शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा'

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.

माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.

आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तीचे लक्ष आहे.