केरळमध्ये पावसाचे थैमान, ७२ठार
केरळमध्ये पावसाचे थैमान सुरूच असून आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात नागरिक अडकलेले आहेत. वायुदलाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पथानामथिट्टा जिल्ह्यात हवाईदलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवून सुरक्षित स्थळी नेलं आहे. कोच्ची विमानतळावर शनिवारपर्यंत विमानसेवा ठप्प असणार आहे. केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांमध्ये अॅलर्ट जारी केला आहे. केरळच्या उत्तरेच्या कासरगोडपासून दक्षिणेकडील तिरूवनंतपुरम पर्यंत सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे दक्षिण रेल्वे आणि कोच्ची मेट्रोची सेवाही बंद केली आहे. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे.