शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (13:54 IST)

Rama Navami: रामनवमीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी मिरवणुकीवर हल्ले, दगडफेक आणि जाळपोळ

देशभरात रामनवमीचा सण साजरा केला जात होता, मात्र या शुभमुहूर्तावर देशात अनेक ठिकाणी मिरवणुकीदरम्यान हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. गुजरात, झारखंडपासून पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशपर्यंत हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. गुजरातमधील हिम्मतनगर आणि आनंद येथे हिंसक संघर्ष पाहायला मिळाला, तर मध्य प्रदेशातील बरवानी आणि झारखंडमधील लोहरदगा आणि पश्चिम बंगालमधील दक्षिण हावडा येथेही हल्ले झाले.
 
साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील छापरिया परिसरात रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात येत असताना अचानक मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच हिमतनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील हिमतनगरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान केले.
 
दुसरीकडे, गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील खंभातजवळील शकरपूर गावात रामनवमीच्या मिरवणुकीत आज दगडफेक करण्यात आली, त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. अचानक तणाव वाढला आणि जाळपोळ सुरू झाली. या काळात अनेक दुकाने आणि घरे जाळण्यात आली. पोलीस घटनास्थळी असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
पश्चिम बंगालमध्ये मिरवणुकीवर हल्ला
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पश्चिम बंगालमधील दक्षिण हावडा येथील बीई कॉलेजजवळून विश्व हिंदू परिषदेतर्फे मिरवणूक काढण्यात आली, जी हावडा रामकृष्णपूर घाटाकडे जात होती. दरम्यान, हावडा येथील शिवपूर पोलीस ठाण्यांतर्गत पीएम बस्ती परिसरात काही लोकांनी या मिरवणुकीवर अचानक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
झारखंडमध्ये जाळपोळ
रामनवमीनिमित्त झारखंडमधील लोहरदगा येथील हिराही-हेंडलासो-कुजरा गावाच्या सीमेवर सुरू असलेल्या जत्रेत हिंसाचार आणि जाळपोळ झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या मिरवणुकीत सामील असलेल्या लोकांवर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली, त्यानंतर जत्रेत पोहोचल्यानंतर सुमारे 10 मोटारसायकल आणि पिकअप व्हॅनला आग लावण्यात आली. मिरवणुकीत सहभागी लोकांनीही प्रत्युत्तरात दगडफेक केली. तीन घटनांमध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
मध्य प्रदेशात दगडफेक
मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील सेंधवा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. ही घटना सेंधवा शहरातील झोगवाडा रोडची आहे. या दगडफेकीत सेंधवा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी बलदेव मुजळदे यांच्यासह दोघेजण जखमी झाले. हल्लेखोरांनी दोन मोटारसायकल पेटवून दिल्या. एवढेच नाही तर 2 ते 3 धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर बरवानीचे एसपी, जिल्हाधिकारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे.