मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:31 IST)

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि बुधवारी पंजाबमधील त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा उल्लंघनाची थेट माहिती दिली. राष्ट्रपतींनी सुरक्षेतील गंभीर त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली. यापूर्वी सुप्रीम कोर्टातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी ही बाब सरन्यायाधीशांसमोर ठेवत या घटनेचा अहवाल मागवून पंजाब सरकारला दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. त्याचवेळी न्यायालयाने याचिकेची प्रत पंजाब सरकारला देण्यास सांगितले. उद्या म्हणजेच शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे.  पंजाब सरकारने आता याप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश असेल. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असे प्रवक्त्याने सांगितले.
.उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींबद्दल पंतप्रधान मोदींशी बोलून चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करून, उपराष्ट्रपतींनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा केली जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा घडू नयेत.