सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (11:07 IST)

एनडीएचे खासदार २३ दिवसांचे वेतन घेणार नाही

संसदेच्या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन मोठा गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 
 
गदारोळामुळे कामकाज होऊ न शकल्याने संसदेच्या अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला. याचे पडसाद कॅबिनेटच्या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीत बहुतांश खासदारांनी वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडली. यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल, असे मत अनेक खासदारांनी मांडले. विरोधकांमुळेच संसदेचे कामकाज होऊ शकले नाही, असा संदेश लोकांपर्यंत जावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. 
 
संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्याने अनेक विधेयकांना मंजुरी मिळू शकली नाही. यावरुन संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'एनडीएच्या खासदारांनी २३ दिवसांचे वेतन आणि भत्ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कामातून लोकांची सेवा होत असेल, तरच आम्ही वेतन घ्यायला हवे, असे आम्हाला वाटते. आम्हाला अधिवेशनात  विविध मुद्यांवर चर्चा करायची होती. मात्र काँग्रेसमुळे  लोकसभा आणि राज्यसभेचा अमूल्य वेळ वाया गेला,' असे ट्विट करत अनंत कुमार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.