सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (09:44 IST)

राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ स्वतःकडे का ठेवला आणि वायनाडमधून प्रियंका का लढत आहेत?

Rahul Gandhi Priyanka Gandhi
काँग्रेसच्या राजकारणावर अनेक दशकांपासून लक्ष ठेवणाऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे प्रियंका गांधी निवडणूक कधी लढवणार? आता या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस पक्षाने सोमवारी (17 जून) दिलं आहे. प्रियंका गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.
या घोषणेने अनेक दशकांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला.
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांना विजय मिळाला, त्यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागेल.
 
यासंबंधी माहिती देताना सोमवारी (17 जून) संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार राहतील आणि वायनाडची जागा सोडतील. पण सोबतच वायनाड मतदारसंघातून प्रियंका गांधी उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलं.
 
पक्षाचा निर्णय मान्य करत प्रियंका गांधी म्हणाल्या, "मी वायनाडच्या लोकांना माझ्या भावाची अनुपस्थिती जाणवू देणार नाही."
राष्ट्रीय राजकारणावर लक्ष ठेवणारे विश्लेषक प्रियंका गांधी यांच्या वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाकडे कसं पाहतात?
 
अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचं राजकारण जवळून पाहणारे पत्रकार जावेद अन्सारी म्हणतात की, प्रियंका गांधींनी निवडणूक लढवणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये.
 
अन्सारी म्हणतात, "मूळ मुद्दा होता, त्या निवडणूक कधी लढवणार? दोन्ही भावा-बहिणींनी अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवली असती तर ती मोठी गोष्ट ठरली असती. पण निवडणुकीत प्रियंकाने राहुल गांधींसाठी रायबरेलीत आघाडी उघडली आणि म्हणूनच राहुल गांधी संपूर्ण देशात प्रचार करू शकले."
 
प्रियंका गांधींची नेतृत्व क्षमता?
2020 मध्ये काँग्रेसने संपूर्ण उत्तरप्रदेशची धुरा प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवली. जेणेकरून 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या पक्षाला तयार करू शकतील.
 
'लडकी हूँ, लड सकती हूं' या मोहिमेअंतर्गत महिलांना डोळ्यासमोर ठेवून आपलं मिशन सुरू केलं. यावर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं पण त्याचा फारसा फायदा काँग्रेसला निवडणुकीत झाला नाही.
 
2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 2.3 टक्के मतं मिळाली आणि केवळ दोन जागा जिंकता आल्या.
 
याशिवाय पंजाब काँग्रेसमधील गदारोळ प्रियंका गांधी यांनी ज्या पद्धतीने हाताळला त्यावरही अनेक राजकीय जाणकारांनी टीका केली होती.
अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला करून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयासाठी राजकीय तज्ज्ञांनी प्रियंका गांधींना जबाबदार धरलं. त्यांच्या मते हा निर्णय काँग्रेससाठी पूर्णपणे चुकीचा ठरला.
 
प्रियंका गांधी यांनी राजस्थानमध्येही असंच काहीसं केलं होतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सचिन पायलट बंडखोर वृत्ती दाखवत असतानाही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने पक्षाला नुकसान सहन करावं लागलं.
 
प्रियंका रायबरेलीतून निवडणूक का लढवत नाहीत?
प्रियंका गांधी यांची अमेठी आणि रायबरेलीच्या जागांवर चांगली पकड आहे, किंबहुना त्यांना तिथल्या राजकारणाची चांगली समज आहे. मग असं असताना राहुल यांनी वायनाड स्वतःकडे का ठेवलं नाही? आणि प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक का लढवत नाहीत?
 
यावर जावेद अन्सारी म्हणतात, "रायबरेलीतील प्रियंकाचा अनुभव पाहता, त्यांना इथे जागा द्यायला हवी होती. एकवेळ तसा विचार करता आला असता. पण मला वाटतं की राहुल गांधी हे पक्षाचा चेहरा आहेत आणि त्यामुळेच ते उत्तर प्रदेशपासून दूर जाऊ शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश पक्षाने दिला आहे. विशेषत: काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली असताना.
 
राजकीय विश्लेषक आणि लेखिका नीरजा चौधरीही जावेद अन्सारींच्या म्हणण्याशी सहमत असल्याचं दिसतं.
 
नीरजा चौधरी म्हणतात, "माझ्या मते हा काँग्रेस पक्षाचा सुनियोजित निर्णय आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसची कामगिरी आणि भाजपचे झालेले नुकसान पाहता पक्ष उत्तर प्रदेशला जास्त महत्त्व देतो, असा संदेश पक्षाला द्यायचा आहे."
 
"याशिवाय, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यातील स्पष्ट समीकरणाचं महत्त्व कमी लेखू नये. परस्पर समंजसपणा आणि समीकरणाचा फायदा दोन्ही पक्षांना झाला आहे. जेव्हा प्रियंका गांधी रायबरेलीत जास्त सक्रिय होत्या तेव्हा राहुल गांधी वायनाड स्वतःकडे ठेवतील असं पूर्वी वाटत होतं."
यावेळी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात युती झाली आणि काँग्रेसने सहा जागा जिंकल्या. तर 2019 मध्ये रायबरेलीमधून केवळ सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. 2014 मध्ये काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली अशा दोन्ही जागांवर विजय मिळाला होता.
 
यावेळी राहुल गांधी रायबरेलीमध्ये 3 लाख 90 हजारांहून अधिक मतांनी आणि वायनाडमध्ये 3 लाख 64 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. मग वायनाडमध्ये प्रियंका गांधींच्या उमेदवारीचा अर्थ काय? प्रियंकासाठी वायनाड निवडणूक जिंकणं सोपं आहे का?
 
वायनाडचे लोक प्रियंका गांधींना साथ देतील का?
नीरजा चौधरी म्हणतात, "प्रियंका यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वायनाडचे लोक प्रियंका यांना उमेदवार म्हणून कशा पद्धतीने स्वीकारतील हे पाहावं लागेल. वायनाडमध्ये मतदान होऊन अनेक दिवस उलटूनही राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याबाबत सांगितलं नव्हतं.
 
"अशा परिस्थितीत वायनाडचे लोक राहुल गांधी यांचा निर्णय विश्वासघात मानतात की नाराजी व्यक्त करतात हे पाहावं लागेल. मात्र मला असं वाटतं की प्रियंका हे होऊ देणार नाहीत आणि निवडणुकीचे निकाल त्यांच्या बाजूने फिरवण्यात त्या यशस्वी होतील."
प्रियंका गांधींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नीरजा चौधरी म्हणतात, "मला वाटतं प्रियंका गांधी जास्त व्यावहारिक आहेत. राहुल गांधींच्या तुलनेत प्रियंका गांधी यांची भाषा सोपी आहे. पण राहुल यांची ही पाचवी लोकसभा निवडणूक आहे आणि प्रियंका गांधी यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक आहे हेही आपण विसरता कामा नये.
 
"राहुल गांधी हे भविष्यातील नेते आहेत, काँग्रेस याबाबत स्पष्ट आहे. जर प्रियंका 18 व्या लोकसभेत लढल्या तर ही गोष्ट महत्त्वाची ठरेल. विशेषत: त्यांची आई सोनिया गांधी राज्यसभेवर असताना. संसदेत प्रियंका गांधी यांच्यावर लोकांची बारीक नजर असेल. संसदेत त्या भावाच्या सावलीत राहतील का? हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे."
 
'हिंदुस्तान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्राचे राजकीय संपादक विनोद शर्मा म्हणतात, "राहुल गांधी रायबरेलीची जागा राखतील हे निश्चित होतं."
 
राहुल यांचा रायबरेलीतील मुक्काम उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित असल्याचं शर्मा म्हणतात.
 
राहुल-अखिलेश जोडी
विनोद शर्मा म्हणतात, "2014 नंतर भाजपने उत्तरप्रदेशमध्ये मुक्त हस्ते जे करायचं ते केलं. पण उत्तरप्रदेश मधील ही परिस्थिती बदलली असून काँग्रेसने येथे जोरदार आघाडी उघडली आहे. पूर्वी, काँग्रेस यूपीमध्ये सत्ताधारी पक्ष होता आणि उच्च जाती, दलित तसेच अल्पसंख्याकांमध्ये पक्ष रुजला होता."
 
"पण हळूहळू काँग्रेसची ताकद समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपमध्ये विभागली गेली आणि शेवटी काँग्रेस नाममात्र उरली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेश मध्ये काँग्रेसच्या बुडत्या जहाजाला आधार मिळताना दिसतोय."
 
"काँग्रेसला आता आपल्यासाठी जागा तयार करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेसला उत्तरप्रदेशमध्ये सामाजिक समीकरण तयार करावं लागेल. याच जोरावर सर्व जिल्ह्यात आणि नंतर राज्यात आणि नंतर देशात काँग्रेसला स्थान निर्माण करता येईल. काँग्रेसच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून त्यांना पुन्हा बळ मिळण्याची संधी आहे."
 
"काँग्रेसची ही ताकद समाजवादी पक्षासोबत विश्वासार्ह आणि मजबूत भागीदारीची हमी देऊ शकते. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील युती शीर्ष नेतृत्वाच्या पातळीवरच नाही तर मतदारांनीही ती चांगल्या पद्धतीने स्वीकारली असून दोन्ही पक्ष एकमेकांचं कौतुक करत आहेत."
 
त्यामुळे प्रियंका गांधी राजकीय मैदानात उतरत असताना पुन्हा एकदा गांधी कुटुंबाच्या राजकीय भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळ स्थापनेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी 11 जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या 'घराणेशाही'वर निशाणा साधला.
 
त्यांनी लिहिलं, "पिढ्यानपिढ्या संघर्ष, सेवा आणि बलिदानाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे लोक सत्ता आपल्या 'सरकारी कुटुंबात' वाटून घेत आहेत. शब्द आणि कृतीतील फरक यालाच यालाच नरेंद्र मोदी म्हणतात."
 
आता प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, यातूनच दिसतं की काँग्रेसमध्ये घराणेशाही किती खोलवर रुजली आहे.
 
ते म्हणतात, "आई राज्यसभेत. मुलगा लोकसभेत आणि आता पक्षाचा हा निर्णय. यावरून काँग्रेस हा पक्ष नसून घराणेशाही चालवणारी कंपनी असल्याचे दिसून येते."
विनोद शर्मा मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत.
 
रायबरेलीत गांधी-नेहरू घराण्याच्या परंपरेचा उल्लेख करताना विनोद शर्मा म्हणतात, "रायबरेलीचे गांधी घराण्याशी असलेले संबंध फिरोज गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत आहेत. अशा स्थितीत राहुल गांधी रायबरेलीतूनच खासदार राहतील हे निश्चित होतं. मला वाटलंच होतं की काही लोक घराणेशाहीचा प्रश्न उपस्थित करतील पण ही लोकशाही घराणेशाही आहे. येथे एक जनादेश आवश्यक आहे आणि अशा टीकेत फारसा दम नाही."
 
विशेष म्हणजे एकेकाळी गांधी परिवाराने रायबरेलीची जागा दक्षिण भारतातील एका जागेसाठी सोडली होती. नीरजा चौधरी म्हणतात, "इंदिरा गांधी 1980 मध्ये रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या आणि त्यांनी आंध्रप्रदेशच्या मेडक जागेसाठी इथला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सोनिया गांधी रायबरेलीत आल्या आणि आता राहुल गांधी."
 
आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी लागणार आणि तिथले मतदार कोणाला खासदार म्हणून निवडून देणार हे पाहणं बाकी आहे.
 
Published By- Priya Dixit