रेल्वे मंत्री पीयुष गोयल हे पत्नी सीमा गोयल यांच्या कंपनीमुळे अडचणीत आले आहेत. काँग्रेसने या कंपनी संदर्भातील काही कागदपत्र जाहीर करून केवळ एक लाखाची गुंतवणूक असलेल्या कंपनीने अवघ्या १० वर्षात ३० कोटी रुपये कसे कमावले, असा सवाल उपस्थित केला आहे. मंगळावारी यासंदर्भात पत्रकार परिषद भरवून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच पीयुष गोयल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
काँग्रसेचा आरोप आहे की, सीमा गोयल यांची कंपनी ‘इंटरकॉन अॅडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड’ एक लाख रुपयात सुरू करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत या कंपनीने ३० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीच्या एकूण १० हजार शेअरमध्ये प्रत्येक शेअरची किंमत ३० हजार रुपये इतकी कशी झाली?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.