सर्वोच्च न्यायालयाने कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी पंजाबला ट्रान्सफर केली आहे. मात्र न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे. पठाणकोट येथील न्यायालयात प्रकरणाची पुढील सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने या निर्णय दिला आहे. पीडित मृत मुलीच्या कुटुंबीयांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या वकिलाला सुरक्षा पुरविण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. आरोपी सांझी रामसह दोन आरोपींनी या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची आणि प्रकरणाची सुनावणी जम्मूमध्येच व्हावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती, ती याचिका न्यायालयाने फेटळली आहे.