रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 24 मार्च 2024 (15:30 IST)

नागपूरची लढाई ठरली, गडकरींना ठाकरेंचं आव्हान, लढत चुरशीची होईल?

nitin gadkari
नाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.13 मार्च रोजी भाजपाने लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नितीन गडकरींचे नाव आहे. नितीन गडकरींना नागपुरातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
नागपूरमधील सत्तेचे समीकरण कसे राहील हे आपण जाणून घेऊ.
नागपूर शहराची स्थापना गोंड राजा बख्त बुलंद याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. नागपूर ही आधी मध्य प्रदेशची राजधानी आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि नागपूरने आपली राजधानीची ओळख गमावली आणि तेव्हापासून ते उपराजधानीचंच शहर म्हणून ओळखलं जातं.
 
नागपूरची लोकसंख्या 46,53,570 इतकी आहे. जिल्ह्यात 14 तालुके असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असूनसुद्धा तिथे कायमच काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. 2014 मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर या मतदारसंघाचं चित्र पालटलं. 2014 मध्ये 5,86,857 मतं आणि 2019 मध्ये 6,57,624 इतकी मतं गडकरींनी दणदणीत विजय मिळवला खरा, पण यावेळी ते विजयी घोडदौड कायम राखू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
इतिहास आणि समीकरण
नागपुरात ओबीसी, एससी, आणि मुस्लीम मतदारांचं वर्चस्व आहे. तेली, कुणबी समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. 1951 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात अनुसुया बाई पहिल्यांदा खासदार झाल्या.
1956 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. 1962 मध्ये माधव श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. 1967 मध्ये पुन्हा काँग्रेसने या जागेवर विजय मिळवला. तेव्हा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीने जोर धरला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेच्या बाहेर गेली. 1971 मध्ये विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी विजय मिळवला. 1977 मध्ये ते पराभूत झाले आणि 1980 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. या जागेवर आतापर्यंत काँग्रेसने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर संघाचं मुख्यालय असूनसुद्धा भाजपाने चार वेळा विजय मिळवला आहे.
 
जातीय राजकारण हा इथल्या मतदारसंघात कायमच महत्त्वाचा विषय ठरला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिलं नाही त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवर भाजपला चांगलाच फटका बसला.

त्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे इथले ओबीसी नाराज आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करणं हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे. आतापर्यंतची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली आहे. असं असलं तरी तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळाली आहेत.
 
2019 च्या निवडणुकीत अगदी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रचार करूनही काँग्रेसचे नाना पटोले यांना 4 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीतही ‘आप’ च्या उमेदवार अंजली दमानिया यांना चांगली मतं मिळाली होती. संघाचं मुख्यालय असूनही इथे कायमच भाजपचा पराभव होत आला आहे. आधीच्या काळात भाजपचे उमेदवार पराभूत व्हायलाच निवडणूक लढायचे अशी वदंता होती.

आता मात्र भाजप उमेदवार त्वेषाने निवडणूक लढवतात. काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार न देणं हेही भाजपच्या विजयाचं एक कारण मानलं जातं. निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिकीट देतात आणि तेवढ्या वेळात काँग्रेसच्या उमेदवारांना लढत द्यावी लागते. त्यामुळे मतदारसंघ उभा करण्यात त्यांना फारसा वेळ मिळत नाही.
 
नागपुरात गडकरी विरुद्ध विकास ठाकरे लढत
नागपुरातून काँग्रेसने विकास ठाकरे यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात उतरवून लढत एकतर्फी होणार नाही हे स्पष्ट केलंय. विकास ठाकरे हे स्थानिक नेते असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दोनवेळा लढत दिली.
एकदा नागपूर महापालिका निवडणुकीत, 2009 मध्ये दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून फडणवीस विरुद्ध ठाकरे असा सामना झाला होता. यात ठाकरेंचा पराभव झाला. महापालिका आणि विधानसभा अश्या 8 वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नेत्याला काँग्रेसने नवव्यांदा संधी दिलीय.
 
कोण आहेत विकास ठाकरे?
स्थानिक नेते आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. विकास ठाकरे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते कुणबी आहेत. 1985 मध्ये ते काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. त्यानंतर विद्यार्थी काँग्रेस, युवक कँग्रेस, नागपूर शहर काँग्रेस असा प्रवास करत नागपूर महापालिकेत 2002 साली नगरसेवक झाले.2002 ते 2005 पहिल्याच टर्मममध्ये त्यांना नागपूर महापालिकेचं महापौरपद मिळालं.2010 मध्ये नागपूर महापालिकेत भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं. ते 2014 पासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले आणि आता थेट त्यांना खासदारकी मिळाली.
 
काँग्रेसने विकास ठाकरेंना उमेदवारी का दिली?
2019 ची निवडणूक पाहिली तर भंडारा-गोंदियातून आलेल्या नाना पटोलेंनी गडकरींविरोधात लढत दिली होती. नाना पटोले नागपुरातले नेते नव्हते. तरीसुद्धआ त्यांनी गडकरींची लीड कमी केली होती.
पाच वर्षांत बरीच समीकरणं बदलली आहे. मध्यंतरी ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद पाहायला मिळाला. नोंदी सापडलेल्या मराठ्यांना ओबीसी सर्टीफिकेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याविरोधात नागपुरातला ओबीसी समाज एकवटला आहे.
 
भाजपच्या बाजूने असलेला या ओबीसी समाजाची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस ओबीसी चेहऱ्याच्या शोधत होता. नागपुरात अनुसूचित जाती, मुस्लीम, तेली समाजासोबत कुणबी समाजाचीही मतंही जास्त आहेत. त्यामुळे विकास ठाकरे यांच्यासारखा कुणबी उमेदवार देऊन भाजपच्या बाजूने असलेली ही मतं आपल्याकडे वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
 
नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे कशी असेल लढत?
कुणबी चेहरा, शहरातल्या खाचखळग्यांची माहिती असणारा स्थानिक नेता, दांडगा राजकीय अनुभव, पक्ष संघटनेवर पकड आणि नागपुरातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क, जातीय समीकरणं या सगळ्यात साच्यात विकास ठाकरे फीट बसतात ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. पण, दुसरीकडे नागपुरातल्या जातीय समीकरणात फीट बसत नसतानाही सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या नितीन गडकरींचं तगडं आव्हान विकास ठाकरेंसमोर आहे. विरोधातील नेतेही ज्यांना विरोध करताना दिसत नाही असं नितीन गडकरींचं व्यक्तीमत्व आहे. 

शिवाय रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल असा दृश्य स्वरुपातला विकास नागपुरात दिसतो. असं जरी असलं तरी नागपूरमध्ये पूर येऊन अर्ध नागपूर पाण्याखाली गेलं तेव्हा नागपूरकरांचा गडकरी यांच्याविरोधात रोष पाहायला मिळाला. आता विकास ठाकरे कोणते मुद्दे घेऊन गडकरी यांच्याविरोधात लढत देणार? यावर काँग्रेस उमेदवाराचं पुढचं भवितव्य ठरणार आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात
 
'विकासपुरुष' असतानाही समस्यांची जंत्री
2014 पासून नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेतच. केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. भारतात रस्तेबांधणीच्या कामात ते कायमच अग्रेसर आहेत. तरी त्याचं प्रतिबिंब नागपूर शहरात दिसत नाही. नागपुरात अनेक नवीन रस्ते तयार झाले आहेत, फ्लायओव्हर तयार झाले आहेत, मेट्रोही जोमात धावते आहे. रस्त्यांचं सिमेंटीकरण होत आहे.असं असलं तरी रस्त्याची समस्या नागपुरात सुटलेली नाही. अनेक अंडरपास बांधले गेले. मात्र नागपुरात येणारा पूर ही एक नवी नागरी समस्या म्हणून उदयाला आली आणि त्यात हे अंडरपास पाण्याखाली गेल्याचं नागपुरकरांनी पाहिलं.सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराने शहराची पुरती दैना झाली. मदतकार्य वेगाने झालं तरी नागरिकांचं अपरिमित नुकसान झालं आहे.
 
हा पूर नागपूरच्या लोकांच्या असंतोषाचं मुख्य कारण झाला आहे. मिहान या औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या येणार आहेत हे वाक्य ऐकून नागपुरातल्या अनेक तरुण पिढ्या आता चाळिशीकडे गेल्या आहेत. तरी मिहानचा विकास व्हायला तयार नाही. IIM, NLSIU, AIIMS सारख्या संस्था नागपुरात आल्या तरी नोकरीसाठी इथल्या तरुणांना नागपूरच्या बाहेरच जावं लागतं.त्यामुळे नागपूरचा विकास हा खरंच विकास आहे का हाही प्रश्न यानिमित्ताने नागपूरकरांना पडला आहे.

Published By- Priya Dixit