आणि अन्सारीचे भाऊ अफझल अन्सारी यांनाही याचप्रकारणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्हेगारी इतिहासानुसार, मुख्तार अन्सारीविरुद्ध एकूण 65 गुन्हे दाखल आहेत. 1996 मध्ये मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि कोळसा व्यापारी नंदकिशोर रुंगटा यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2005ला भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या झाल्यानंतर अन्सारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
इतरही दोन प्रकरणात शिक्षा झाली होती
मागच्या काही वर्षांपासून अन्सारी कुटुंब चर्चेत आहे. अन्सारीच्या मऊमधील अनेक कथित बेकायदेशीर मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. मुख्तार अन्सारीला सप्टेंबर 2022मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2003 ला तुरुंग अधिकाऱ्याला धमकावल्याचं हे प्रकरण होतं. काही दिवसांनंतर, 1999 च्या एका खटल्यात, उत्तर प्रदेशच्या गँगस्टर कायद्यांतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. मुख्तार अन्सारीची पत्नी अफसा अन्सारी आणि मुलगा अब्बास अन्सारी यांना जुलै 2022मध्ये फरार घोषित करण्यात आलं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये लखनौ विकास प्राधिकरणाने अफझल अन्सारीचे घर पाडलं. हे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप होता.
विविध गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये अन्सारीवर एकूण 65 खटले प्रलंबित होते. त्याच्याविरुद्ध मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) आणि गँगस्टर कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यापैकी काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांचा कमकुवत युक्तिवाद, साक्षीदारांनी त्यांचा जबाब बदलणे आणि पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती पण काही प्रकरणांचा निकाल लागला आणि त्याला शिक्षा ठोठावण्यात आली.
 
कृष्णानंद राय हत्या प्रकरण, 500 गोळ्या झाडल्या
1985 पासून अन्सारी कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या गाझीपूरच्या मोहम्मदबाद विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कृष्णानंद राय यांनी 2002 मध्ये विजय मिळवला. तब्बल 17 वर्षांनी एखाद्या उमेदवाराने मोहम्मदाबादमध्ये अन्सारी कुटुंबाचा पराभव केला होता. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तीन वर्षांनी कृष्णानंद राय यांची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल परिसरात कृष्णानंद राय यांच्या हत्येने खळबळ माजली होती. त्यावेळी या हत्येचं वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार पवन सिंग म्हणतात की, "एका कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते (राय) परतत होते. त्याचवेळी त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीला चारी बाजुंनी घेरण्यात आलं आणि त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. हा हल्ला करण्यासाठी अशी जागा निवडण्यात आली होती जिथून राय यांची गाडी डावीकडे किंवा उजवीकडे वळवणं अशक्य होतं. त्या गाडीत आमदार कृष्णानंद राय यांच्यासह इतर सहा जण होते. एके-47मधून तब्बल 500 गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता." हे प्रकरण माहीत असणाऱ्यांना असं वाटतं की गाझीपूरमधल्या पारंपरिक जागेवर पराभव झाल्याने अन्सारी नाराज होता. हत्या झाली त्यावेळी अन्सारी तुरुंगात होता तरीही त्या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पवन सिंग म्हणतात की, "या हत्येनंतर गाझीपूरचे खासदार आणि सध्या मंत्री असलेल्या मनोज सिन्हा यांचं राजकारण उदयास आलं. या प्रकरणात मनोज सिन्हा यांनी अन्सारीविरोधात साक्ष दिली होती. कृष्णानंद राय हे भूमिहार होते. त्यांची हत्या झाल्यानंतर त्याच समाजाचे मनोज सिन्हा यांनी 'राय यांच्या हत्येविरोधात निर्भयपणे लढणारा एकमेव नेता' अशी प्रतिमा तयार करून लोकांना मतं मागितली आणि बऱ्याच निवडणुकांमध्ये विजय मिळवला."
 
अन्सारीचे एक आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते तर एक युद्धात शहीद झाले होते
2019 मध्ये बीबीसीवर प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींना पाठिंबा देणारे नेते म्हणून मुख्तार अन्सारीच्या आजोबांना ओळखलं जात होतं. अन्सारीचे आजोबा डॉ. मुख्तार अहमद अन्सारी हे 1926-27याकाळात तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते. मुख्तार अन्सारींच्या आईचे वडील म्हणजेच ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांना 1947 च्या युद्धात शहीद झाल्याबद्दल महावीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं. मुख्तारचे वडील सुभानुल्लाह अन्सारी, यांची गाझीपूरमध्ये स्वच्छ प्रतिमा होती आणि ते कम्युनिस्ट पार्श्वभूमीतून आले होते, ते स्थानिक राजकारणात सक्रिय होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे मुख्तार अन्सारीचे काका आहेत. मुख्तारचा मोठा भाऊ अफजल अन्सारी हे सलग पाच वेळा (1985 ते 1996) गाझीपूरच्या मोहम्मदाबाद विधानसभेतून आमदार राहिले आहेत. 2004 मध्ये त्यांनी गाझीपूरमधून खासदारकीची निवडणूकही जिंकली होती. मुख्तारचा दुसरा भाऊ सिबकतुल्ला अन्सारी हे देखील 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत मोहम्मदाबादमधून आमदार राहिले आहेत. 1996 मध्ये बसपाच्या तिकिटावर विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलेले मुख्तार 2002, 2007, 2012 आणि पुन्हा 2017 मध्ये मऊ येथून विजयी झाले. देशातील वेगवेगळ्या तुरुंगात असताना त्यांनी मागच्या तीन निवडणूका लढवल्या होत्या. मुख्तार अन्सारी यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा अब्बास अन्सारी यांनी 2017 च्या निवडणुकीत मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर पहिली निवडणूक लढवली होती आणि 7 हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. मुख्तार अन्सारी यांचा भाऊ अफजल अन्सारी यांनी कम्युनिस्ट पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले, त्यानंतर त्यांनी 'कौमी एकता दल' या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 2017 मध्ये बसपमध्ये प्रवेश केला. मुख्तार यांनी बसपामधून सुरुवात केल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्यानंतर 2012 मध्ये कौमी एकता दल या कौटुंबिक पक्षातून उभे राहिले आणि 2017 मध्ये पक्षाचे बसपमध्ये विलीनीकरण करून त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मुख्तार अन्सारी यांना 'गरिबांचा मसिहा' असं म्हणायच्या. पण एप्रिल 2010 मध्ये त्याच मायावतींनी मध्ये अन्सारी बंधूंवर 'गुन्हेगारी आरोप' असल्याचं सांगून पक्षातून काढून टाकलं होतं. पुढे 2017 च्या निवडणुकीआधी न्यायालयात आरोप सिद्ध झाला नसल्याचं सांगत अन्सारींच्या कौमी एकता दलाला मायावतींनी बसपमध्ये विलिन करुन घेतले होते.
 
मुख्तार अन्सारी आणि गाझीपूर
मुख्तार अन्सारीच्या राजकीय आणि गुन्हेगारी समीकरणांमध्ये गाझीपूरचे महत्त्व सांगताना ज्येष्ठ पत्रकार उत्पल पाठक यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "80-90च्या दशकात ब्रिजेश सिंग विरुद्ध मुख्तार अन्सारी यांचं ऐतिहासिक गॅंगवॉर (टोळीयुद्ध) सुरु झालं." गाझीपूर हे शहर अत्यंत सुपीक जमिनीवर वसलेलं आहे. राजकीयदृष्ट्या विचार केला तर गाझीपूर हा भूमिहारांचा गड समजला जातो कारण इथे भूमिहार समाजाची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. यामुळेच काही जुने जाणते पत्रकार गाझीपूरचं वर्णन करत असताना 'गाझीपूर हे भूमिहारांच व्हॅटिकन' असल्याचं सांगतात." देशातील सर्वात मागास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाझीपूरमध्ये कोणताही उद्योग नाही. असं असला तरी अफूच्या व्यापार आणि हॉकीच्या खेळासाठी गाझीपूर प्रसिद्ध आहे. गाझीपूरची आणखीन एक खासियत किंवा विरोधाभास असा की मोठमोठे माफिया, गुंड आणि गुन्ह्यांसाठी चर्चेत असणाऱ्या गाझीपूरच्या मातीने आजवर अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना जन्म दिला आहे. येथील अनेक तरुण प्रशासकीय सेवेत मोठ्या हुद्द्यावर गेले आहेत. पाठक यांच्या मते, ""मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या कुटुंबाचा राजकीय प्रभाव गाझीपूरपासून मऊ, जौनपूर, बलिया आणि बनारसपर्यंत पसरलेला आहे. फक्त 8-10 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या गाझीपूरमध्ये अन्सारी कुटुंबाने हिंदू वोट बँकेच्या बळावर निवडणुका जिंकल्या आहेत. गाझीपूरच्या युसूफपूर भागात असलेल्या मुख्तार अन्सारीच्या वडिलोपार्जित घराला 'बरका फाटक' किंवा 'बिग गेट' म्हणून ओळखलं जातं. एखाद्या मोठ्या खेड्यासारखं रुपडं असणाऱ्या या शहरात 'बरका फाटक' नेमकं कुठे आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे नवीन माणसाला अगदी सहज अन्सारींच्या घरापर्यंत पोहोचता येतं. डिसेंबर 2023मध्ये मुख्तार अन्सारीची आई खूप आजारी होती. अखेरच्या काळात त्यांना बघायला अन्सारी कुटुंबाचे सदस्य देश आणि जगाच्या वेगवेगळ्या भागातून गाझीपूरला आले होते. त्यावेळी मुख्तार बांदा तुरुंगात होता पण त्यांचे थोरले बंधू अफजल अन्सारी आणि त्यांचा मुलगा अब्बास अन्सारी यांनी बीबीसीसोबत संवाद साधला होता. त्यानंतर काहीच तासांमध्ये मुख्तारच्या आईचं निधन झालं. मुख्तार अन्सारीच्या घराबाहेर बांधलेला 'बडा दरवाजा' दिवसभर पाहुण्यांसाठी खुला असतो. आम्ही तिथे गेलो तेंव्हा, व्हरांड्यात उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यासमोर असलेल्या मोठ्या बैठकीच्या खोलीत स्थानिक लोक अन्सारी बंधूंना भेटण्याची वाट पाहत बसलेले होते. त्या खोलीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. मुख्तार अहमद अन्सारी यांच्यापासून माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यापर्यंत कुटुंबातल्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मुख्तारबद्दल बोलताना अफजल अन्सारी यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "मुख्तार आमच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. शाळा संपल्यानंतर तो गाझीपूर येथील कॉलेजमध्ये शिकत होता. त्या कॉलेजमध्ये राजपूत-भूमिहारांचे वर्चस्व होते. तिथेच साधू सिंग नावाच्या एका मुलाशी त्याची मैत्री झाली. त्या मैत्रीखातर मुख्तार त्याच्या वैयक्तिक वैरात गुंतला आणि त्याला बदनामीचा सामना करावा लागला." खासदार अफझल अन्सारी म्हणतात की, "मुख्तारसह संपूर्ण कुटुंबाला त्यावेळी बदनामीला सामोरं जावं लागलं. असं असलं तरी मुख्तार यांच्यावर लावण्यात आलेले हे सर्व खटले राजकीय हेतूने प्रेरित आहेत. तो 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. जर त्याने खरोखरच काही केलं असेल तर मग पोलिस तुमचे, सरकार तुमचे, सीबीआय तुमची, आजपर्यंत एकही गुन्हा का सिद्ध झाला नाही?" मुख्तार अन्सारीच्या राजकीय प्रभावाबाबत बोलताना ते म्हणाले होते की, "मुख्तार मऊमधून निवडणूक लढवत आला आहे आणि जिंकत आला आहे. राजकारणात आमच्यापेक्षा त्याचा प्रभाव जास्त मोठा आहे. त्याच्या नावाला मोठं ग्लॅमर आहे. आम्ही गाझीपूरच्या बाहेर कुठेही गेलो की लोक आम्हाला त्याच्याच नावाने ओळखतात." अफझल म्हणाले होते की, "गाझीपूरचे फक्त 8 टक्के मुस्लिम आम्हाला जिंकून देऊ शकत नाहीत, इथले हिंदू आम्हाला जिंकवतात. आम्हीसुद्धा त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतो. रमजानच्या काळात आम्ही तोंडाला रुमाल बांधून, हत्तीवर बसून होळीसुद्धा खेळलो आहे. हे सगळे लोक आमचेच आहेत असं आम्ही मानतो आणि म्हणूनच ते आम्हालाच मतदान करतील यावर आमचा विश्वास आहे."
 
Published By- Dhanashri Naik