गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (20:56 IST)

मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्स यांच्यात नेमका वाद काय आहे?

Manipur violence,
मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. त्यातच राज्यात सुरक्षा दलांमध्ये मोठे मतभेद आणि तणावाची प्रकरणं आता समोर येत आहेत.
 
मणिपूर पोलिसांनी नुकतेच आसाम रायफल्सच्या सैनिकांविरोधात कामात बाधा आणणं, हल्ला करण्याची धमकी देणं आणि चुकीच्या पद्धतीने तपासणी करण्यासाठी थांबवण्याच्या कलमांच्या अंतर्गत FIR दाखल केला आहे.
 
आसाम रायफल्सच्या 9व्या बटालियनच्या विरोधात विष्णपूर जिल्ह्यातल्या फोऊगाकचाओ इखाई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आसाम रायफल्स काम करण्यापासून रोखलं आणि कुकी दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी जाऊ दिल्याचा आरोप FIR मध्ये केला आहे.
 
आसाम रायफल्स अर्धसैनिक दल आहे. ते भारत-म्यानमार सीमेवर कार्यरत असतात. आसाम रायफल्स भारतीय सेनेच्या ऑपरेशनल नियंत्रणाअंतर्गत काम करतं.
आसाम रायफल्सवरच्या आरोपांचं भारतीय लष्कराने खंडन केलं आहे. त्यांच्या मते, “एखाद्या विपरित परिस्थितीत काम करताना अशा प्रकारचे मतभेद होतात, मात्र परस्परसंमतीने ते सोडवले जातात.”
 
या प्रकरणात लष्कराचं म्हणणं आहे की आसाम रायफल्स हिंसाचार रोखण्यासाठी कुकी आणि मैतेई यांच्यात बफर झोन तयार करण्याचं काम करत होते. तसा आदेश त्यांना देण्यात आला होता.
 
प्रकरण काय आहे?
आसाम रायफल्स विरुद्ध मणिपूर पोलिसांनी म्हटलं आहे की पाच ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजता पोलिसांच्या टीम्स क्वाक्ता वॉर्ड नंबर आठच्या जवळ फोल्जांग रोडच्या भागात कुकी दहशतवाद्यांचा शोध घ्यायला गेली होती.
 
काही तासांआधीच कुकी बंडखोरांनी गाढ झोपेत असलेल्या मैतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या केली होती. त्यात पिता-पुत्रांचा समावेश होता. मणिपूर पोलिसांना संशय होता की यात कुकी दहशतवाद्यांचा हात आणि त्यावेळी ते तिथेच दबा धरून बसले होते.
 
मणिपूर पोलिसांच्या मते, जेव्हा त्यांची टीम कुतुब मशीद भागात पोहोचली, तेव्हा आसाम रायफल्सच्या 9व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांनी क्वाक्ता फोल्जांग रोडच्यामध्ये त्यांची सशस्त्र कॅस्पर गाडी लावली होती. त्यामुळे मणिपूर पोलीस समोर जाऊ शकले नाही आणि त्यामुळे आतंकवाद्यांना सुरक्षित जागी जाण्याची संधी मिळाली.
 
या घटनेशी निगडित एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्स यांच्यात वादविवाद सुरू असल्याचं दिसून येतं. त्यातच मणिपूर पोलिसांच्या एका जवानाला आसाम रायफल्सलच्या सैनिकांवर दहशतवाद्यांसोबत संगनमत केल्याचा आरोप करताना दिसत आहेत.
 
'ही पहिली घटना नाही'
मणिपूर आणि आसाम रायफल्स यांच्यातल्या संघर्षाची ही पहिली घटना नाही.
 
दोन जूनला एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात आसाम रायफल्सच्या 37 व्या बटालियनच्या सैनिकांनी सुगनू पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटवर गाडी लावली होती आणि रस्ता रोखला होता. या व्हीडिओत सुद्धा मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या जवानांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.
 
जुलै महिन्यात जेव्हा बीबीसीची टीम सुगनू पोलीस स्टेशनला गेली होती, तेव्हा मणिपूर पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं होतं की, त्यांनी आसाम रायफल्सच्या विरोधात खटला दाखल केला आहे.
 
आसाम पोलिसांनी तशी कागदपत्रं दाखवली होती. आसाम रायफल्सचा पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचा इरादा होता असं FIR मध्ये लिहिलं होतं.
 
आम्ही त्यांना विचारलं की असं काय झालं होतं. तेव्हा एकजण म्हणाला, “आम्हाला माहिती नाही की त्यांच्या मनात काय होतं, पण ते फारच आश्चर्यकारक होतं.”
 
भारतीय लष्कर आसाम रायफल्सच्या बचावात
आसाम रायफल्सवर केलेल्या आरोपांचं भारतीय लष्कराने खंडन केलं आहे. ट्विटरवर जारी केलेल्या एका निवेदनात भारतीय लष्कराने म्हटलं आहे की आसाम रायफल्स मणिपूरमध्ये शांतता बहाल करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत.
 
लष्कराने म्हटलं, “सध्या मणिपूरमध्ये परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे संरक्षण दलात मतभेद होतात. मात्र संयुक्तरित्या त्यावर तोडगा काढला जातो. आसाम रायफल्सची बदनामी करण्याची दोन प्रकरणं समोर आली आहेत.”
 
“पहिल्या प्रकरणात आसाम रायफल्स बटालियन ने दोन गटांमधील संघर्ष थांबवण्यासाठी कडक पावलं उचलली. दुसरं प्रकरण अशा भागातलं आहे ज्याचा यांच्याशी काही संबंध नाही.”
 
दुसऱ्या प्रकरणात महिला सैन्याचा वेश परिधान केलेल्या अधिकाऱ्यांच्या पायाशी लोळण घेत रडताना दिसत आहेत.
 
ज्या परिसरात कुकी महिला त्यांच्या परिसरात आसाम रायफल्सच्या जवानांनाच सुरक्षेसाठी ठेवावं अशी विनंती करताना दिसत आहेत.
 
भारतीय लष्कराने आता म्हटलं आहे की आसाम रायफल्सला ज्या क्षेत्रातून हटवलं आहे तिथे एक इन्फंट्री बटालियन त्या क्षेत्रात तैनात आहे.
 
भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स मणिपूरच्या लोकांना पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शक्तींविरोधात कारवाई केली जाईल.
 
आसाम रायफल्सविरोधात वाढती नाराजी
मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 152 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
जवळजवळ 60,000 लोक विस्थापित झाले आहेत. काही लोक राज्य सोडून गेले आहेत तर हजारो लोक निर्वासितांच्या शिबिरात आहेत.
 
हजारोंच्या संख्येने तिथे लष्कर तैनात करण्यात आलं आहे. मात्र आसाम रायफल्स गेल्या काही वर्षांपासून मणिपूरच्या अनेक भागात विशेषत: पहाडी आणि म्यानमारला लागून असलेल्या सीमेवर तैनात आहे.
 
या भागात बहुतांश लोक कुकी समाजाचे आहेत. त्यावरूनच आरोप लावला जातोय की, आसाम रायफल्स आणि कुकी समुदायाचे घनिष्ठ संबंध आहेत.
 
11 जुलैला मणिपूरच्या 31 आमदारांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सांगितलं की आसाम रायफल्सच्या 9व्या, 22 व्या, आणि 37व्या बटालियनला राज्यातून हटवावं आणि एकीला प्रोत्साहन देणाऱ्या दुसऱ्या केंद्रीय सुरक्षा दलाला तिथे तैनात करावं.
 
आसाम रायफल्सच्या भूमिकेवर आम्हाला शंका आहे आणि ते राज्याच्या एकतेसाठी घातक आहेत असंही ते पुढे म्हणाले.
 
सात ऑगस्टला मणिपूरच्या भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या आसाम रायफल्सच्या भूमिकेवर टीका होत आहे आमि सार्वजनिक आक्रोश पहायला मिळत आहे.
 
मणिपूर भाजपाने आसाम रायफल्सला तिथून हटवून एखादं अर्धसैनिक दल तैनात करण्याची विनंती केली आहे.
 










Published By- Priya Dixit