लवकरच राहुल गांधी अध्यक्ष बनणार
काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष बनणार आहेत. दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींसोबत वरिष्ठ नेते हजर होते. काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सूचना जारी करण्यात येईल. 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मदत असणार आहे. अर्जांची छाननी करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला राहुल गांधी वगळता इतर कोणताही अर्ज न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात येईल.
राहुल गांधी सध्या काँग्रेस उपाध्यक्ष असून, अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताच जास्त आहे. जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 5 डिसेंबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे, तर 16 डिसेंबरला गरज पडल्यास मतदान घेण्यात येईल. पण सध्या तरी या स्पर्धेत राहुल गांधी एकमेव आहेत.