शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2020 (16:05 IST)

पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोरच्या शाही परिवाराचाच अधिकार

केरळमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यामध्ये न्यायालयानं अखेर आज निकाल दिला आहे. या निकालानुसार पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोरच्या शाही परिवाराचाच अधिकार असेल. या मंदिरावरच्या अधिकारांवरून काही वर्षांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. मंदिराच्या आत असलेल्या ७ कक्षांमध्ये लाखो कोटींची संपत्ती असल्याचे दावे केले जात आहेत. त्यातले काही दरवाजे उघडल्यानंतर आत मोठी संपत्ती देखील सापडली असून अजूनही काही दरवाजे उघडले गेलेले नाहीत. दरम्यान, या निर्णयानंतर राज्य सरकारला पद्मनाभस्वामी मंदिरावरचा आपला हक्क सोडावा लागणार आहे.
 
श्री पद्मनाभस्वामी मंदिराबाबत अनेक गूढ गोष्टी आजपर्यंत कायम आहेत. हे मंदिर नक्की कधी बांधलं गेलं, याविषयी अनेक तर्क आहेत. काहींच्या मते मंदिर ५००० वर्ष जुनं आहे, तर काहींच्या मते हे मंदिर १६व्या शतकात बांधण्यात आलं आहे. ऐतिहासिक दस्तावेजांनुसार १८व्या शतकात त्रावणकोरच्या शाही घराण्याचे महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत:ला पद्मनाभस्वामींचे दास म्हणून जाहीर केलं होतं. तेव्हापासून या मंदिराचे अधिकार याच घराण्याकडे आहेत. मंदिराच्या आवारात असलेल्या ७ कक्षांमध्ये अमाप संपत्ती असल्याचं देखील मोठं गूढ आहे. या कक्षांचे दरवाजे उघडल्यास अघटित होईल अशी दंत कथा आहे. त्यामुळे गेल्या शेकडो वर्षांपासून हे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. शेवटी मंदिराचे अधिकार केरळ सरकारकडे आल्यानंतर हे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. अजूनही काही दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत.