1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (22:23 IST)

नरेंद्र मोदी : काँग्रेस चालवणाऱ्या ‘कुटुंबाची’पंजाबशी जुनी दुश्मनी आहे

पंजाबमधल्या जालंधरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं की भाजप आणि मित्रपक्षांचा विजय निश्चित आहे.
 
पंजाबमध्ये येत्या विधानसभेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे.
 
आपल्या भाषणात त्यांनी गांधी कुटुंबालाही लक्ष्य बनवलं. त्यांनी आरोप केला की काँग्रेसची सगळी सरकारं रिमोट कंट्रोलने चालतात. ते रिमोट कंट्रोल म्हणजे 'एक कुटुंब' आहे. ही सरकारं घटनात्मक पद्धतीने चालत नाहीत.
 
पंतप्रधान मोदींनी पुढे असं म्हटलं की, "काँग्रेसचा कंट्रोल ज्यांच्याकडे आहे, त्या कुटुंबाचं पंजाबशी जुनं वैर आहे. जोवर काँग्रेस त्या कुटुंबाच्या हातात आहे तोवर काँग्रेस पंजाबचं कधीही भलं करू शकत नाही."
 
त्यांनी म्हटलं की पंजाबात अशा सरकारची गरज आहे जे देशाच्या सुरक्षेची गंभीरतेने काळजी घेतील आणि काम करतील. "काँग्रेसचा इतिहासावरून स्पष्ट आहे की त्यांनी कधीही पंजाबच्या भल्यासाठी काम केलं नाही आणि जे करू इच्छितात त्यांच्या मार्गात हजार अडथळे उभे करतात."
 
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर आरोप केला की त्यांनी 1984 च्या शीख दंगलीच्या आरोपींना पक्षात महत्त्वाची पदं दिली आहेत. त्यांनी म्हटलं की शीख दंगलींची चौकशी करण्यासाठी भाजप युतीनेच SIT बनवली आणि पीडितांची मदत केली.
 
जालंधरमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की या कार्यक्रमानंतर त्यांना त्रिपुरमालिनी देवीच्या दर्शनाची इच्छा होती पण प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना यासाठी नकार दिला.
 
"इथल्या प्रशासनाने आणि पोलिसांनी हात वर केले. त्यांनी म्हटलं की आम्ही व्यवस्था करू शकत नाही, तुम्ही हेलिकॉप्टरने जा. इथल्या सरकारची अशी अवस्था आहे."
 
'व्यापार अडकलाय माफियांच्या तावडीत'
पंतप्रधान मोदींनी हाही आरोप केला की पंजाबतले बहुतांश व्यवसायांवर माफियांचं राज्य आहे.
"पंजाबात उद्योग-व्यापार माफियांच्या हातात दिलेत. भाजपच्या सरकारमध्ये हा खेळ चालू दिला जाणार नाही. भाजपच्या राज्यात इथल्या व्यापाऱ्यांनी भीतीखाली, अत्याचार सहन करत राहावं लागणार नाही. ते निर्धास्त होऊन व्यापार करू शकतील."
 
अकाली दलाबद्दल काय म्हणाले मोदी?
मोदींनी खात्री व्यक्त केली की पंजाबमध्य एनडीएचं युती सरकार येईल. त्यांनी म्हटलं की पहिल्यांदाच भाजप पंजाबात सर्वाधिक विश्वासू पर्याय म्हणून मतदारांच्या समोर आला आहे.
 
यंदाच्या निवडणुकीत अकाली दल आणि भाजप वेगवेगळे उतरले आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अकाली दलाचा उल्लेख करताना म्हटलं की जेव्हा अकाली दलाकडे संपूर्ण बहुमत नव्हतं तेव्हा भाजपने त्यांना साथ दिली. पण भाजपसोबत अन्याय झाला आणि उपमुख्यमंत्रिपद अकाली दलाने आपल्याकडेच ठेवलं.
 
मोदी म्हणाले की पंजाबच्या भल्यासाठी त्यांनी अकाली दलाचा पाठिंबा काढून घेतला नाही आणि सरकार कोसळू दिलं नाही.
 
कृषी कायद्यांवरून पंजाबात भाजप आणि अकाली दलाचे रस्ते वेगळे झाले होते हे लक्षात घ्यायला हवं.