शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (21:26 IST)

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (17 जून) याबाबतची घोषणा केली.प्रियंका गांधी या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राजकारणात प्रवेश केल्यापासून प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहेत.
 
आज (17 जून) प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, 2019 पासून वायनाडचे खासदार म्हणून काम करणाऱ्या राहुल गांधी यांनी बहिणीसाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.
 
4 जूनला लागलेल्या निकालानंतर त्यांना या दोन्हींपैकी एका जागेवर राजीनामा द्यावा लागणार होता. राहुल गांधी रायबरेलीची जागा सोडून वायनाडचे खासदार राहणार अशा चर्चा सुरुवातीला केल्या जात होत्या पण आता अखेर राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
नियमानुसार निकाल लागल्यानंतर 14 दिवसांच्या आत राहुल गांधींना हा निर्णय घ्यायचा होता. गांधी कुटुंबीयांची परंपरागत जागा असणाऱ्या रायबरेलीमधून स्वतः राहुल गांधी हे खासदार असणार आहेत तर दक्षिणेतील वायनाडमधून त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
 
काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घोषणा केली आहे.प्रियंका गांधी आता वायनाडमधून पोटनिवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत.वायनाडमधून प्रियंका गांधींनी विजय मिळवला तर लोकसभेत भाऊ-बहिणीची ही जोडी काँग्रेसचं नेतृत्व करताना दिसू शकते.
 
वायनाडवासियांना राहुल गांधींची उणीव भासू देणार नाही - प्रियंका गांधी
वायनाडच्या लोकांना राहुल गांधींची उणीव भासू देणार नाही, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. वायनाड लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
 
प्रियंका गांधी म्हणाल्या की, "वायनाडचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होईल. मी वायनाडच्या लोकांना राहुल गांधींची उणीव भासू देणार नाही."प्रियंका म्हणाल्या की "राहुल गांधी म्हणाले आहेत की ते वायनाडला येत राहतील. मीही सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करेन."
प्रियंका गांधी म्हणाल्या, "माझे रायबरेलीशी जुने नाते आहे. मी 20 वर्षे रायबरेली आणि अमेठीसाठी काम केलं आहे."
 
वायनाडची जागा सोडण्याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हा निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते.
 
त्यामुळे प्रियांका गांधी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 
राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2019 मध्ये पहिल्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले.
 
वायनाडच्या नागरिकांना प्रियंका गांधी भावतात - केसी वेणुगोपाल
प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की ,"राहुल गांधी दोन जागांवरून निवडून आले आहेत. कायद्यानुसार त्यांना एक जागा सोडावी लागते आणि ते एका जागेवर खासदार राहू शकतात."
 
"उद्या शेवटचा दिवस असल्याने, आज आम्ही ठरवले आहे की राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघाचे खासदार असतील, रायबरेली ही पारंपरिकरित्या गांधी कुटुंबाच्या जवळची राहिली आहे."
 
खरगे म्हणाले की, "रायबरेलीचे गांधी घराण्याशी घनिष्ठ नातं आहे. तिथल्या लोकांना आणि पक्षाला असं वाटतं की, राहुल गांधी हे रायबरेलीच्या जागेवरून खासदार असावेत."
 
"वायनाडच्या लोकांनाही राहुल गांधींनी आपले खासदार राहावं अशी इच्छा आहे. राहुल गांधींना वायनाडच्या लोकांचे प्रेम मिळाले आहे. पण कायदा राहुल गांधींना एका जागेवरून खासदार होण्याची परवानगी देतो."
 
काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, "वायनाडच्या लोकांना प्रियंका गांधी भावतात. केरळच्या लोकांना जेवढे राहुल गांधी आवडतात तेवढ्याच प्रियांका गांधीही आवडतात."
 
सोनिया गांधींनी दिलेला शब्द पाळला आता उत्तर प्रदेशने काँग्रेसला साथ द्यावी - अजय राय
वायनाडमधून प्रियंका गांधींच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर, वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत पक्षाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे.
 
पीटीआयशी बोलताना अजय राय म्हणाले की, "रायबरेलीतून राहुल गांधींच्या उमेदवारीची घोषणा करताना सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की मी माझा मुलगा या मतदारसंघाला अर्पण करत आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि रायबरेलीच्या नागरिकांना दिलेलं वचन पाळलं आहे आता या भागातील जनतेला काँग्रेसला मजबूत पाठिंबा द्यायला हवा."
 
हा वायनाडच्या मतदारांचा विश्वासघात - भाजप नेते शहजाद पूनावाला
काँग्रेसच्या या निर्णयावर बोलताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला एएनआय या वृत्तसंस्थेला म्हणाले की,"आज हे सिद्ध झालं आहे की काँग्रेस हा पक्ष नसून एक कौटुंबिक व्यवसाय आहे. आई राज्यसभेची सदस्य आहे, मुलाने रायबरेलीच्या जागेवरून लोकसभेत प्रवेश केला आहे, तर प्रियंका गांधींना दुसऱ्या लोकसभा जागेवरून सदस्य बनवण्यात आले आहे. कुटुंबातील तिन्ही सदस्य आता संसदेत असतील.

पूनावाला म्हणाले की, "समाजवादी पक्षाच्या मतांवर राहुल गांधी विजयी झाले असले तरी, त्यांना माहीत आहे की पोटनिवडणुका झाल्या तर त्यांचा उत्तर प्रदेशात विजयाची खात्री नाही. हा वायनाडच्या जनतेचासुद्धा विश्वासघात आहे. राहुल गांधींनी वायनाडच्या मतदारांना सांगितलं नव्हतं की निवडून आल्यानंतर ते वायनाड सोडून जातील. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे गांधी कुटुंबाचे वारस हे राहुल गांधीच राहतील. कुटुंबाचा वारस मुलगाच राहील मुलीला दूर दक्षिणेत पाठवण्यात आलं आहे."
 
Published By- Priya Dixit