पाटणा: चालत्या ट्रेन मधून पाय घसरला, सुदैवाने बचावला
धावत्या रेल्वेत चढू किंवा उतरू नये असे वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असते. तरीही काही लोक आपला जीव धोक्यात टाकून धावत्या रेल्वेतून चढ उतर करतात आणि जीवाला धोक्यात घालतात.तर काही जण बळी पडतात.बिहारच्या पाटणाच्या मोकामा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ट्रेनच्या धडकेने एक प्रवासी थोडक्यात बचावला. मोकामा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा पाय घसरला. त्यामुळे प्रवाशी स्टेशनवरच पडला आणि तो घसरत ट्रेनखाली गेला, मात्र सुदैवाने आरपीएफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने प्रवाशाला बाहेर काढण्यात आले. जसपाल सिंग असे या प्रवाशाचे नाव आहे. जसपाल सिंग हा वाराणसी जिल्ह्यातील भेलुपूर पोलीस ठाण्यातील राणीपूरचा रहिवासी आहे. तो बेगुसराय येथे एका समारंभातील ताशा पार्टीतुन परतत असताना ही घटना घडली. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जसपालचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो सुदैवाने बचावला.
Edited By - Priya Dixit