शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'मुंबई' सर्वाधिक तणावाखाली काम करणारे नोकरदार

देशात सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. मुंबईतील सुमारे ३१ % कर्मचारी तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबईतील ३१ % नोकरदार वर्ग तणावाखाली काम करतो. यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीतील २७ % कर्मचारी तणावग्रस्त आहेत. यानंतर बंगळुरु (१४ %), हैदराबाद (११ %), चेन्नई (१० %) आणि कोलकाता (७ %) यांचा क्रमांक लागतो. 

‘तणावाखाली असलेले बहुतांश लोक त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी याबद्दल संवाद साधत नाहीत,’ असे लीब्रेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सौरभ अरोरा यांनी म्हटले. ‘तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भावना मित्र किंवा कुटुंबीयांकडे व्यक्त करण्याची गरज आहे. त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवायला हवी,’ असेही ते म्हणाले. ‘नेमक्या कोणत्या कारणामुळे आपण तणावाखाली आहोत, हे संबंधित व्यक्तीने शोधायला हवे. एकदा कारण शोधल्यावर तणाव कमी करण्यासाठी पावले उचलणे सोपे होते. दीर्घ कालावधीपासून तणाव कायम राहिल्यास गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात,’ असा धोक्याचा इशाराही अरोरा यांनी दिला.