दैनिक सामन्याच्या संपादकीयमधून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ''प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी योगींना टोमणा हाणला आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे
- तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास हैदराबादचे नावभाग्यनगर करू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. निजामाच्या खुणा पुसून टाकून हैदराबादचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे असेही योगींचे म्हणणे आहे. योगी हे भगवे वस्त्रधारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. तेलंगणात सत्ता आली तर ओवेसी बंधूंना हाकलून देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
- तेलंगणात निजामाच्या खुणा आहेत व ओवेसी बंधू हे निजामाचे वंशज असल्यासारखेच वागतात.
- ओवेसी यांना वापरून राममंदिर प्रश्नी देशात दंगली घडवायचा डाव असल्याची पिचकारी मुंबईतील एका राजकीय नेत्याने मारली.
- योगी यांनी हैदराबादचे भाग्यनगर करायचे ठरवले या भूमिकेस महत्त्व आहे. पण निजाम-बाबराच्या खुणा फक्त हैदराबादेतच आहेत काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
- आमच्या मराठवाडय़ाने निजामाचा अत्याचार सोसला आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव कधी होणार? पुन्हा खुल्ताबाद, अहमदनगर ही नावे आहेतच.