बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 जुलै 2023 (15:15 IST)

श्रीहरीकोटामधून चंद्रयान-3चं यशस्वी लॉन्च

chandrayaan
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चंद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं.दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण झालं.
615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे.
 
'चांद्रयान-3' पाठवण्यासाठी एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल.
 
त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत आणि आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल असंही म्हटलं आहे.
चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2 या सुरुवातीच्या दोन मोहिमांनंतर तिसऱ्यांदा भारत या दिशेनं प्रयत्न करत आहे.
 
याआधी 2019 मध्ये चंद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये यश आलं नव्हतं. त्यामुळेच चंद्रयान-3 मोहीम भारतासाठी महत्त्वाची मानली जात असून या मोहिमेकडून अनेक अपेक्षा आहेत.
 
पण आताची ही मोहीम यशस्वी होण्याची शक्यता किती आहे? चंद्रयान-3 मध्ये कोणते बदल झाले आहेत? कोणत्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे? या मोहिमेचा उद्देश काय आहे? अशा अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसीने डॉ. आकाश सिन्हा यांच्याशी बातचीत केली.
 
डॉ.आकाश सिन्हा हे अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोट्स, ड्रोन या विषयात तज्ज्ञ आहेत. ते शिव नादर विद्यापीठात शिकवतात.
 
खाली दिलेले सर्व प्रश्न आणि उत्तरं त्यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित आहेत.
 
1. चंद्रयान-3 हे चंद्रयान-2 च्या मार्गाने जाणार नाही याची किती शक्यता आहे? त्यासाठी यावेळी काय बदल केले आहेत?
 
गेल्या 50 वर्षांत अनेक मोहिमा आखल्या गेल्या आणि अंमलात आणल्या गेल्या. पण चंद्रयान-1 ने पहिल्यांदाच चंद्रावर पाण्याचा शोध लावला. त्यावेळी जरी त्याचे लँडर बाहेर येऊ शकले नाही, तरी यावेळी आम्हाला खात्री आहे की ते बाहेर येईल.
 
या विश्वासामागील कारण म्हणजे लँडरसाठी जे तंत्रज्ञान वापरले गेलं होतं, त्यात आता खूप बदल केले आहेत.
 
2. चंद्रयान-3 चा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, ज्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या भागात उतरणं किती अवघड आहे? यात काय समस्या उद्भवू शकतात? यशस्वीपणे उतरलं तर भारतासाठी ती किती मोठी गोष्ट असेल?
 
आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्राचा एक आव्हानात्मक भाग निवडला आहे. या भागाला लुनर साउथ पोल म्हणतात. याची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीवरून त्यावर थेट नजर ठेवणं कठीण काम आहे.
 
इथं पाणी आणि इतर खनिजं असण्याची दाट शक्यता आहे.
 
3. चंद्रयान-3 चा उद्देश काय आहे?
 
या मोहिमेत चंद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचं स्थान निश्चित केलं जाईल. इथंच रोव्हर चंद्राच्या या भागात कोणते खनिजं आहेत, पाणी आहे का, इत्यादीचा शोध घेईल.
 
भविष्यात कधी चंद्रावर वसाहती स्थापन करायच्या असतील, तर यामुळे खूप मदत होईल. ही या शोधाची खास गोष्ट असेल.
 
4. अशा मोहिमेचा सर्वांत मोठा धोका कोणता असू शकतो?
 
पहिला धोका म्हणजे जेव्हा तुम्ही चंद्रावर वाहन पाठवता तेव्हा ते पूर्णपणे संगणकाद्वारे नियंत्रित केलं जातं. माणूस म्हणून 4 लाख किलोमीटर अंतरावर बसून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. हे पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं कार्य करतं.
 
दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रावर जीपीएस नाही. जसं आपण गाडी चालवताना जीपीएसच्या माध्यमातून माहिती मिळते, तसं चंद्रावर नाही. चालकविरहित कार जीपीएस तंत्रज्ञानानं काम करतात. पण चंद्रावर ते काम करू शकत नाही.
 
तिथं तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठे आहात, कोणत्या भागात आहात, किती दूर आहात? ऑनबोर्ड सेन्सर्सवरून या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यायचा असतो. यामुळे दोन-तीन नव्या अडचणी निर्माण होतात. चांगली गोष्ट म्हणजे यावेळी या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे.
5. चंद्रयान-2 ची किंमत हॉलीवूड चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी होती आणि चंद्रयान-3 मोहिमेची किंमत त्यापेक्षा 30% कमी आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी हे कसं साध्य केलं?
 
आपल्याकडील संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करा, शक्य असल्यास त्यांचा पुनर्वापर करा, असं आपल्याला नेहमीच एक शिकवलं जातं.
 
चंद्रयान-2 पाठवलं होतं, तेव्हा त्याचे तीन भाग होते. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर. ऑर्बिटर यशस्वी झालं आणि ते अजूनही चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. यावेळी जेव्हा आपण चंद्रयान-3 पाठवत आहोत, तेव्हा ऑर्बिटर आधीपासूनच तिथं असल्यामुळे ऑर्बिटरचा वेगळा प्रयोग करत नाही आहोत. अशापरिस्थितीत ऑर्बिटरचा संपूर्ण खर्च यावेळी वाचला आहे.
 
इस्रोची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक कामं इन-हाऊस केले जातात. म्हणजेच इस्रो स्वतःहून बरेच तंत्रज्ञान विकसित करतं. यामुळे आपण कमी खर्चात एक मोठी मोहीम राबवत आहोत.


Published By- Priya Dixit