मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 25 जुलै 2022 (14:58 IST)

रेखा आर्य: भाजप मंत्र्याचा आदेश, 'शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि फोटो पाठवा'

rekha arya
उत्तराखंडच्या महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्य त्यांनी केलेल्या विधानांमुळे आणि दिलेल्या विचित्र आदेशांमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, त्यांच्या विभागातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. त्यांच्या या आदेशावर अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ असून काँग्रेसने रेखा आर्य यांच्या आदेशावर जोरदार निशाणा साधलाय.
 
याआधी सुद्धा त्यांच्या विभागाने असाच एक आदेश जारी केला होता. यानुसार बरेली येथील मंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानी आयोजित धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला होता. त्यावरून वाद निर्माण झाल्यावर रेखा आर्य म्हणाल्या होत्या की, त्यांनी कोणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून यायला सांगितलं नव्हतं.
 
'शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि फोटो पाठवा'
महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्य यांनी 20 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन लैंगिक असमानतेविरोधात कावड यात्रा काढण्याची घोषणा केली होती. ही यात्रा हरिद्वार येथील हर की पौडी मार्गे निघणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याच दिवशी त्यांच्या वतीने अजून एक आदेश जारी करण्यात आला होता.
 
आदेशात म्हटलं होतं, "या ठरावाची पूर्तता करण्यासाठी 26 जुलै 2022 रोजी सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, सहाय्यकांनी त्यांच्या जवळच्या शिवालयात जाऊन जलाभिषेक करून ही मोहीम पुढे न्यावी. कार्यक्रमाशी संबंधित फोटो विभागीय ईमेल आयडीसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून विभागाचा संकल्प पूर्ण करावा."
 
मधला मार्ग
उत्तराखंडच्या राज्य कर्मचारी संयुक्त परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अरुण पांडे यांनी या आदेशावर आश्‍चर्य व्यक्त केलं. ते म्हणतात की, "कावड यात्रा किंवा कोणतेही धार्मिक कार्य हा पूर्णपणे व्यक्तीच्या श्रद्धेचा आणि वैयक्तिक विषय असतो. तो ज्याचा त्याने ठरवायचा असतो."
 
मात्र, फिल्डवर काम करणाऱ्या काही महिला अंगणवाडी सेविका मधला मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत.
 
फामिदा खातून या देहरादूनमधील बुलाकीवाला-3 अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी अंगणवाडी सेविकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मंत्र्यांचे आदेश मिळाले.
 
त्या म्हणतात, सरकारी आदेशाचं पालन तर करावं लागेल. त्यामुळे आम्ही मधला मार्ग काढलाय. त्या सांगतात, "आमच्या सहकारी अंगणवाडी सेविका शिवलिंगाला जल अर्पण करतील आणि त्या त्यांच्यासोबत फोटो काढतील."
 
खाजगी धार्मिक कार्यक्रमासाठी सरकारी निमंत्रण
यापूर्वी 20 जुलै रोजी रेखा आर्य यांच्या सरकारी निमंत्रण पत्राच्या प्रकरणानंतर वादंग निर्माण झाला होता. मंत्री रेखा आर्य यांच्या बरेली येथील खाजगी निवासस्थानी एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अन्न आणि पुरवठा विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमंत्रित केलं होतं.
 
विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या या निमंत्रण पत्रात अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनाही हे निमंत्रण पत्र द्यावं अशा सूचना होत्या.
 
हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण माहरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशा आदेशांना स्थगिती देण्याची मागणी केली होती.
 
ते म्हणाले की, "तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या घरी कोणत्याही कार्यक्रमाला किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला निमंत्रण देऊ शकता. पण सरकारी उच्च अधिकार्‍यामार्फत तुम्ही अधीनस्थांना आदेश जारी करू शकत नाही."
 
"हे पत्र सरकारी पत्र असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात पाऊस सुरू आहे अशातच कावड यात्रा सुरू आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कुठे ही जाऊ नये असं खुद्द मुख्यमंत्री महोदय सांगत असताना कर्मचाऱ्यांनी बरेलीला यावं हा आदेश कसा काय दिला जातो? हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं उल्लंघन आहे. यातून नव्या प्रथा सुरू होतील आणि भ्रष्टाचाराला चालना मिळेल," असंही ते म्हणतात.
 
'डोक्यावर बंदूक ठेवून आदेश दिले नाहीत'
काँग्रेसच्या या विरोधानंतर पत्रकारांनी रेखा आर्य यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नव्या एका वादाला तोंड फोडलं.
 
रेखा आर्य म्हणाल्या, "रेखा आर्यने निमंत्रण दिलं आहे. डोक्यावर बंदूक ताणली नाही. कार्यालयाने निमंत्रण दिलंय आणि ते ऐच्छिक आहे. या पुण्य कार्यक्रमाला तुम्ही तुमच्या इच्छेने येऊ शकता. कोणावरही यासाठी जबरदस्ती करण्यात आलेली नाही."
 
रेखा आर्य यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्त्या गरिमा मेहरा दसौनी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "तुम्ही मंत्री आहात, किमान पदाची प्रतिष्ठा तरी राखा. गुंड-मवाल्यांची भाषा कशासाठी वापरताय?"
 
दसौनी असं ही म्हणाल्या की, "रेखा आर्य चर्चेत राहण्यासाठी आणि स्वस्तातली लोकप्रियता मिळवणारी काम करतात. नवा आदेश आणि त्यांची विधानं बघून त्यांचा स्वभाव समजतो."
 
वरिष्ठ पत्रकार योगेश भट्ट म्हणतात की, "हे असे निर्णय बघून कळत नाही की, या मंत्र्यांना खरंच काही समजत नाही का की ते खूप बेफिकीर आहेत?"
 
रेखा आर्य आणि आयएएस अधिकारी
योगेश भट्ट सांगतात की, "अन्न विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीएस पांगती यांनी मात्र हुशारी दाखवत आपला आदेश काढला. त्यांनी त्यांच्या आदेशात विभागीय मंत्र्यांच्या कार्यालयातून सूचनांसह निमंत्रण पत्रे प्राप्त झाली आहेत मात्र सर्व आयएएस तसं करू शकत नसल्याचं म्हटलं."
 
रेखा आर्य यांचं त्यांच्या डिपार्टमेंटमधल्या आयएएस अधिकार्‍यांशी ट्युनिंग जुळत नाहीये. अन्न विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून रेखा आर्य आणि त्यांच्या विभागातील सचिव आयएएस सचिन कुर्वे यांचं भांडण झालं होतं. हे प्रकरण इतकं वाढलं की रेखा आर्य यांनी सचिवांचा एसीआर मागवला होता.
 
यापूर्वी त्रिवेंद्र सिंह रावत, तीरथ रावत आणि पुष्कर सिंह धामी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असलेल्या रेखा आर्य यांचं बऱ्याच वरिष्ठ अधिकार्‍यांशी वाजलं आहे. यात राधा रतुरी, सौजन्या, झरना कामथन, सुजाता सिंग, सविन बन्सल, षणमुगम यांच्याशी तर टोकाची भांडण झाली. या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत काम करायलाच नकार दिला होता.
 
यावेळी मात्र रेखा आर्य यांचा लौकिक वाढला असून त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदी झेप मारली आहे. पण सोबतच त्यांनी दिलेल्या आदेशांवरून आणि विधानांमुळे त्यांच्याशी संबंधित वादही वाढले आहेत.