बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (09:00 IST)

राहुल गांधींनी RSS ला म्हटलं '21व्या शतकातील कौरव', तरीही संघ नेतृत्व मौन का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे '21व्या शतकातील कौरव' असून त्यांचं आणि देशातल्या श्रीमंतांचं साटलोट असल्याची टीका राहुल गांधींनी भारत जोडो यात्रे दरम्यान केली आहे.
 
सध्या 'भारत जोडो' यात्रा हरियाणा आणि पंजाबमधून निघाली असून यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "कौरव कोण होते? मी तुम्हाला 21 व्या शतकातील कौरवांबद्दल सांगू इच्छितो. हे कौरव खाकी हाफ पँट घालतात, हातात काठ्या घेऊन शाखांचं आयोजन करतात. भारतातील दोन-तीन अब्जाधीश या कौरवांसोबत उभे आहेत."
 
काँग्रेसची 'भारत जोडो’ यात्रा 2022 च्या सप्टेंबर महिन्यात केरळच्या तिरुअनंतपुरम इथून सुरू झाली. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर सातत्याने टीकास्त्र सोडलंय.
 
राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसला 'तुकडे तुकडे गँग', 'भीती आणि द्वेषाचं राजकारण' करणारी संघटना असल्याचं म्हटलंय.
 
त्यांनी संघाची तुलना इजिप्तमधील बंदी असलेल्या मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेशी केली.
 
आता राहुल गांधींनी एवढी टीका करूनही आरएसएसने घेतलेल्या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींनी जेव्हा महात्मा गांधींच्या हत्येचा संबंध संघाशी जोडला होता तेव्हा संघाने राहुल गांधींना न्यायालयात खेचलं होतं. मात्र, हल्लीच्या वक्तव्यावर संघाने तितकासा गदारोळ केलेला नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
मात्र आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मीडियाशी बोलताना ते म्हणाले होते की, भारतात यापूर्वी अनेकांनी अशा यात्रा काढल्या होत्या, मात्र राहुल गांधी द्वेषपूर्ण भाषा वापरतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सातत्याने टीका करून ते भारताला जोडण्याचा नाही तर तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
मात्र आरएसएसचं सर्वोच्च नेतृत्व यावर मौन बाळगून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अलीकडे बऱ्याच कार्यक्रमात दिसले. तसेच या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. मात्र त्यांनी या प्रश्नावर शांत राहणंच पसंत केलं.
 
राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे?
राम मंदिर ट्रस्टच्या दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, जनरल सेक्रेटरी चंपत राय आणि खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेसंदर्भात अशी वक्तव्य केली आहेत की यावरून ते राहुल गांधींचं कौतुक करतायत असं वाटतं.
 
चंपत राय यांनी यावेळी आरएसएसशी असलेल्या संबंधांवर भर दिला.
 
चंपत राय म्हणाले की, "देशातला एक तरुण पायी चालतोय, ही चांगली गोष्ट आहे. यात वाईट काय आहे? मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. संघातल्या कोणी त्यांच्यावर टीका केली आहे का? पंतप्रधानांनी या दौऱ्यावर टीका केली आहे का?
 
एक तरुण देशभर भ्रमंती करतोय, देश समजून घेतोय हे खरं तर कौतुकास्पद आहे. एक 50 वर्षाचा व्यक्ती 3,000 किलोमीटर पायी चालतोय, या वातावरणात सुद्धा चालतोय, तर आम्हाला त्याचं कौतुकच आहे."
चंपत राय विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्षही आहेत.
 
'राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी भारत जोडो यात्रेला आशीर्वाद दिला, यावर तुमचं मत काय?' असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा चंपत राय यांनी हे उत्तर दिलं होतं.
 
स्वामी गोविंद देव गिरी म्हणाले की, "जो कोणी रामाचं नाव घेतो, जो कोणी भारत मातेचं नाव घेतो, भारतमातेसाठी काहीतरी करतो, त्याचं आम्ही कौतुकच करतो. शिवाय देश एकसंध आणि सक्षम राहावा यासाठी रामाने त्याला प्रेरणा द्यावी अशीच अपेक्षा करू."
 
संघ आणि भाजपचे संबंध
राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय असो की स्वामी गोविंद देव गिरी, त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलंय अशा पध्दतीने काँग्रेसने ही वक्तव्य समोर आणली आहेत. काँग्रेसव्यतिरिक्त इतर अनेक लोक याकडे कौतुकाच्या स्वरूपातच पाहत आहेत. राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी सांगतात त्याप्रमाणे, "संघात आणि भाजपमध्ये काही गोष्टी सुरळीत चालल्या नसल्याचा अंदाज वर्तवला जातोय." तेच दुसऱ्या बाजूला लेखक धीरेंद्र झा यांचं म्हणणं आहे की, संघाला राग तर आलाय पण काय करावं हे सुचत नाहीये. 'गांधीज अ‍ॅसेसिन्स - द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज आयडिया ऑफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक धीरेंद्र झा सांगतात की, "राहुल गांधी ज्यापद्धतीने भाजप आणि आरएसएसच्या द्वेष पसरवण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, देशाच्या फाळणीचा मुद्दा उपस्थित करत आहेत, ते पाहता लोकांनी दिलेल्या रिस्पॉन्सवर त्यांचा मूड नक्की कसा आहे याचा अंदाज संघाला येत नाहीये. त्यामुळे सध्या यावर शांत राहायचं अशी त्यांची रणनीती आहे."
 
पण 'कौरवां'बद्दलच्या वक्तव्यानंतर संघाचे सदस्य इंद्रेश कुमार म्हटले होते की, राहुल गांधी द्वेष पसरवण्याचं काम करतायत.
 
'हिंदुस्तान टाईम्स' आणि 'मेल टुडे' या इंग्लिश वृत्तपत्रांचे माजी माजी संपादक भारत भूषण यांनी मात्र संघाच्या स्तुतीला मिसलीडिंग असल्याचं म्हटलंय.
 
मग संघ राहुल गांधींच्या वक्तव्यावर शांत का आहे यावर संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर सांगतात की, 'संघ अशा गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.'
 
मोदींचा संघावर प्रभाव आहे का?
यावर नीरजा चौधरी सांगतात की, "नरेंद्र मोदी भाजपला जास्तच जवळ करतायत अशी भावना सध्या संघात आहे. दुसरीकडे मोदी आरएसएसचं सुद्धा संचलन करतायत. त्यामुळे संघ आणि भाजप असं समीकरण झपाट्याने बदलू लागलंय. याचा परिणाम संघातील एका वर्गावर झालाय, आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण झालीय."
 
नरेंद्र मोदींनी निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा विजय मिळवलाय. जनतेवरची त्यांची पकड बघून संघाच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा त्याचा परिणाम झालाय.
 
त्यामुळे आजच्या घडीला जर कार्यकर्त्यांना सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या एकाची निवड करायची असेल तर ते मोदींच्या बाजूने उभे राहतील असं म्हटलं जातंय.
 
लेखक आणि पत्रकार धीरेंद्र झा सांगतात की, "सध्य घडीला मोदींची संघावर मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांची अडचण ही आहे की त्यांना काही करता येत नाहीये. त्यामागे असलेलं कारण म्हणजे, मालेगावपासून अजमेर आणि मक्का मशीद ते समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. जर सरकार बदललं तर या केसेस पुन्हा सुरू होतील."
झा पुढे सांगतात की, "देशाच्या विविध भागात झालेल्या या बॉम्बस्फोटात संघाचे सर्वोच्च नेते इंद्रेश कुमार यांच्यावरही चार्जशीट दाखल करण्यात आली होती. मोदी सत्तेवर आल्यावर यातल्या बऱ्याच केसेस निकाली निघाल्या, पण अनेक प्रकरणांमध्ये आरोपी अजूनही तुरुंगात आहेत."
 
पूर्वी संघाचं काम हे नैतिक ताकदीच्या स्वरूपात असायचं. राजकीय मैदानात संघाने उघड उघड एन्ट्री केली नव्हती.
 
पण धीरेंद्र झा सांगतात त्याप्रमाणे, "मागच्या काही वर्षांत संघाचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे निवडणुकीत दिसतायत, ते पाहता या भाजप आणि संघातील राजकीय अंतर आणि फरक पूर्णपणे संपल्यात जमा आहे."
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी आणताना संघाने राजकारणापासून अलिप्त राहावं ही एक अट होती.
 
1970 आणि 1980 च्या दशकात संघाने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठिंबा दिला नाही.
 
1977 मध्ये इंदिरा गांधींचा सामना करण्यासाठी एक संघटना उभी केली जात होती त्यात जनसंघ विलीन करण्यात आला.
 
1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी देश एकसंध राहावा हे कारण देत संघाने राजीव गांधींना पाठिंबा दिला. पण 1980 पर्यंत तर भाजप ही राजकीय संघटना तयार झाली होती.
संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी त्यांच्या एका लेखात राजीव गांधींना पाठिंबा देण्याबाबत लिहिलं होतं.
 
पण नरेंद्र मोदींनी ज्यापध्दतीने हिंदुत्वाचा अजेंडा राबवला आहे ते पाहता संघाला भाजपपासून वेगळं करणं शक्य नसल्याचं दिसतंय.
 
'बिझनेस स्टँडर्ड'च्या एका लेखात भारत भूषण लिहितात की, "भलेही हिंदुत्ववादी शक्तींनी राहुल गांधींच्या यात्रेचं समर्थन केलं नसेल पण त्यांनी राम मंदिराच्या निर्मितीच्या श्रेयाचा मुद्दा उपस्थित केलाय."
 
निवडणुकीचे मुद्दे
गृहमंत्री आणि नरेंद्र मोदींच्या इनर सर्कलमध्ये असणारे अमित शहा यांनी त्रिपुरातील एका भाषणात सांगितलंय की, 1 जानेवारी 2024 पर्यंत राम मंदिर बांधून तयार असेल.#
 
अमित शाह यांनी असं म्हटल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी चंपत राय यांनी म्हटलं होतं की, मंदिराचा मुख्य भाग 14 जानेवारी 2024 पर्यंत तयार होईल.
भारत भूषण यांना वाटतं की, गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिरांचा मुद्दा उपस्थित केलाय, ते बघता पुढच्या निवडणुकीत राम मंदिर हाच मुख्य मुद्दा राहणार असल्याचं स्पष्ट होतंय.
 
दुसरीकडे राहुल गांधींनी बेरोजगारी, महागाई, चिनी घुसखोरी यासह धर्म आणि जातीच्या नावावर देशाचं होत असलेलं विभाजन या मुद्द्यांना हात घातलाय.
 
जाणकारांच्या मते, आता तर मथुरा आणि वाराणसी मंदिराचं प्रकरण सुद्धा न्यायालयात पोहोचलंय. आणि तिकडे अमित शहा यांनी राम मंदिर उभारणीबाबत आत्तापासूनच बोलायला सुरुवात केलीय. अशा परिस्थितीत पुढची निवडणुक काँग्रेससाठी सोपी नसल्याचं दिसतंय.

Published By- Priya Dixit