सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (08:08 IST)

वेणुगोपाल धूत : घराघरात कलर टीव्ही पोहोचवणारी व्यक्ती ते CBI कडून अटक

जसं स्कूटर म्हणजे बजाजची हे समीकरण 80-90 च्या दशकात होतं तसंच कलर टीव्ही म्हणजे व्हीडिओकॉनचा हे देखील अलिखित समीकरण होतं.सोनी, एल.जी.चे कलर टीव्ही आले होते पण ते सर्वांच्याच आवाक्यात नव्हते तेव्हा व्हीडिओकॉन या देशी बनावटीच्या टीव्हीने बाजारपेठेतले आपले स्थान बळकट केले.
पुढे व्हीडिओकॉन कंपनी फक्त टीव्ही बनवण्यापुरतीच मर्यादित न राहता इलेक्ट्रिक उपकरणांमध्येही नावाजली आणि पाहता पाहता मराठवाड्यातील औंरगाबाद शहरात बनलेली ही कंपनी भारतात पोहोचली.
 
या सर्व गोष्टींची आठवण होण्याचं कारण म्हणजे व्हीडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) अटक केलीय. ICICI बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं धूत यांच्यावर अटकेची कारवाई केली.
 
तीन दिवसांपूर्वी (23 डिसेंबर) सीबीआयनं याच प्रकरणात ICICI बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती.
 
ICICI बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं कारवाईला वेग दिल्याचंच या अटकांमधून दिसून येतं.
 
यात वेणूगोपाल धूत यांचं नाव वारंवार समोर येत होतंच. कारण हे पूर्ण प्रकरण वेणूगोपाल धूत यांच्या व्हीडिओकॉन कंपनीला दिलेल्या कर्जाशी संबंधित आहे.
 
या निमित्तानं वेणुगोपाल धूत यांचा आजवरचा प्रवास आपण जाणून घेऊच.
 
त्याआधी आपण हे समजून घेऊ की वेणूगोपाल धूत यांना अटक का झाली?
वेणूगोपाल धूत यांना अटक का झाली?
व्हीडिओकॉन समूहाला सुमारे 3000 कोटी रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप त्यांच्यावर सीबीआयनं केलाय. ज्यावेळी हे कर्ज देण्यात आलं होतं, त्यावेळी चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख होत्या.
 
चंदा कोचर यांनी मंजूर केलेली कर्जाची रक्कम न्यूपॉवर रिन्यूएबल्स या कंपनीत गुंतवणूक करण्यात आली. न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी वेणूगोपाल धूत आणि दीपक कोचर यांची होती. दीपक कोचर हे चंदा कोचर यांचे पती आहेत.
 
तसंच, व्हिडिओकॉन समूहाला दिलेलं हे कर्ज नंतर नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) मध्ये बदलण्यात आलं.
 
पुढे ICICI बँक आणि व्हीडिओकॉन ग्रुपमधील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. 15 मार्च 2016 रोजी लिहिलेल्या या पत्रात ICICI बँक ज्या मार्गांनी व्यवहार करत आहे, त्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.
 
व्हीडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचं जे कर्ज देण्यात आलं, त्यात हितसंबंधांचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याचं पत्राद्वारे म्हटलं होतं. यामागे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हीडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
 
मग हे सर्व प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात आलं. ती चौकशी चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांच्या अटकेपर्यंत येऊन ठेपली आहे.
 
वेणूगोपाल धूत यांच्या तर्फे किंवा धूत कुटुंबीयांतर्फे अद्याप कोणीही यावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली नाही. ती आल्यावर या बातमीत त्या प्रतिक्रियेचा समावेश केला जाईल.
चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना 23 डिसेंबर 2022 रोजी अटक झाली. मात्र, 26 डिसेंबर 2022 रोजी वेणूगोपाल धूत यांना झालेली अटक महाराष्ट्रासाठी धक्क्याची बातमी ठरली. याचं कारण धूत कुटुंबीयांच्या उद्योगसाम्राज्याची सुरुवात महाराष्ट्रभूमीवरून झाली.
 
धूत कुटुंबाची मूळं जरी राजस्थानात असली, तरी ते आता महाराष्ट्रीयन बनले आहेत.
 
महाराष्ट्राच्या उद्योगविश्वात आणि त्यातही मुंबई-पुण्याच्या बाहेरील उद्योगविश्वात अढळ असं स्थान धूत कुटुंबाचं आहे.
 
घरातूनच उद्योगाचा वारसा
वेणूगोपाल धूत हे काही धूत कुटुंबातील पहिले उद्योजक नव्हेत. त्यांचे वडील नंदलाल माधवलाल धूत यांनी धूत कुटुंबात पहिल्यांदा उद्योगविश्वाची मुहूर्तमेढ रोवली.
 
हे धूत कुटुंब मूळचे औरंगाबाद शहरापासून सुमारे 40 किलोमीटरवर असलेल्या गंगापूरमधील.
 
लेखक हरीश दामोदरन यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज न्यू कॅपिटॅलिस्ट’ पुस्तकातील माहितीनुसार, नंदलाल माधवलाल धूत यांनी 1955 साली महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये गंगापूर साखर कारखान्याची स्थापना केली.
 
या कारखान्यानं महाराष्ट्रातील सहकार चळवळीत महत्त्वाचं योगदान दिलं.
 
या गंगापूर साखर कारखान्यासाठी आवश्यक यंत्र नंदलाल धूत यांनी युरोपातून मागवले होते. त्या काळात औरंगाबादसारख्या मुंबई-पुण्याच्या बाहेरील भागात नियमित विजेचा मोठा अडथळा होताच. अशातूनही नंदलाल धूत यांनी मार्ग काढला आणि कारखाना चालवला.
 
ते मुळातच साखर आणि कापूस या पिकांशी संबंधित कार्यरत होते.
अहमदनगर आणि पुण्यातून शिक्षण घेतलेले नंदलाल धूत हेच पुढे व्हीडिओकॉनचे आधारस्तंभ बनले, अशी माहिती व्हीडिकॉनच्या संकेतस्थळावरील ‘फाऊंडिंग फादर्स’ या रकान्यात देण्यात आलीय.
 
26 एप्रिल 1993 रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात नंदलाल धूत यांचं निधन झालं.
 
इंडियन एअरलाईन्स आयसी 491 विमान औरंगाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना हा अपघात झाला. यात 55 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
 
धूत बंधू – वेणूगोपाल, राजकुमार आणि प्रदीपकुमार
नंदलाल धूत यांनी सुरू केलेल्या उद्योगांना पुढे त्यांच्या मुलांनी जगभर पोहोचवलं.  
 
वेणूगोपाल, राजकुमार आणि प्रदीपकुमार अशी त्यांच्या तिन्ही मुलांची नावं.
 
ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव सांगतात की, “ऐंशीच्या दशकात जेव्हा पिक्चर ट्यूब यायला लागल्या. तेव्हा वेणूगोपाल आणि प्रदीपकुमार धूत यांनी त्या पिक्चर ट्यूब वापरून टीव्ही असेंबल करत. नंतर कॉम्प्रेसर आणण्यास सुरुवात केली आणि त्यातून फ्रिज बनवू लागले.”
 
“प्रदीपकुमार धूत हे तंत्रज्ञानाबाबत अधिक हुशार होते, वेणूगोपाल धूत हे आपण आध्यात्मिक वगैरे आहोत, असे दाखवायचे,” असंही भालेराव सांगतात.
 
वेणूगोपाल धूत यांच्या निकटवर्तीयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलेल्या माहितीनुसार, “वेणूगोपाल हे धार्मिक वृत्तीचे व्यक्ती आहेत, त्यांचं भगवद्गीतेवर बराच अभ्यासही आहे.”
या धूत बंधूंपैकी राजकुमार धूत हे राजकारणातही गेले.
 
निशिकांत भालेराव सांगतात की, “तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे हे मराठवाडा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्षही होते. त्यांनी राजकुमार धूत यांना राजकारणात पुढे आणलं. मोरेश्वर सावे म्हणजे बाबरी मशीद विध्वंसात आरोपी होते तेच. तसंच, हे सावे औरंगाबादचे पहिले महापौरही होते.”
 
पुढे राजकुमार धूत यांनी शिवसेनेकडून तीनवेळा (2002, 2008 आणि 2014) राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं आहे.
 
निशिकांत भालेराव सांगतात की, “औरंगाबादस्थित सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल वगळता औरंगाबाद शहर किंवा जिल्ह्यासाठी फार भरीव असं धूत कुटुंबीयांचं कुठलं काम सांगता येत नाही.”   
 
वेणूगोपाल धूत
वेणूगोपाल धूत यांचा जन्म 30 सप्टेंबर 1951 रोजी झाला. म्हणजे, नंदलाल धूत यांनी उद्योगात पाऊल ठेवण्याच्या चार वर्षे आधी वेणूगोपाल यांचा जन्म झाला.
 
वेणूगोपाल धूत हे नंदलाल धूत यांचे थोरले पुत्र. त्यामुळे पुढे उद्योगात सर्वांत पहिलं पाऊल त्यांनी ठेवलं.
 
वेणगोपाल धूत यांनी पुढे अनेक कंपन्या सुरू केल्या आणि संस्था-संघटनांवरील मानद पदंही भूषवली. मात्र, व्हीडिओकॉनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हीच त्यांची ओळख सर्वदूर पसरली आहे.
पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या वेणूगोपाल धूत यांनी व्हीडिओकॉन कंपनीच्या स्थापनेतही हातभार लावला. पुढे या कंपनीचं प्रमूखपद भूषवलं.
 
वेणूगोपाल धूत यांनी आजवर विविध क्षेत्रात उद्योग पसरवला आणि अनेक संस्था-संघटनांची पदंही भूषवली. त्याबाबत पुढे जाणून घेऊच. तत्पूर्वी, धूत कुटुंबीयांच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या व्हीडिओकॉनबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
 
व्हीडिओकॉनची स्थापना
ऐंशीच्या दशकात नंदलाल धूत यांनी तिन्ही मुलांच्या सोबत व्हीडिओकॉन कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या स्थापनेसाठी त्यांनी जपानमधील तोशिबा कंपनीसोबत भागीदारी केली.
 
भारतातील पहिला कलर टीव्ही ‘व्हीडिओकॉन’च्या रूपात आपण लॉन्च केल्याचा दावा कंपनीकडून आजही करण्यात येतो.
 
आज व्हीडिओकॉन कंपनी टीव्ही, मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशिनपासून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतात होम अप्लायन्स सेक्टरमध्ये व्हीडिओकॉनचा महत्त्वाचा वाटा मानला जातो.
पुढे व्हीडिओकॉन समूहानं केवळ होम अप्लायन्सेसपर्यंतच मर्यादित न राहता, डीटीएच सेवा, ऑईल अँड गॅस, रिअल इस्टेट अशा क्षेत्रातही पदार्पण केलं.
 
मेक्सिको, इटली, पोलंड, चीन अशा विविध देशांमध्ये या कंपनीचं काम पसरलं.
 
सीएनबीसी टीव्ही 18 च्या माहितीनुसार, 2015 साली वेणूगोपाल धूत यांनी व्हीडिओकॉन डीटूएचचा एक तृतीयांश भाग अमेरिकास्थित सिल्व्हर इगल अॅक्विझशन कॉर्प. या कंपनीला 2,130 कोटींना विकला.
 
व्हीडिओकॉनच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, वेणूगोपाल धूत, राजकुमार धूत, प्रदीपकुमार धूत हे तिघेही बंधू कंपनीचे प्रमोटर आहेत. तसंच, अनिरुद्ध वेणूगोपाल धूत आणि सौरभ दूत हेही प्रमोटर आहेत.  
 
‘फोर्ब्स’च्या यादीतले ‘मराठवाडाभूषण’
वेणूगोपाल धूत यांचं आजवर विविध ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. तसंच, त्यांना मानद पदं आणि पुरस्कारांनाही गौरवण्यात आलं.
 
वेणूगोपाल धूत हे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ मराठवाडाचे अध्यक्ष होते.
 
ओडिसा सरकारचे उद्योग विकास सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
 
2015 साली जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकानं भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात वेणूगोपाल धूत हे 61 व्या क्रमांकावर होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 1.19 बिलियन डॉलर इतकी होती.
 
मूळचे मराठवड्यातील असलेल्या वेणूगोपाल धूत यांना 2 एप्रिल 2005 साली ‘मराठवाडाभूषण’ या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे.
 
एकेकाळी इतक्या मानसन्मानानी गौरवण्यात आलेल्या धूत यांना अटक झाल्यानंतर आता व्हीडिओकॉन कंपनीची पुढील वाटचाल नेमकी कशी राहील याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल.


Published  By- Priya Dixit