शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 30 मार्च 2023 (08:18 IST)

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या एकजुटीला ग्रहण लागणार का?

rahul gandhi
सलमान रावी
सोमवारी संध्याकाळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक जमली होती.
 
या बैठकीला काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी हजेरी लावली होती. सोबतच देशातील इतर विरोधी पक्षांचे एकूण 18 प्रतिनिधी देखील हजर होते.
 
यावेळी विरोधी पक्षांतील एक पक्ष मात्र गैरहजर होता. त्यांच्या या गैरहजेरीमुळे इतर विरोधी पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या. हा पक्ष होता उद्धव ठाकरेंची शिवसेना.
 
या बैठकीला या पक्षाचा ना एखादा खासदार उपस्थित होता ना एखादा नेता.
 
पण चर्चा तर अशाही सुरू आहेत की या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे येण्यास उत्सुक होते. पण ते आलेच नाहीत.
 
शनिवारी दिल्लीतील अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली होती.
 
पत्रकार परिषदेत राहुल गांधींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. की तुम्ही परदेशात जी वक्तव्यं केली आहेत त्यावर त्याबद्दल सत्ताधारी पक्षाने माफीची मागणी केली आहे. तुम्ही माफी मागणार का, असं राहुल यांना पत्रकारांनी विचारलं त्यावर राहुल गांधी म्हणाले.
 
या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "मी सावरकर नाहीये. माझं नाव राहुल गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत."
 
पण राहुल गांधींनी सावरकरांवर जे वक्तव्य केलंय त्यावर महाविकास आघाडीत सामील असलेल्या उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलीय. शिवाय सावरकरांचा वारंवार अपमान करू नका, असा सल्लाही त्यांनी राहुल गांधींना दिलाय.
 
शिवसेनेने दिला राहुल गांधींना इशारा
राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "अंदमानमध्ये सलग चौदा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी अकल्पनीय त्रास सहन केला. सावरकर आमच्यासाठी देवाच्या ठिकाणी आहेत आणि आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही."
 
त्याचबरोबर राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करत राहिले तर 'विरोधकांच्या ऐक्याला तडा जाईल', असे स्पष्ट संकेतही उद्धव ठाकरेंनी दिलेत.
 
सोमवारी महाराष्ट्रातील मालेगावमध्ये आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाली आहे.
 
"राहुल गांधींना जाणीवपूर्वक उद्युक्त केलं जातंय. आणि त्यांनी जर या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवला तर लोकशाही संपेल."
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ते राहुल गांधींनी भेटणार असून येथून पुढच्या काळात अशी वक्तव्यं करू नये असा सल्ला देणार आहेत.
 
सावरकरांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचं दिसतंय.
 
पवारांनी त्यांना वाटणाऱ्या चिंतेबाबत काँग्रेस नेतृत्वाला जाणीव करून दिली आहे.
 
महाराष्ट्रात सावरकरांचा मुद्दा मोठा आहे कारण..?
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 27 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलावली होती.
 
या बैठकीला उपस्थित असणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वाला स्पष्टपणे सांगितलंय की, महाराष्ट्रात सावरकरांची प्रतिमा मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर केली जाणारी वक्तव्य राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या आघाडीसाठी योग्य ठरणार नाहीत.
 
यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा महाराष्ट्रात असताना देखील राहुल गांधींनी सावरकरांवर निशाणा साधला होता.
 
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकीयातून राहुल गांधींवरही टीका करण्यात आली.
 
या संपादकीय मध्ये म्हटलंय की, महाविकास आघाडीत सामील असलो तरी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेली वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत.
 
पुढे असंही म्हटलंय की, "मी सावरकर नाही अशी विधानं राहुल गांधींनी केली आहेत. या वक्तव्यांमुळे कोणीही शूर म्हणवला जात नाही किंवा त्यांच्या अशा बोलण्याने लोकांमध्ये सावरकरांप्रती असलेला आदर आणि श्रद्धा कमी होणार नाही."
 
यावर ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई सांगतात की, राहुल गांधींच्या अशा वक्तव्यांमुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकीयदृष्ट्या कसे अपरिपक्व आहेत हे सांगण्याची संधी विरोधकांना मिळेल.
 
ते पुढे सांगतात की, "जेव्हा अनेक पक्ष एखाद्या मुद्द्यावर एकत्र येतात, तेव्हा विचारधारेत विरोधाभास असतोच. पण त्यातूनही त्यांच्यात चांगल्या पद्धतीनं सामंजस्य निर्माण होतं. एकमेकांचा आदरभाव करून आणि काही मूलभूत मुद्द्यांवर एकमत होऊन हे सामंजस्य निर्माण होतं."
 
राहुल गांधींमध्ये लवचिकतेचा अभाव
बीबीसीशी बोलताना रशीद किडवाई सांगतात की, "राहुल गांधींनी बाहेर बघण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा आदर्श घेतला पाहिजे. राजकीय पक्षांचा विरोध हाताळण्याची कला जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांना चांगल्या प्रकारे अवगत होती. इंदिरा गांधींनी तर सावरकरांचं टपाल तिकीट काढलं होतं."
 
त्यामुळे बऱ्याच राजकीय विश्लेषकांना वाटतं की, राहुल गांधींना राजकारणात आवश्यक असलेली वैचारिक लवचिकता अंगिकारणं आवश्यक आहे, आणि तरच ते इतर पक्षांना सोबत घेऊन जाऊ शकतील.
 
ज्येष्ठ पत्रकार एनके सिंह यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचं उदाहरण देत सांगितलं की, उत्तरप्रदेशात तिकीट वाटपाच्या वेळी अखिलेश यादव यांनी राहुल गांधींना 'मोठ्या पक्षाने मोठं मन दाखवावं' असा सल्ला दिला होता.
 
एन. के. सिंह यांच्या मते, राजकारणात जेव्हा अनेक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचं आव्हान असतं तेव्हा हा मोठा मंत्र कामी येतो.
 
रशीद किडवाई सांगतात की, एक परिपक्व राजकारणी नेहमीच आपण जे बोलतोय त्याचं नेमकं औचित्य काय आहे? याचं मोजमाप ठेवत असतो.
 
आणि एका चुकीमुळे अडवाणी बाजूला पडले..
ते पुढे म्हणाले की, "हीच चूक लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावेळी केली होती. या दौऱ्यात त्यांनी मोहम्मद अली जिना यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटलं होतं. कधीकधी गोष्टी बरोबर असतात पण, कधी काय बोलायचं हे समजलं पाहिजे. याचा परिणाम काय झाला? तर अडवाणी राजकारणातून बाजूला पडले."
 
ते सांगतात की, वैचारिक मतभेद असूनही बाळासाहेब देवरस आणि नानाजी देशमुख यांनी 1984 मध्ये 'ऑपरेशन ब्लू स्टार'साठी इंदिरा गांधींचं कौतुक केलं होतं.
 
राहुल गांधी अनेकवेळा विचार न करताच बोलतात, असा आरोप विरोधक करतात.
 
यावर रशीद किडवाई म्हणतात, "कदाचित हेच कारण असावं की, राहुल गांधी त्याच आपुलकीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटताना दिसत नाहीत. राजकारणात जर तुम्हाला इतर पक्षांना सोबत घेऊन जायचं असेल तर तुम्हाला त्या पक्षांच्या विचारसरणीचा आदर करावा लागतो. तुम्ही ते ही करत नसाल तर किमान त्यांना दुखावण्याचा प्रयत्न तरी करू नका."
 
भाजपच्या हिटलिस्टवर राहुल गांधी
पण हे देखील तितकंच खरं आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्यांमुळे भाजपला आयतं कोलीत मिळतं.
 
गांधीच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांव्यतिरिक्त अनेक मंत्र्यांनी सोशल मीडिया गाठून राहुल गांधींवर टीका केली.
 
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "तुम्ही स्वप्नात देखील सावरकर होऊ शकत नाही, कारण त्यासाठी खूप आत्मविश्वास, देशावर प्रेम, निस्वार्थीपणा आणि वचनबद्धता असावी लागते."
 
त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्याचं निमित्त साधत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडलं.
 
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते म्हणाले की, लवकरच महाराष्ट्रभर 'सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येईल. या यात्रेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी दिलेलं योगदान जनतेपर्यंत नेण्याचं काम केलं जाईल.
 
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खडाजंगी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे आरोप केलेत की, संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राहुल गांधींनी सावरकरांचा सातत्याने अपमान केला. तर दुसऱ्या बाजूला याच राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द झालं म्हणून उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी निषेध म्हणून काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरेंचे खासदार गप्प बसले होते.
 
यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे बीबीसीशी बोलताना सांगतात की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वातावरण तयार करत आहेत. पण यातून काहीही साध्य होणार नाही.
 
मनीषा कायंदे पुढे सांगतात की, "आज आठ वर्ष झाली सावरकरांना भारतरत्न का मिळाला नाही? जनता हा प्रश्न भाजपला विचारेल. केवळ मतांसाठी सावरकरांचं नाव वापरलं जातं. गोवा, नागालँड आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये गोमांस संदर्भात भाजपचं धोरण काय आहे, असे प्रश्नही जनता त्यांना विचारेल."
 
मनीषा कायंदे सांगतात की, राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
 
त्या पुढे सांगतात की, आमच्या पक्षासाठी सावरकर नेहमीच पूजनीय आहेत. जर काँग्रेस नेत्यांनी अशी वक्तव्यं करणं सुरूच ठेवलं आणि इतर मित्रपक्षांच्या भावनांचा अनादरच केला, तर विरोधकांची एकजूट एक स्वप्न बनूनच राहील.
Published By -Smita Joshi