आता विभाजित भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत
आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लाखो देशभक्तांनी बलिदान दिलं आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर आपण विभाजनाचं दुःख झेललं आहे. आपल्याला खंडित भारत मिळाला आहे. आता आपल्याला अखंडित भारत बनवायला हवा, हे आपलं राष्ट्रीय तसंच धार्मिक कर्तव्य आहे. या कर्तव्य मार्गावर चालल्यास आपला विजय असेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
राजधानी नवी दिल्लीमधील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत म्हणाले, "देशाचं विभाजन न मिटणारी वेदना आहे. ही वेदना तेव्हाच मिटेल जेव्हा विभाजन रद्द होईल. भारत एक जमिनीचा तुकडा नाही, आपली मातृभूमी आहे. संपूर्ण जगाला काही देण्यालायक आपण तेव्हाच बनू जेव्हा विभाजन रद्द होईल.
"हे राजकारण नाही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळे कोणीही सुखी झालेलं नाही. भारताची प्रवृत्ती वैविध्य स्वीकारण्याची आहे. विभाजनवादी तत्वांच्या शक्तींमुळं देशाचं विभाजन झालं आहे. आम्ही विभाजनाचा दुःखदायक इतिहास पुन्हा होऊ देणार नाही," असंही ते म्हणाले आहेत.