1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (09:23 IST)

'भांडणादरम्यान तिनं त्याच्या कानफडात लगावली मग त्यानं तिचा खून केला'

murder
बीबीसी गुजराती टीम
 राजकोटच्या पडधरी तालुक्यातील खमटा गावाजवळ जळालेल्या अवस्थेत संशयास्पद अवशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
9 ऑक्टोबरला हे अवशेष सापडले.
 
प्रथमदर्शनी हे अवशेष जळालेल्या ट्रॉली बॅगचे असल्याचं दिसून आलं. मात्र त्यामध्ये मानवी अवशेषही आढळून आल्याने पोलिसांना हे हत्येचं प्रकरण असल्याचं समजलं आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.
 
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा छडा लावणं आव्हानात्मक होतं कारण पोलिसांकडे कोणताही पुरावा किंवा तक्रार नव्हती.
 
पोलिसांनी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपास आणि इतर चौकशी सुरू ठेवली. तपासात त्यांना ट्रॉली बॅगचा ब्रँड कळला आणि ती खूप महागडी बॅग असल्याचं कळलं.
 
राजकोटमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉली बॅगची विक्री करणारे फार कमी दुकानदार होते म्हणून पोलिसांनी सर्व दुकानांमध्ये जाऊन चौकशी केली.
 
त्यावरून या प्रकारची ट्रॉली बॅग खरेदी करणाऱ्या 27 जणांची यादी तयार करून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
 
यापैकी 26 जणांनी खरेदी केलेल्या ट्रॉली बॅग पोलिसांना दाखवल्या. जिच्याकडे ही बॅग नव्हती अशी एकच व्यक्ती समोर आली.
 
दरम्यान, आणखी एका चालू तपासणीत, फॉरेन्सिक तज्ज्ञांना आढळलं की गुन्हा झालेल्या ठिकाणी एसयूव्ही गाडीच्या टायरचे छापे होते.
 
ज्या व्यक्तीकडे बॅग नव्हती त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक एसयूव्हीही असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांच्या संशयाला अधिक बळकटी मिळाली.
 
पडधरी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या व्यक्तीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले.
 
मेहुल चोटलिया या व्यक्तीने पोलिसांच्या सखोल चौकशीत एका महिलेची हत्या केल्याची कबुली दिली.
 
नेमकं काय घडलं?
मेहुल चोटलिया यांनी ज्या महिलेची हत्या केली ती अहमदाबादची रहिवासी असून तिचे नाव अल्पा उर्फ आयेशा मकवाना होते.
 
मेहुल चोटलिया (वय 32 वर्षे) हा आयशासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता आणि तो राजकोटमधील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता.
 
तपास अधिकारी जी. जे. झाला यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "दोघंही गेल्या 18 महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तपासात कळलं की, दोघांमध्ये 6 ऑक्टोबरला काही गोष्टींवरून वाद झाला होता."
 
"त्या भांडणात आयेशाने त्याला कानफाडात मारली. या भांडणानंतर मेहुलने हत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय."
 
बीबीसी गुजरातीचे पत्रकार बिपिन टंकारिया यांना मिळालेल्या माहितीनुसार, आयेशाची हत्या केल्यानंतर त्याने तीन दिवस मृतदेह घरातच ठेवलेला. त्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्याने त्याची विल्हेवाट लावण्याचं ठरवून खामटा गावाच्या सीमेजवळ एका निर्जन ठिकाणी त्याने तो जाळला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “महिलेची उंची कमी असल्याने तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून त्याला जाळण्याचा निर्णय त्याने घेतला."
 
“जाळण्यासाठी त्यानं लाकडंसुद्धा आणली होती. 8 ऑक्टोबर रोजी त्यांने ट्रॉली बॅग कारमध्ये टाकली आणि पडधरीजवळील निर्जन ठिकाणी पेट्रोल शिंपडून मृतदेह जाळून टाकला."
 
दुसऱ्या दिवशी तिथे काही अवशेष दिसत आहेत की नाही हे तपासण्यासाठी आरोपी पुन्हा घटनास्थळी पोहोचला. मात्र पोलीस आधीच तिथे पोहोचले होते. मृतदेह पूर्णपणे जळाला नसल्याने ही बाब उघडकीस आली.
 
पोलीस काय म्हणाले?
पडधरी पोलीस स्टेशनने बीबीसी गुजरातीचे बिपीन टंकारिया यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
 
टंकारिया यांना मिळालेल्या माहितीनुसार, खामटा गावातील वनराजभाई राठोड यांनी पडधरी पोलीस ठाण्यात फोन करून मानवी हाडं दिसल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी पोहचून या प्रकरणाचा तपास करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
 
पोस्टमॉर्टममध्ये मृत महिलेचे वय 17 ते 30 वर्षे असल्याचं समोर आलंय.
 
सुमारे पंधरा दिवसांच्या तपासानंतर पोलीस आरोपी मेहुल चोटलियापर्यंत पोहोचले आणि चौकशीत आरोपीने आयेशा नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिली.
 
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अल्पा उर्फ आयेशासोबत तो लिव्ह-इनमध्ये राहत होता आणि वाद सुरू असताना आयेशाने त्याला दोनदा कानाखाली मारल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला.
 
त्यानंतर तीन दिवसांनी तिचा मृतदेह खामटा गावाच्या सीमेजवळ एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यावर लाकडं रचून आणि पेट्रोल शिंपडून आग लावल्याची कबुली आरोपीनं दिली.
 
पोलिसांनी आरोपीची सात दिवसांसाठी कोठडीत रवानगी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.