1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (10:19 IST)

तुमच्या मौनामुळे द्वेषपूर्ण वक्तव्यांना उत्तेजन, आयआयएम विद्यार्थी-प्राध्यापकांचे पंतप्रधानांना पत्र

"माननीय पंतप्रधान, सध्या देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या घटनांवर तुम्ही साधलेलं मौन हे आम्हा सर्वांसाठी निराशाजनक आहे," असं पत्र आयआयएम अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात ते पुढे लिहितात, "आपल्या देशाच्या बहुसांस्कृतिक स्वरूपाला आमच्या लेखी फार महत्त्व आहे. पण माननीय पंतप्रधान महोदय, या घटनांवरचं तुमचं मौन हे अशा द्वेषपूर्ण आवाजांना अधिक बळ देत आहे आणि त्यातून आपल्या देशाच्या एकता आणि सामाजिक सलोख्यालाच तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे".
"जर द्वेष पसरवणारे आवाज मोठे असतील, तर त्यांना विरोध करणारे आवाज त्याहून मोठे असायला हवेत. मौन हा आता या सगळ्यावर अजिबात पर्याय राहिलेला नाही, हे समजल्यानंतर काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे पत्र पाठवण्यासाठी पुढाकार घेतला", अशी माहिती आयआयएम बेंगळुरूचे प्राध्यापक प्रतीक राज यांनी दिली.
"आपल्या राज्यघटनेनं कोणत्याही भितीशिवाय आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. पण आता आपल्या देशात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे," असं या पत्रात म्हटलं आहे.