1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (20:23 IST)

Statue of Equality: रामानुजाचार्य कोण होते? त्यांच्या पुतळ्यावरुन का टीका होत आहे?

बाला सतीश
हैदराबादला लागून असणाऱ्या शमशाबादजवळ मुच्छिंतळा या गावात रामानुजाचार्यांचा एक पुतळा उभारण्यात आला आहे.
 
हा भारतातील दुसरा आणि जगातील 26वा सर्वांत उंच पुतळा ठरेल, असं हे बांधकाम करणारे लोक सांगतात.
 
वैष्णवपंथी साधू त्रिदंडी चिन्ना जीया स्वामी त्यांच्या आश्रमात हा पुतळा बांधण्यात आला. 2014पासून सुरू असलेलं पुतळ्याचं बांधकाम अखेरीस 2021 साली पूर्ण झालं.
 
रामानुजाचार्यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
पुतळ्याची वैशिष्ट्यं
मुख्य पुतळ्याची उंची 108 फूट आहे. त्यातील त्रिदंड (वैष्णव पीठाधिपती सर्वसाधारणतः असा दंड धारण करतात) 135 फुटांचा आहे.
 
चौथऱ्याची उंची 54 फूट आहे. पद्मपीठाची उंची 27 फूट आहे. तळातील चौथऱ्यासकट पुतळ्याची उंची 216 फूट इतकी आहे.
 
चौथऱ्यावर 54 कमळाच्या पाकळ्या आहेत, त्यावर 36 हत्तींची शिल्पं आहेत. कमळावर 18 चक्रं आहेत. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी 108 पायऱ्या आहेत.
 
विविध द्रविडी साम्राज्यांच्या शिल्परूपी खुणा या पुतळ्यावर पाहायला मिळतात. रामानुजाचार्य ध्यान करत बसले आहेत, अशा स्थितीमधील हा पुतळा आहे.
 
या पुतळ्यासाठी 120 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्याची निर्मिती भद्रपीठम इथे झाली. रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आलं.
 
या पुतळ्यासोबतच सदर मठाच्या आवारामध्ये 108 लहान मंदिरंही उभारण्यात आली आहेत. वैष्णव पंथीय लोक या 108 मंदिरांना विष्णूचे 108 अवतार मानतात.
 
होयसळ शैलीमध्ये काळ्या दगडात या मंदिरांचं बांधकाम झालं आहे. त्यात एकूण 468 स्तंभ आहेत. विविध ठिकाणच्या शिल्पकारांनी व तज्ज्ञांनी यासाठी योगदान दिलं आहे.
 
हा पुतळा आणि मंदिर यांच्या व्यतिरिक्त रामानुजाचार्यांच्या जीवनाचं प्रदर्शन दाखवणारं संग्रहालय, एक वैदिक ग्रंथालय, परिसंवादांसाठी सभागृह व ओम्निमॅक्स थिएटर, आदी वास्तूंचंही बांधकाम करण्यात आलं आहे.
 
या पुतळ्याला 'समता मूर्ती' असं नाव देण्यात आलं आहे. "जग सर्वांसाठी अधिक समतापूर्ण व्हावं यासाठी एक स्फूर्तिदायक सांस्कृतिक चिन्ह म्हणून आम्ही समता मूर्तीची उभारणी केली आहे.
 
वसुधैव कुटुंबकम् हा तत्त्वविचार पसरावा या दृष्टीने आम्ही रामानुजाचार्यांच्या एक हजाराव्या जयंतीचे कार्यक्रम करतो आहोत.
 
रामानुजांनी लाखो लोकांना सामाजिक भेदभावांपासून मुक्त केलं होतं," असं चिन्न जीयार म्हणाले.
 
कोट्यवधींचा खर्च
या प्रकल्पावर एक हजार कोटी रुपये खर्च झाल्याचं आयोजक म्हणतात. संपूर्ण प्रकल्प 45 एकरांवर पसरलेला आहे.
 
विख्यात उद्योगपती जुपल्ली रामेश्वर राव यांनी ही जमीन दान केल्याचं तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
एक हजार कोटी रुपये पूर्णतः देणग्यांमधून गोळा केल्याचं जीयार इंटिग्रेटेड वेदिक अकॅडमीने (जीवा) सांगितलं.
 
मुख्य पुतळ्यासाठी 130 कोटी रुपयांचा खर्च आल्याचं संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं.
 
मेड-इन-चायना
निन्जियांगमधील चेन्गुआंग समूहाचा भाग असणाऱ्या एरोजन कॉर्पोरेशन या कंपनीने या पुतळ्याच्या बांधकामात मोठी भूमिका पार पाडली आहे.
 
या कंपनीने जगभरात अनेक मोठे पुतळे बांधले आहेत. या पुतळ्याच्या बांधकामासाठी सात हजार टन पारंपरिक पंचधातू वापरण्यात आले, असं आयोजकांनी सांगितलं.
 
या पुतळ्याच्या बांधकामासाठीचा करार जीवा आणि एरोजन कॉर्पोरेशन यांच्यात 14ऑगस्ट 2015 रोजी झाला.
 
अनेक भारतीय कंपन्याही या पुतळ्याच्या उभारणीमध्ये रस घेत होत्या, पण अखेरीस चीनमधील कंपनीची निवड करण्यात आली.
 
रामानुजाचार्य कोण आहेत?
"सर्वांची दुःखं दूर करण्यासाठी मला एकट्याला नरकात जावं लागलं, तरी मी आनंदाने तिथे जाईल. सर्व ईश्वरासमोर समान आहेत.
 
प्रत्येक जातीला ईश्वरनामाचा अधिकार आहे. कोणत्याही जातीतील माणसाला मंदिरात जायचा अधिकार आहे"- असे विचार त्यांनी वेळोवेळी मांडले.
 
हिंदू भक्ती परंपरेतील रामानुजाचार्य हे एक महत्त्वाचे तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म इसवीसन 1017 मध्ये झाला आणि 1137 मध्ये त्यांचं निधन झालं.
 
तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर इथल्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या रामानुजाचार्यांनी कांचीपुरम इथे शिक्षण घेतलं.
 
तिथे ते वरदराज स्वामी यांचे अनुयायी म्हणून राहिले. त्यांची कर्मभूमी श्रीरंगम ही होती.
 
त्यांनी विशेषाद्वैत सिद्धान्त मांडला. या विचारांचे अनुयायी वैष्णव मानले जातात. या पंथाथील साधूंना जीयार म्हटलं जातं.
 
वेदार्थ, संग्रहम, श्री भाष्यम्, गीता भाष्यम्, इत्यादी रामानुजाचार्य यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाशी त्यांची तीव्र असहमती होती.
 
अष्टाक्षरी मंत्र इतर कोणाला सांगू नये, असा नियम असतानाही रामानुज यांनी मंदिराच्या सज्जातून मोठ्याने या मंत्राचं पठण केलं आणि हा मंत्र ऐकणाऱ्यांना वरदान लाभेल, तर दुसऱ्याला ऐकण्याची बंदी करणाऱ्यांना शाप मिळेल, असंही त्यांनी जाहीर केलं.
 
तिरुमाला तिरुपती देवस्थानात त्यांनी पूजेची व्यवस्था केली आणि त्यासाठी जीयारांची नियुक्ती केली. काही मंदिरांमध्ये दलितांच्या प्रवेशासाठीही त्यांनी काम केलं.
 
कनिष्ठ जातींमधील लोकांना त्यांनी वैष्णव पंथामध्ये सामावून घेतलं. काही कनिष्ठ जातीय लोकांना त्यांनी मंदिरांमध्ये पुरोहितसुद्धा केलं.
 
महायज्ञ
पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी महायज्ञ केला जाणार आहे. या श्री लक्ष्मी नारायण महायज्ञासाठी 144 होमशाला,1035 कुंभ वापरले जाणार असून पाच हजार वैदिक पंडित त्यात सहभागी होणार आहेत.
 
हा यज्ञ चौदा दिवस चालणार असून नऊ वैदिक संप्रदायांमधील मंत्रांचं पठण या वेळी होणार आहे.
 
नारायण अष्टाक्षरी मंत्राचं पठण एक कोटी वेळा होईल. या यज्ञासाठी देशी गायीचं 1.5 लाख शुद्ध तूप गोळा करण्यात आलं आहे. चार प्रकारच्या झाडांच्या समीधा जमवण्यात आल्या आहेत.
 
पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारीला या 216 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करणार असून 13 फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद 120 किलो सोन्याच्या मूर्तीचं अनावरण करतील.
 
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, सरसंघचालक मोहन भागवत, आदी मंडळी 14 दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
 
समाजमाध्यमांवरील चर्चा
परंतु, इतका मोठा पुतळा उभारून त्याला 'समता मूर्ती' असं नाव देण्यावरून मोठ्या प्रमाणात वादचर्चा होत आहेत.
 
रामानुजाचार्यांनी काही प्रगतिशील मूल्यं शिकवली असली, तरी त्याचा जातिव्यवस्थेवर काही परिणाम झाला नाही, असं काही लोकांनी समाजमाध्यमांवर नमूद केलं आहे.
 
त्याचवेळी, पुतळ्याची उभारणी होत असताना चिन्न जीयार यांनी केलेली काही विधानंही वादग्रस्त ठरली होती. "जाती जायला नकोत. जातिव्यवस्था असायला हवी. प्रत्येक जातीने आपापलं काम करावं", हे त्यांचं विधान वादग्रस्त ठरलं होतं.
 
उस्मानिया विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक के. श्रीनिवासुलू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "समाजावर सकारात्मक परिणाम केलेले समाजसुधारक व इतर व्यक्तींची आठवण काढण्यासाठी पुतळे उभारले जातात. पण हजारो कोटी खर्चून असे महाकाय पुतळे उभारण्यापेक्षा रामानुजाचार्यांच्या नावाने एखादं विद्यापीठ काढलं असतं किंवा संशोधन केंद्र उघडलं असतं, तर ते सयुक्तिक ठरलं असतं. अमेरिका व युरोप इथे असं केलं जातं. महनीय व्यक्तींच्या नावाने तिथे संशोधन केलं जातं. या एक हजार कोटी रुपयांमधून समाजाला थेट लाभदायक असं काही झाल्यास चांगलं होईल."