शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:46 IST)

सोमवारपासून विशेष राजधानी धावणार

येत्या सोमवारपासून विशेष राजधानी चालू होत आहे.  आठवडय़ातून तीन दिवस धावणाऱ्या या विशेष राजधानीचे भाडे सध्याच्या लवचीक भाडेरचनेच्या  (फ्लेक्झी फेअर) तुलनेत पाचशे ते आठशे रुपयांनी स्वस्त असणार  . विशेष म्हणजे या गाडीने प्रवास केल्यास दोन तासही वाचतील. 

रेल्वेसाठी सर्वाधिक व्यस्त असलेल्या मुंबई-दिल्ली या मार्गावर सध्या दोन राजधानी गाडय़ांसह सुमारे तीस एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. पण तरीही मोठी मागणी असतेच, हे लक्षात घेऊन रेल्वेने तिसरी विशेष राजधानी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याला सोमवारी हिरवा झेंडा दाखविला जाईल. थांब्यांची संख्या तीन स्थानकांएवढीच (कोटा, बडोदा, सुरत) ठेवल्याने आणि ५४०० अश्वशक्तीचे दोन ‘लोकोमोटिव्ह’चा वापर केल्याने या गाडीला फक्त १३ तास ५५ मिनिटांचा वेळ लागेल. सध्या १५ तास ५० मिनिटांचा वेळ राजधानीला लागतो.

सध्या राजधानी गाडय़ांचे तिकीट हे मागणीवर आधारित असलेल्या लवचीक भाडेरचनेनुसार (फ्लेक्झी फेअर) आकारले जाते. रेल्वेच्या दाव्यानुसार, नव्या गाडीच्या तृतीय वातानुकूलित श्रेणीचे (थर्ड एसी) भाडे सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी होईल, तर द्वितीय वातानुकूलित (सेकंड एसी) श्रेणीचे तिकीट ७०० ते ८०० रुपयांनी कमी होईल. मात्र हे भाडे सध्याच्या राजधानीच्या मूळ भाडय़ाच्या तुलनेत वीस टक्क्यांनी जास्त असेल.