गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (00:33 IST)

बोम्माला कोलुवू

दक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे बाहुल्यांची रचना. बोम्माला म्हणजे बाहुली आणि कोलुवू म्हणजे रचना. नवरात्र उत्सव कानडी लोकांच्या घराघरात अशा पद्धतीचा उत्सव साजरा केला जात असल्याचे दिसेल. लग्नानंतर मुलीच्या रुखवतात पाच बाहुल्या दिल्या जातात. मुलगी सासरी आल्यानंतर या बाहुल्या जपून ठेवते. जेव्हा कुटुंबात मुलगी जन्माला येते तेव्हापासून घरात 'बोम्माला कोलुवू' उत्सव सुरू होतो. मराठी संस्कृतीत गौरी पूजनाच्यावेळी जशी आरास केली जाते तशी या नवरात्र उत्सवात 'बोम्माला कोलुवू'ची करण्यात येते. एका अर्थाने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठीच कानडी लोकात 'बोम्माला कोलुवू' साजरा करण्याची प्रथा आहे. 
 
दक्षिण भारतातील विविध राज्यांतून अनेक कुटुंबे नोकरीच्या निमित्ताने सोलापूरला आली असून याच ठिकाणी स्थायिक झाली आहेत. ही मंडळी मराठी मुलखात एकरूप झाली आहेत. इथले मराठी सण-समारंभ, उत्सव साजरे करताना त्यात दक्षिण भारतीय संस्कृतीचे वेगळेपण दिसून येईल. 'बोम्माला कोलुवू' हादेखील अशा उत्सवापैकीच एक आहे. घरातील महिला नऊ दिवसांचा उपवास धरतात. काहीजणी कडक उपवास करतात तर काहीजणी एकदा जेवण करून उपवास पूर्ण करतात. या उत्सवकाळात सात पायर्‍या असलेल्या आसनावर विविध देवदेवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. सर्वात वरच्या पायरीवर दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती विराजमान असतात. दुसर्‍या पायरीवर दशावतार म्हणजेच विष्णूचे दहा अवतार स्थानापन्न असतात. यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण आणि कलकी यांचा समावेश असतो. तिसर्‍या पायरीवर राम, लक्ष्णम, सीता यांची मूर्ती आणि राज्याभिषेक सोहळा तसेच हनुमान आणि रामदास स्वामी असतात. चौथ्या पायरीवर अष्टलक्ष्मी विराजमान झालेल्या असतात. यामध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, स्थैर्यलक्ष्मी, विजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, गजलक्ष्मी आणि संतान लक्ष्मी यांचा समावेश असतो. उर्वरित तीन पायर्‍यांवर मात्र विविध प्रकारची सजावट केलेली असते. घरात जशी जागा असेल त्याप्रमाणे ही रचना कमी जास्त असते. सात पायर्‍यांच्या आसनावर विराजमान या सर्व देवदेवतांची दररोज मनोभावे पूजा केली जाते. श्लोक पठण होते. महिलांना निमंत्रित करून हळदीकुंकवाचे कार्यक्रम केले जातात. नऊ दिवस रात्रीच्यावेळी देवीची गाणी गायिली जातात. दहाव्या दिवशी खिरीच्या महाप्रसादाने 'बोम्माला कोलुवू' उत्सवाची सांगता होते. 
 
आमचे कुटुंब मूळचे कर्नाटकातले. शिक्षण कन्नडमध्ये झाले. नोकरीच्या निमित्ताने 40 वर्षांपूर्वी सोलापुरात आलो. मध्य रेल्वे सोलापूर विभागात 39 वर्षे मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर काम करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्यंकटेश हा माझा भाऊ, लक्ष्मी ही भावज, शैलजा आणि स्वाती या त्यांच्या दोन मुली तसेच दिव्या ही माझ्या लहान बहिणीची मुलगी असे आमचे कुटुंब. आमच्यासारखी अनेक कर्नाटकी कुटुंबे सोलापुरात आहेत. या उत्सवकाळात आम्ही एकत्रे येऊन आनंदाने हा सण साजरा करीत असतो. मुलीच्या जन्माचे स्वागत या उत्सवात केले जाते. 21 वर्षांपूर्वी माझ्या भावाला मुलगी झाली तेव्हापासून हा उत्सव सुरू केला. दरवर्षी नऊ दिवस घरातील सर्वजण उपवास करतो. उपवासाची पद्धत महाराष्ट्रीन आहे. महिलांच्या हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. मकर संक्रांतीला मराठी कुटुंबातील महिला ज्याप्रमारे वस्तू लुटतात त्याप्रमाणे आम्ही या 'बोम्माला कोलुवू' उत्सवात वस्तू लुटतो. देवीला खिरीचा नैवेद्य असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी, भाताचे वेगवेगळे प्रकार यामध्ये असतात. पाच सौभाग्यवती महिला आणि नऊ कुमारिका यांची पूजा केली जाते. सप्तमी, अष्टी तसेच नवमीच्या  दिवशी कन्या पूजेला महत्त्व आहे. देवीचा अवतार समजून त्यांचा आदर सत्कार केला जातो. दोन ते नऊ वयोगटातील कुमारिकाच्या पूजेसाठी लागतात. दोन वर्षाच्या कुमारिकेची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते, असे सांगतात. तीन वर्षाची कन्या 'त्रिमूर्ती' असून. तिच्या पूजनाने धनधान्य आणि कुटुंबात सुख समृद्धी येते. चार वर्षाची कल्याणी. तिच्या आराधनेमुळे परिवाराचे कल्याण होते. पाच वर्षाच्या 'रोहिणी'मुळे रोगमुक्ती होते. सहा वर्षाची 'कलिका' तिच्यामुळे विद्या,विजय आणि राजयोगाची प्राप्ती होते. सात वर्षाची कन्या म्हणजे चंडिका. तिच्या पूजेने ऐश्वर्य प्राप्ती होते. आठ वर्षाच्या   शाम्भवीमुळे वादविवादात विजय मिळविता येतो. नऊ वर्षाची कन्या दुर्गा मानली जाते. तिच्या पूजेमुळे शत्रूचा नाश होतो. अशा प्रकारे कुमारिकांचा सन्मान या बोम्माला कोलुवूमध्ये केला जातो. नवरात्र उत्सवात स्त्रीशक्तीची अशी आराधना केली जाते. त्यामुळे ऐश्वर्य प्राप्ती होते.
 
सीता अय्यर