माकडांचा प्रताप, गरीब महिलेचे दागिने आणि २५ हजाराची रक्कम पळवली
तामिळनाडूच्या थंजवूर जिल्ह्यात वीरमंगुडी या गावात एका झोपडीत राहणाऱ्या आणि मनरेगा सारख्या योजनांमध्ये काम करुन जगणाऱ्या महिलेचे दागिने आणि २५ हजाराची रक्कम माकडांच्या टोळीने पळवली आहे.
जी. सरथंबल असं या महिलेचं नाव आहे. माकडांच्या टोळीने महिलेच्या घरात शिरुन केळी आणि तांदळाची पिशवी उचलून नेली. नेमक्या याच तांदळाच्या पिशवीत महिलेने आपले बचत केलेले पैसे ठेवले होते. कपडे धुवून घरात आल्यानंतर घरातली फळं आणि तांदळाची पिशवी गायब झाल्याचं महिलेला लक्षात आलं. आपले दागिने आणि पैसे गायब झाल्याचं लक्षात येताच महिला बाहेर आली तेव्हा माकडांची डोळी तिच्या झोपडीच्या छतावर बसलेली आढळली.
पुढे आरोग्य केंद्राच्या छतावर बसून माकडांनी महिलेच्या घरातून उचलेली केळी खाण्यास सुरुवात केली. यावेळी जमा झालेल्या गावकऱ्यांनी महिलेला मदत करण्याच्या उद्देशाने माकडांच्या हाती असलेला ऐवज परत घेण्याचा प्रयत्न केला असता. माकडांची टोळी पैसे आणि दागिने असलेली पिशवी आपल्यासोबत घेऊन पळून गेली.