हेलिकॉप्टर अपघातावर पंतप्रधानांनी बोलावली CCS बैठक, अमित शाह आणि राजनाथ सिंह उपस्थित राहणार
तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (CCS) बैठक बोलावली आहे. या बैठकीला पंतप्रधानांव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सदस्य उपस्थित राहणार आहेत. हेलिकॉप्टर अपघातात विमानातील 14 पैकी 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीडीएस बिपिन रावत हे देखील या हेलिकॉप्टरमध्ये होते.
या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे मृतदेह चांगलेच जळून खाक झाले होते. अशा परिस्थितीत मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात घडल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
हवाई दलाने मात्र जनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. IAF चे Mi-17VH हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश देण्यात आले आहेत. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई दलाच्या तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले.