गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (18:44 IST)

राहुल गांधी म्हणाले, मी सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत

rahul gandhi
मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, तुरुंगात टाका, तरी मी घाबरणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केलं.
 
लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.
 
परदेशातील भाषणावर भाजपने माफीची मागणी केल्याचा प्रश्न राहुल गांधींना विचारला असता, ते म्हणाले, "माझं नाव सावरकर नाहीय. माझं नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही."
 
या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदी-अदानी संबंधांवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, "अदानींच्या शेल कंपनी आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपयांची कुणी गुतंवणूक केली? अदानींचा पैसा नाहीये, तो दुसऱ्या कुणाचा आहे. मग तो कुणाचा आहे?
 
"मी हाच प्रश्न विचारला. संसदेत पुरावे दिले. अदानी आणि मोदींच्या नात्याविषयी मी सविस्तर बोललो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून या दोघांचं नातं आहे. दोघांचं नातं जुनं आहे. माझ्या भाषणाला थांबवण्यात आलं. मी अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिलं. विमानतळं अदानींनी कायद्याला धाब्यावर बसवून देण्यात आले. मी चिठ्ठी लिहिली. पण काहीच फरक पडला नाही."
 
लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याच्या घडामोडीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, मला तुरुंगात टाका, पण मी घाबरणार नाही, बोलत राहणार."
 
माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून मोदींनी मला अपात्र केलं. ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली, असंही राहुल गांधी म्हणाले.
 
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
 
मी तुम्हा सगळ्यांना वारंवार म्हटलंय की देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे आणि याचं आम्हाला दररोज उदाहरण भेटत आहे.
अदानींच्या शेल कंपनी आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपयांची कुणी गुतंवणूक केली? अदानींचा पैसा नाहीये, तो दुसऱ्या कुणाचा आहे. मग तो कुणाचा आहे?
मी हाच प्रश्न विचारला. संसदेत पुरावे दिले. अदानी आणि मोदींच्या नात्याविषयी मी सविस्तर बोललो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून या दोघांचं नातं आहे. दोघांचं नातं जुनं आहे. माझ्या भाषणाला थांबवण्यात आलं. मी अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिलं. विमानतळं अदानींनी कायद्याला धाब्यावर बसवून देण्यात आले. मी चिठ्ठी लिहिली. पण काहीच फरक पडला नाही.
माझ्याविषयी मंत्र्यांनी संसदेत खोटं बोलले. मी विदेशी ताकदीची मदत मागितली, असं सांगितलं गेलं. पण हे खोटं आहे.
माझी खासदारकी रद्द करून मला थांबवू शकत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.
राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान साडेचार महिने जनतेच्या मध्ये राहिले होते, ते माझे काम आहे आणि ते मी करत राहीन.
हा प्रश्न ओबीसींचा नाहीय, हा प्रश्न नरेंद्र मोदी आणि अदानींच्या संबंधांचा आहे. मी तर भारत जोडोत कायम सांगत आलोय की, सर्व समाजांनी एकत्र राहायला हवं, बंधुभाव असायला हवा.
माझ्या विरोधात कुणीही असलं तरी मी फक्त खरं ते पाहतो, खरं ते बोलतो. राजकारणात ही फॅशनेबल गोष्ट नसली तरी ते माझ्या रक्तात आहे. या देशानं मला सगळं काही दिलंय. प्रेम दिलंय, आदर दिलाय.
वायनाडच्या लोकांसोबत माझे कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिणार आहे. भाजपचे सगळे नेते मोदींना घाबरतात. कारण तुम्हाला माहिती आहे.
माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून मोदींनी मला अपात्र केलं. ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली.
मला माझी सदस्यता मिळाली नाही मिळाली, तरी मी माझं काम करत राहीन. मी संसदेत आहे की बाहेर याचा मला काही फरक पडत नाही.
मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, मला तुरुंगात टाका, पण मी घाबरणार नाही, बोलत राहणार.
माझं नाव सावरकर नाहीये. माझं नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही
काँग्रेसची देशव्यापी जनआंदोलनाची घोषणा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसनं देशभरात 'जनआंदोलन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (24 मार्च) संध्याकाळी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
 
देशभरात राबवण्यात येणारे हे आंदोलन सोमवारपासून (27 मार्च) सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेसोबतच राहुल गांधींच्या अपात्रतेबाबत जनजागृती कार्यक्रम, राज्यघटना वाचवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
काल (24 मार्च) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सोनिया गांधीही बैठकीला उपस्थित होत्या.
 
जयराम रमेश पुढे म्हणाले, "मोदी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे राहुल गांधींना जाणूनबुजून अपात्र ठरवण्यात आलं, हे आम्ही देशभरात जाऊन सांगू. 'भारत जोडो' यात्रा ही एक चळवळ बनल्यामुळे आणि अदानी प्रकरणावर काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे भाजप घाबरला आहे."
 
सर्व विरोधी पक्षनेत्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचं स्वागत करत जयराम रमेश म्हणाले की, आता आपण विरोधी ऐक्याचा मुद्दा पद्धतशीरपणे पुढे नेला पाहिजे.
 
"काँग्रेस अध्यक्ष संसदेत दररोज विरोधी पक्षांशी समन्वय साधत आहेत. आता हे काम बाहेरही करावे लागेल," असंही ते म्हणाले.
 
महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्यांवर काँग्रेसचं आंदोलन
राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केल्याचे पडसाद देशभर उमटताना दिसतायेत.
 
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवला.
 
'लोकशाहीची हत्या' असे फलकही काँग्रेस नेत्यांच्या हातात होते.
 
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांसह अनेक आमदार उपस्थित होते.
 
मी देशासाठी कुठलीही किंमत चुकवायला तयार - राहुल गांधी
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करून त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
 
"मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं," असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.
 
मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असं त्याचा अर्थ आहे.
 
सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
 
गुजरातमध्ये सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आहे.
 
आदेशात काय म्हटलं?
लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग तसंच सर्व मंत्रालय/विभागांना पाठवण्यात आलं आहे.
 
या पत्रानुसार, भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी कोर्टात उपस्थित होते.'सगळ्याच चोरांचं आडनाव मोदी कसं असू शकतं?' असं कथित वक्तव्य त्यांनी केलं होतं.
 
त्यानंतर भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी कर्नाटकातील कोलार येथे त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
 
भारतीय दंड संहितेच्या कलम 499 नुसार या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा प्रस्तावित आहे.राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि लगेच जामीनही मिळाला आहे.या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.
 
महात्मा गांधींचा एक सुविचार त्यांनी या ट्विट मध्ये मांडला, "माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहेत. सत्य माझा देव आहे. अहिंसा ते मिळवण्याचं साधन" असं ते म्हणाले होते.
Published By -Smita Joshi