सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (11:06 IST)

भारत जोडो यात्रेनंतर विरोधी पक्ष हे राहुल गांधीना आपला नेता म्हणून स्वीकारतील?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. यात्रेची सांगता आज (सोमवार, 30 जानेवारी) श्रीनगरमध्ये होणार आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान विविध राज्ये पालथी घालत राहुल गांधींनी तब्बल 3750 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला.
 
स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांच्या मते, भारत जोडो यात्रेला निवडणुकीच्या राजकारणाशी जोडून पाहिलं जाऊ नये.
 
राहुल गांधी राजस्थानात असताना पत्रकारांशी बोलताना जयराम रमेश यांनी म्हटलं होतं, “भारत जोडो यात्रा ही काय ‘चुनाव जोडो’ किंवा ‘चुनाव जिताओ यात्रा’ नाही.
 
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दोनवेळा केवळ 50 च्या जवळपासच जागा मिळवता आल्या. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या सरकारसमोर संपूर्ण विरोधी पक्षाचं अस्तित्व संपलं, असं म्हटलं जात होतं.
 
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनीही ‘काँग्रेस मुक्त भारत’ बनवणं हेच आपलं उद्दीष्ट असल्याचं वेळोवेळी म्हटलं.
 
मात्र, तज्ज्ञांच्या मते, काँग्रेसची कामगिरी कितीही वाईट असली तरी काँग्रेस पक्षच अजूनही प्रमुख विरोधी पक्ष आहे, काँग्रेस मुक्त भारतचा खरा अर्थ हा विरोधी पक्ष विरहित भारत असा आहे.
 
अशा स्थितीत भारताचं राजकारण सध्या विरोधी पक्ष विरहीत झालं आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.
 
त्यातही राहुल गांधी किंवा काँग्रेसचे इतर नेते म्हणतात त्याप्रमाणे भारत जोडो यात्रा बिगर राजकीय असली तरी राहुल गांधींना विरोधी पक्षाचे नेते म्हणून ओळख मिळण्यासाठी तिचा किती उपयोग झाला, हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं.
 
जनता दल (संयुक्त) पक्षाचे महासचिव आणि माजी राज्यसभा खासदार के. सी. त्यागी म्हणतात, “राहुल गांधी यांनी कधीही असं म्हटलं नाही की त्यांनी विरोधी पक्षांचे नेते म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही यात्रा केली आहे.”
 
त्यागी यांच्या मते, “भारत जोडो यात्रा हा एक सांस्कृतिक आणि जनजागृतीसाठीचा एक उपक्रम आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची गर्दी पाहिल्यास ही यात्रा चांगल्या हेतूने केला जात असलेला एक कार्यक्रम आहे, इतकंच त्यामधून दिसतं.”
‘काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही’
के. सी. त्यागी यांच्या मते, 2014 आणि 2019 सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आपल्या इतिहासातील न्यूनतम जागा मिळाल्या. ते विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्यासही पात्र ठरले नाहीत.
 
तरीही काँग्रेस बांधून ठेवण्यासाठी, पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी आणि लोकांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी राहुल गांधींनी प्रयत्न केले आहेत. यामध्ये राहुल गांधी यशस्वीही ठरले आहेत, असंही त्यागी यांना वाटतं.
 
के. सी. त्यागी म्हणतात, “आमच्या पक्षाचं ठाम मत आहे की काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही विरोधी पक्षांची आघाडी बनूच शकत नाही.”
 
मात्र, जदयूचे नेते नितीश कुमार यांनी एनडीए सोडल्यानंतर राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर ते दिल्लीला सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी आले होते, तेव्हा काँग्रेसने त्यांना फारसं महत्त्व दिलं नव्हतं.
 
याविषयी बोलताना के. सी. त्यागी म्हणाले, “आम्ही निराश झालो नाही. नितीश कुमार सोनिया गांधींना भेटले, त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार होत्या. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकाही सुरू होत्या. त्यामुळे आम्ही पुन्हा बैठक केली पाहिजे. कारण आतापर्यंत काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. ते विरोधी पक्षांची आघाडी बनवण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत, असंही काही दिसत नाही.”
 
त्यांच्या मते, काँग्रेसशिवाय कोणतीही विरोधी आघाडी शक्य नाही. परंतु, भाजपला हरवण्यासाठी विरोधी आघाडीत नवीन पटनायक, केसीआर, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि मायावती यांचाही समावेश असायला हवं, असं त्यागी यांना वाटतं.
 
 “काळच विरोधी पक्षांची आघाडी तयार करेल,” असं ते म्हणतात.
 
1977 चं उदाहरण देताना के. सी. त्यागी म्हणाले, “त्यावेळी सगळे नेते तुरुंगात होते. एकमेकांमध्ये संवाद नव्हता. जनसंघ कुणासोबतही विलीन होण्यास तयार नव्हता. समाजवादी पक्ष वेगळ्या रस्त्याने जात होता. जयप्रकाश नारायण यांना कोणताही पक्ष बनवायचा नव्हता. पण जनतेने आपल्यासाठीचा पर्याय निवडला. जनतेने सर्वांना एकत्र येण्यास भाग पाडलं आणि इंदिरा गांधींच्या काँग्रेसला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
 
ते म्हणतात, “देशाची सामाजिक सौहार्द, धर्मनिरपेक्षतेची परंपरा वृद्धिंगत करण्याची इच्छा आणि आकांक्षा ज्या पक्षांची जास्त असेल, ते पक्ष राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकत्र येतील, असं मला वाटतं.”
‘विरोधी पक्षांच्या आघाडीची चर्चा घाईची’
कोणत्याही निवडणुकीत उत्तर प्रदेश सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. कारण, येथून एकूण 80 खासदार निवडून येतात.
 
गेलया दोन निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळण्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील पक्षाची कामगिरी. दोन्ही वेळेस भाजपने 60 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. त्यातही 2014 साली हा आकडा 71 होता.
 
त्यामुळे भाजपला रोखायचं असल्यास उत्तर प्रदेशातच रोखलं पाहिजे. परंतु, तिथे विरोधी पक्षही विखुरलेल्या अवस्थेतच आहे.
 
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी म्हणाले, “भारत जोडो यात्रा ही द्वेषाच्या राजकारणाच्या विरोधातील एक शानदार प्रयत्न आहे. यामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाला उभारी मिळून ते मजबूत झाले तरी अजूनही 2024 च्या निवडणुकीबाबत चर्चा करणं घाईचं ठरेल.”
 
2023 मध्ये सुमारे 12 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. बहुतांश राज्यांत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे.
 
समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या मते, या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी कशी असेल, यावरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असणार, हे अवलंबून असेल.
 
उत्तर प्रदेशबद्दल सांगताना घनश्याम तिवारी म्हणतात, “अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्ष संपूर्ण क्षमतेने भाजपविरुद्ध लढा देण्याची तयारी करत आहे.
 
ते म्हणतात, “समाजवादी पक्षा विरोधी पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न थेट फेटाळून लावत नाही. पण सध्या तरी अशा प्रकारच्या आघाडीबाबत काहीही बोलणं घाईचं ठरेल.”
‘काँग्रेसशिवाय विचार करू शकत नाही का?’
काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) सरकार असताना तेलंगणा राज्याची स्थापना झाली होती. त्यावेळी केसीआर यांच्या टीआरएसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल, असं सांगितलं जात होतं.
 
आज अशी स्थिती आहे की टीआरएस केवळ काँग्रेसचा कट्टर विरोधी पक्ष बनला नाही, तर राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) ठेवलं आहे.
 
बीआरसचे प्रवक्ते कृषांक मन्ने यांच्या मते, “राहुल गांधी भलेही आपली यात्रा राजकीय नसल्याचं म्हणत असले तरी त्यांनी भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांमध्ये राजकीय वक्तव्ये केली. इतकंच नव्हे तर सत्ताधारी पक्ष हे भाजपची बी टीम असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.”
 
मन्ने सांगतात, “भारत जोडो यात्रा ही पूर्णपणे राजकीय आहे. राहुल गांधींची प्रतिमा तयार करण्यासाठीच तिचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाला संदेश देण्याचा वगैरे काहीही प्रयत्न यामधून केला जात नाही.”
 
अशा स्थितीत 2024 च्या निवडणुकीत बीआरएसची रणनिती काय आहे, याचं उत्तर देताना मन्ने म्हणाले, “आज आमचं लक्ष मोदींना आव्हान देण्याकडे आहे. त्यांनी 2014 साली अनेक आश्वासने दिली, पण त्यापासून ते आता दूर पळत आहेत.”
 
काँग्रेसबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, “आपण काँग्रेसशिवाय विचार करू शकत नाही का? काँग्रेस आज 40-50 जागांपर्यंतच मर्यादित आहे. इतक्या सगळ्या राज्यांमध्ये बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेसची सरकारे असताना काँग्रेसला आपण इतकं महत्त्व का द्यावं?”
‘राहुल गांधी अजूनही विरोधी पक्षांचा चेहरा नाहीत’
काँग्रेसचं राजकारण जवळून पाहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुप्ता यांनी म्हटलं, “भारत जोडो यात्रेला भाजप किंवा अनेक राजकीय विश्लेषक हलक्यात घेत होते. त्यांच्याविषयी अपशब्दही वापरत होते. पण आता राहुल गांधींना ते इतक्या सोप्या पद्धतीने काहीही बोलू शकणार नाहीत.”
 
स्मिता गुप्ता यांच्या मते, “भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काँग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. आता ते विरोधी पक्षांचे नेते म्हणून समोर येत आहेत.”
 
स्मिता गुप्ता यांच्या मते, “काँग्रेसच्या सहकारी पक्षांची जबाबदारी आहे की त्यांनी केसीआर आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांना समजावून सांगावं. भाजपला हरवणं हा उद्देश असेल तर काँग्रेससोबतच जावं लागेल.”
‘राहुल गांधींचं अपेक्षांचं राजकारण’
सामाजिक शास्त्रज्ञ शिव विश्वनाथन यांच्या मते, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे राजकीय डावपेच वेगळे आहेत.
 
ते म्हणतात, “राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हा एक प्रकारे भारताचा शोध आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या राजकीय नेत्यांना इतकं महत्त्व नाही. पण त्यामध्ये सहभागी होणाऱ्या बिगर राजकीय लोकांमुळे ही यात्रा विशेष बनते.”
 
राहुल गांधींच्या यात्रेत विविध भागातील विविध समाजगटांचे लोक सहभागी झाले. चित्रपट क्षेत्रातील उर्मिला मातोंडकर, स्वरा भास्कर, पूजा भट्ट, रिया सेन आणि आनंद पटवर्धन सहभागी झाले. सामाजिक कार्यकर्त्या अरूणा रॉय तसंच तेलंगणात रोहित वेमुलाच्या आईसुद्धा सहभागी झाल्या.
 
क्रीडा क्षेत्रातूनही अनेक जण आले. संगीत क्षेत्रातून टी. एम. कृष्णा, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा, गणेश देवी आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेसुद्धा यात्रेत सहभागी झाले.
 
शिव विश्वनाथन यांच्या मते, राहुल गांधींनी यात्रेच्या सुरुवातीला केवळ निवडणुकीबाबतच विचार केला असेल, पण यात्रा पुढे जाताना त्यांचा विचारही बदलत गेला.
 
त्यांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात राहुल गांधी आपल्या भाषणांमध्ये फक्त भाजपवर निशाणा साधत होते. पण लोकांना भेटत गेल्यानंतर त्यांना समजत गेलं की आपल्याला एका वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याची गरज आहे.
 
ते पुढे म्हणतात, राहुल गांधी यांनी हे सगळं विचारपूर्वक केलं नाही. त्यांच्याकडूनही हे नकळत होत गेलं. पण त्याचं श्रेय राहुल गांधींना द्यावंच लागेल.
यात्रेत सहभागी झालेले भारतीय हेच हिरो
पण राहुल गांधी सर्वसामान्य लोकांना आपला संदेश देण्यात यशस्वी ठरले का, या प्रश्नाचं उत्तर देताना शिव विश्वनाथन म्हणतात, “राहुल गांधींचा संदेश लोकांपर्यंत हळूहळू जात आहे. पण मला वाटत नाही की राहुल गांधी हेच भारत जोडो यात्रेचे हिरो आहेत. खरं तर या यात्रेचे हिरो ते भारतीय आहेत, जे यात्रेत सहभागी झाले.”
 
पण काँग्रेसचा लोकांना निराश करण्याचा एक इतिहास राहिला आहे, त्या दिशेने हा प्रवास होऊ नये.
 
ते म्हणतात, “राहुल गांधींना लोकांसोबत मिळून राजकारण करायचं असल्यास त्यांनी काँग्रेस पक्षात सुधारणा करायला हव्यात. त्यानंतरच आपल्याला भविष्यात एक नवा काँग्रेस पक्ष पाहायला मिळू शकतो. तसं घडलं तर चमत्कारच होईल.”
 
शिव विश्वनाथन यांच्या मते, “शरद पवार आणि नितिश कुमार यांच्यासारख्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांना केवळ सत्ताप्राप्ती करायची आहे. त्यांना स्वतःला मजबूत बनवायचं आहे. पण राहुल गांधी पहिले नेते आहेत, जे लोकांना मजबूत बनवण्याबाबत चर्चा करत आहेत, नेत्यांना नव्हे.”
 
ते म्हणतात, “यात्रेदरम्यान जे काही झालं ते स्वतः राहुल गांधी यांनाही समजलं नसावं. पण निवडणुकीच्या राजकारणापासून दूर नव्या भारताचं स्वप्न ते दाखवत आहेत, पण स्वप्न अनेकवेळा तुटू शकतं.”
 
शिव विश्वनाथन यांच्या मते, “राहुल गांधी हे अपेक्षांचं राजकारण करत आहेत. मात्र, त्यांचं राजकारण पूर्ण होण्यासाठी त्यांना राजकीय विचारांचीही गरज लागणारच आहे.”
 
Published By- Priya Dixit