शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (11:56 IST)

अक्षरधामजवळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा

गाझीपूर सीमेवरून दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. दिल्ली-नोएडा आणि दिल्ली-गाझियाबाद मार्गावर अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. इथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
दरम्यान, सिंघु बॉर्डरवरही शेतकरी आणि पोलिसांमध्ये संर्घष झाल्याची माहिती मिळत आहे.
 
सिंघु बॉर्डरवर बीबीसीचे प्रतिनिधी अरविंद छाब्रा उपस्थित आहेत. त्यांच्या मते शेतकऱ्यांनी ट्रान्सपोर्ट नगरजवळ बॅरिकेड्स तोडले आणि त्यांनी दिल्लीत प्रवेश केला.
 
अरविंद यांनी सांगितलं की, पोलिसांनी अशाप्रकारची परिस्थिती हाताळण्याची तयारी ठेवली आहे.
 
एकीकडे शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टर रॅलीची तयारी करत असताना दुसरीकडे दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाचं संचलन पार पडलं.
 
भारत-बांग्लादेशमधील द्विराष्ट्रीय संबंधांना पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावेळी बांग्लादेशच्या विशेष सैन्य दलाच्या पथकानं राजपथावर संचलन केलं.
 
या पथकात बांगलादेशचे 122 जवान सहभागी झाले होते. यापूर्वी 2016 साली फ्रान्स आणि 2017 साली संयुक्त अरब अमिरातच्या सैन्याच्या तुकडीनं संचलनात भाग घेतला होता.
 
दुसरीकडे कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे. दिल्लीत सव्वा लाख ट्रॅक्टर या रॅलीसाठी येणार असल्याचा अंदाज आहे.
 
दिल्लीहून टिकरी बॉर्डरकडे जाणारा रस्ता गेल्या दोन तासांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलाय. या भागातील तीन ते चार किलोमीटरच्या अंतरातले चौक पोलिसांनी जेसीबी लावून अडवले आहेत.
 
नांगलोई चौकात पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी झेंडे लावलेल्या मोटारसायकल आणि काही कार आणल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना परत पाठवलं. अनेक लोक बॅरिकेडिंगबद्दल काही माहीत नव्हतं, ते आपल्या गाड्यांमधून उतरून पुढे चालत जात होते.
 
ट्रॅक्टर दिल्लीला येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार दिल्ली-हरियाणाजवळील टिकरी बॉर्डरपाशी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, टिकरी बॉर्डरहून निघालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली दिल्लीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या रॅलीसाठी 10 वाजताची वेळ होती, मात्र सर्व सीमांवरून शेतकरी नियोजित वेळेच्या आधीच निघाले आहेत.