कार्यक्रमात नोटांचा पाऊस
नागालँड विधानसभा निवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ने चमकदार कामगिरी केली आहे. NPP कार्यकर्त्यांनी 60 सदस्यांच्या विधानसभेत सात जागा जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पक्षाचे नेते सी किपिली संगतम यांच्या घराबाहेर चलनी नोटांचा वर्षाव केला. कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील NPP ने मेघालयात दुसऱ्यांदा राज्यात सत्ता राखली आहे. मेघालयातील या पक्षाने नागालँडमध्ये प्रथमच सात जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडिओंमध्ये एनपीपीचे कार्यकर्ते चलनी नोटा हवेत फेकताना, घोषणाबाजी करताना आणि नाचताना दिसत आहेत.
नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीने 37 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. नितीश कुमार यांच्या जेडीयूने एक जागा जिंकली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खात्यात सात जागा आहेत. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), नागा पीपल्स फ्रंट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. चार जागा अपक्षांच्या खात्यात आल्या आहेत. नागालँडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणखी एका टर्मसाठी सत्तेवर आली आहे. मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची शुक्रवारी NDPP विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
Edited by : Smita Joshi