गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (13:32 IST)

मुलगा नाल्यात वाहून गेला, तीन दिवस घेतला शोध; आई-वडील म्हणतात, 'डोळे मिटले तरी तोच दिसतो'

child death
गुवाहाटी येथील नुनमाटी भागातील श्याम नगर मध्ये एक विचित्र प्रकारची शांतता आहे.
 
या भागातील कच्चा रस्ता असणाऱ्या माणिक दास रस्त्यावर थोडं पुढे गेलं की बाहेर लागलेल्या एका तंबूत काही लोक शांत बसलेले दिसतात.
 
घराजवळ पोहोचल्यावर रडण्याचा आवाज तीव्रतेने ऐकायला येतो.
 
हे घर आठ वर्षीय अविनाश सरकारचं आहे, जो चार जुलैच्या रात्री त्याच्या वडिलांच्या स्कूटरवरून घसरून गुवाहाटीच्या एका नाल्यात पडला.
 
सलग तीन दिवस प्रशासनातील बचाव पथकांनी शोध मोहीम सुरू ठेवली. मात्र, अविनाशला वाचवण्यात यश आलं नाही.
 
56 तास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर अविनाशचा मृतदेह घटनास्थळापासून चार किलोमीटर दूर राजगढ भागात रविवारी (7 जुलै) सकाळी सहा वाजता ताब्यात घेण्यात आला.
 
अविनाशच्या वडिलांची परिस्थिती
जांभळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा ट्रॅक पँट घालून एक व्यक्ती शोकमग्न अवस्थेत बाहेर उभा आहे.
 
ते अनेकदा घरातील महिलांना शांत करण्यासाठी काहीतरी बोलतात आणि त्यांच्याबरोबर स्वत:च पुन्हा रडायला लागतात.
 
ही व्यक्ती अविनाशचे वडील होरोलाल सरकार आहेत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ते पावसाचं पाणी भरलेल्या नाल्यात रात्रभर मुलाचा शोध घेत राहिले.
 
होरोलालच्या दोन्ही पायांना प्रचंड जखमा झाल्या आहेत.
 
हळूच आवाजात ते सांगतात, “नाल्यात खूप काचा होत्या.”
 
ही दुर्घटना कशी घडली?
मुसळधार पाऊस कोसळत असलेल्या रात्रीबद्दल बोलताना होरोलाल म्हणतात, “रात्रीचे जवळजवळ 10 वाजले होते. मी गॅरेज बंद करून घरी येत होतो. त्यादिवशी माझा आठ वर्षांचा मुलगाही गॅरेजमध्ये आला होता. माझा 13 वर्षांचा पुतण्याही गॅरेजमध्ये होता. आम्ही तिघंही स्कूटरवरून घरी निघालो होतो. मुलाला समोर बसवलं होतं आणि पुतण्या मागे बसला होता."
 
“माझ्या दुकानाच्या बाजूला फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद होता. त्याशिवाय अनेक ठिकाणी पुराचं पाणी भरलं होतं. त्यामुळे मी ज्योती नगरच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी थोडासा पाऊस येत होता. रस्त्यावरचे दिवे बंद होते. म्हणून रस्त्यावरचं मला नीट दिसत नव्हतं,” होरोलाल सांगतात.
 
“मी जसा ज्योती नगर चौकात पोहोचलो तेव्हा अचानक माझी स्कूटर घसरली आणि तोल गेल्यामुळे माझा मुलगा माझ्या हातून निसटून नाल्यात पडला. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि मीसुद्धा नाल्यात पडलो. नाल्याचा पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता आणि अंधार असल्यामुळे मला काही दिसलं नाही. मी कसाबसा व आलो आणि थोडं दूर जाऊन पुन्हा मुलाला नाल्यात शोधण्याचा प्रयत्न केला पण तो नाही सापडला.”
 
त्यानंतर होरोलाल यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करून मदत मागितली. तो तीन दिवसापर्यंत बचावपथकाबरोबर गुवाहाटीच्या वेगवेगळ्या नाल्यांमध्ये मुलाला शोधत होते.
 
तीन दिवसांचा शोध आणि हाती फक्त निराशा
घरात सातत्याने ज्या महिलांचा रडण्याचा आवाज येत होता त्यात पलंगावर अविनाशची आई कृष्णामणी सरकारही होत्या. त्या आपल्या मुलाचं नाव घेऊन घेऊन रडत होत्या. बाजूच्या पलंगावर दोन दिवसांपासून शुद्ध हरवलेली असलेली अविनाशची म्हातारी आजी (कृष्णामणी यांच्या आई) मालोती दास होत्या. त्यांचीही रडून रडून वाईट अवस्था झाली होती.
 
अविनाशची आजी (वडिलांची आई) होरीदासी सरकार दाराशी बसून हाताने आपले अश्रू पुसत होती.
 
गेल्या काही दिवसांपासून अविनाश बरोबर झालेल्या या प्रकाराने राज्यात दु:खाची लाट आली आहे.
 
अविनाशची आई कृष्णामणी म्हणतात, “तो माझ्याबरोबर बाजारात आला होता. आम्ही आधी नवऱ्याच्या गॅरेजमध्ये गेलो. तिथे माझा पुतण्या शुनूसुद्दधा होता. तो म्हणाला की मी बाबांबरोबर घरी येईन. मी त्याला सोडून आली आणि तो नाही आला. तो का आला नाही? सगळे असताना तो नाल्यात कसा काय पडला? मला अजुनही असं वाटतंय की तो घरी येईल. मी जेव्हाही डोळे बंद करते तेव्हा डोळ्यासमोर धुनू (मुलाचं लाडाचं नाव) येतो.”
 
“त्या तीन दिवसात वेळ जात जात नव्हता. वेदनेने छाती जड झली होती. एके दिवशी नाल्यातून मुलाची चप्पल सापडली तेव्हा तो जिवंत असल्याची आशा होती. तिसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की तो सापडलाय. मी गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये धावत गेली मात्र तिथे गेल्यावर लक्षात आल की आता सगळं संपलंय”
 
“मी त्याचा मृतदेह पाहिला पण तो माझाच मुलगा आहे हे मानायला मन काही तयार नाही. काही दिवसांपूर्वी वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी त्याच्या पायाला एक काळा धागा बांधला होता, तो अजूनही तसाच आहे.”
 
या घटनेसाठी तुम्ही कोणाला दोषी धरता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या म्हणतात, “सरकारने काही काम केलं तर त्यांना ते नीट करायला हवं. नाले बांधले तर झाकण्याचीही व्यवस्था हवी. रस्त्यात अंधार होता. जर रस्त्यावरचे दिवे असते तर माझा मुलगा कदाचित पडताना दिसला असता. नाल्यावर रेलिंगही नव्हतं. माझा मुलगा तर आता परत येणार नाही मात्र पुढे कोणत्याही मुलाचा जीव जायला नको यासाठी सरकारला उपाययोजना करायला हव्यात.”
 
कृष्णामणी जेव्हा हे बोलत होत्या तेव्हा त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आईच्या मोबाइलवर मोठ्या भावाचा फोटो पाहून ‘दादा-दादा’ म्हणत होता.
 
मुलाला शोधायला 56 तास का लागले?
ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी रात्री ऑपरेशन सुरू करणारे राज्य आपत्ती निवारण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की पावसामुळे नाल्यात डोंगरावरून वाहून चिखलमाती बऱ्याच प्रमाणात येत होती. त्यामुळे शोधमोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
 
नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले, “घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी रात्री 12 वाजता एसडीआरएफचे आठ ते नऊ लोक नाल्याच्या आत मुलाला शोधत होती. पावसामुळे नाल्यात किमान सहा फुट उंचीपर्यंत पाणी भरलं होतं. मात्र जेव्हा पाऊस पडला तेव्हा पाणी कमी झालं. सकाळपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होतं पण मुलगा सापडला नाही.”
 
बचावपथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्या ठिकाणी ही घटना झाली त्याच्या खाली दोन किलोमीटरपर्यंत नाल्याच्या वर बहुतांश ठिकाणी झाकण नव्हते. मुलाच्या वडिलांना वाटतंय की नाल्याला झाकण किंवा रेलिंग असते तर आज त्यांचा मुलगा जिवंत असता.
 
या सर्च ऑपरेशनसाठी जो वेळ लागला त्याबद्दल बोलताना एसडीआरएफचे अधिकारी म्हणाले, “शहरात नाल्यांचं जाळं फारच गुंतागुंतीचं आहे. त्याउपर जिथे ही घटना घडली तिथे नाल्याची खोली जास्त होती. मात्र काही भागात नाले चार फुट खोल होते, जिथे बचाव पथकाचे लोक पुढे जात होते.”
 
ते म्हणाले, “ज्या नाल्यावर झाकण होतं, ते हटवून बचाव पथकाला काम करावं लागत होतं. नाल्याच्या वर असलेले स्लॅब उघडून ते पुन्हा लावण्यात बराच वेळ गेला. त्याशिवाय बरेच ठिकाणी नाल्याच्या आत चिखल होता. हा चिखल जेसीबी लावून बाहेर काढण्यात आला.”
 
जेव्हा दोन दिवस मुलगा सापडला नाही तेव्हा सहा जुलैला सकाळी एनडीआरफची टीम त्यांच्या दोन कुत्र्यांसह परिस्थितीचा आढावा घ्यायला आली.
 
जेव्हा या घटनेबद्दल लोकांनी निष्काळजीपणाचा आरोप लावला तेव्हा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा स्वत: परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले.
 
मुख्यमंत्री सरमा यांनी बचाव पथकासह मुलाला शोधत असलेल्या होरोलाल यांना आश्वासन दिलं की ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मुलाला शोधतील.
 
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “गुवाहाटीसारख्या मोठ्या शहरात काही ना काही समस्या असतीलच, जिथे लोकांनी ते लक्षात आणून दिलं आहे तिथे सुधारणा करण्यासाठी योग्य पावलं उचलली गेली आहेत.”
 
“आम्ही गुवाहाटीला पूरमुक्त करण्याच्या प्रयत्नात आहोत. जेव्हा एका भागात पुराचा प्रश्न सुटतो तेव्हा विविध कारणांनी दुसऱ्या भागात पूर येतो. आमचा विभाग या समस्येचं निराकरण करण्यासाठी सतत काम करत आहे.”
 
ते म्हणाले की मुसळधार पावसात वाहने न लावण्यासारख्या सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल जनतेत जागरुकता वाढवण्याची गरज आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाही.
 
त्यानंतर सोमवारी संध्याकाळी (08 जुलै) मुख्यमंत्री सरमा यांनी होरालाल यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि शक्य ती सगळी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
 
या घटनेसंदर्भात सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल आणि उघड्या नाल्याबद्दल विचारल्यावर गुवाहाटी महानगरपालिकेचे महापौर मृदेन सरनिया यांनी बीबीसीला सांगितलं, “गेल्या 45 वर्षांत ज्योती नगर भागात त्या जागेवर अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.”
 
महापौर पुढे म्हणाले, “पावसाचं पाणी शहरातून काढण्यासाठी नालेसफाईवर आम्ही बरंच काम केलं आहे. काही भाग सोडले तर गुवाहाटीत आता एक दोन तासांपेक्षा जास्त वेळ पाणी साचत नाही. ही घटना खूपच वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. शहरात अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच अन्य विभागांशी संपर्क केला जात आहे.”
 
गुवाहाटीच्या महापौरांनी सांगितलं की लोकांना पूर आणि पावसाच्या वेळी सरकारने जारी केलेल्या सूचना ऐकायला हव्यात म्हणजे अशा प्रकारचे प्रसंग ओढवणार नाहीत.
 
अविनाश सरकार या मुलाच्या मृत्युमुळे गुवाहाटी शहरात मॅनहोल आणि उघड्या नाल्यामुळे ज्या लोकांचे जीव गेले त्याची आठवण झाली आहे.
 
2003 पासून राजधानी गुवाहाटीमध्ये मॅनहोल आणि उघड्या नाल्यांमुळे अल्पवयीन मुलांबरोबरच कमीत कमी 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
एक प्रकरण सोडलं तर इतर आठही मृत्यू मान्सूनच्या वेळी झाले आहेत, जेव्हा शहरातला मोठा भाग पुराच्या पाण्यात बुडून जातो. तेव्हा नाल्या आणि नदी दुथडी भरून वाहत असतात.