रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (15:20 IST)

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय १

‎Shri Renuka Devi Mahatmya Adhyay 1
सद्‌गुरुं प्रथमं वंदे । शंकरं तदनंतरे ॥
इष्टार्थ सिद्धये देवी । निर्विघ्नाय विनायकम्‌ ॥
पंचवर्ण महासूत्र । सांप्रदाय प्रर्वतकम्‌ ॥
पूवल्लि सिद्धचैतन्य । प्रणमामि गुरुं परम्‌ ॥
श्री जगदंबा रेणुकादेवीस नमस्कार
 
पुण्याश्रम अशा आपल्या भरतभूमीत सर्व ऋषिपुंगवाचे मूलस्थान असे नैमिष्यारण्य नामक एक पवित्र स्थान प्रसिद्ध होते. या अरण्यात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व देवताप्रीत्यर्थ शांति होमादि पुण्यकर्मे करीत असलेले ऋषि जपतपादि कार्यात मग्न असता, त्यांचे मनोरथ पूर्ण करण्याकरिता वेदव्यासाचे श्रेष्ठ शिष्य सूतमुनि तेथे आके. शौनकादि मुनींनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व ते त्यांना म्हणाले, "स्वामी, केवळ आमच्या पुण्याईनेच आज आम्हास आपले दर्शन झाले. १८ पुराणे रचून लोकोद्धारक झालेल्या वेदव्यासांचे आपण शिष्य आहात, तेव्हा आपले माहात्म्य आम्ही काय वर्णन करू शकणार?" आपण अनुग्रह करुन येथवर आम्हास उपदेशिलेल्या नित्यानंद परिपूर्ण परज्योति परमात्म्याकडून निर्मिलेल्या व चराचर प्रपंच स्थितीस कारणीभूत झालेल्या श्री नारायणाच्या दशावतारापैकी मत्स्य-कूर्म-नरसिंह-वामन आदि पाच अवतारांच्या कथा ऐकून आम्ही धन्य झालो. आता पुढील परशुरामाच्या अवतारांची सविस्तर कथा आम्हास सांगावी अशी विनंती आहे. "त्यावर सूतमुनी म्हणाले, "हे सद्‌भक्तिनिरत शौनकादि मुनिगणहो ! तुमची इच्छा तृप्त करुन तुमच्या मनास आनंद देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. अत्यंत प्रबल अशा परशुरामाच्या अवताराची कथा सांगतो. कश्यप ब्रह्माची पत्‍नी अदितिदेवी ही श्रीशंकराच्या वरप्रसादाने अयोनिज होऊन तिने भूमिवर यज्ञकुंडात जन्म घेतला व जगदंबा-एकवीरा-रेणुकादेवी अशी नावे घेतली आणि पतीच्या अनुगह प्रसादाने तिच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या श्री परशुरामाने दुष्ट क्षत्रियांच्या संहार करून भूभार हलका केला. या मातेचे माहात्म्य श्रवण केल्याने परशुरामाचे संपूर्ण चरित्र स्पष्ट समजणार आहे." हे ऐकून शौनकादि मुनि म्हणाले, "हे सूत मुनि हो ! आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणे एकचित्तान त्या देवीचे चरित्र श्रवन करतो, तरी आपण ते आम्हास सांगावे "सूत म्हणाले, "शौनकादि ऋषिगणहो ! सर्व संपत्तीचे माहेरघर असलेल्या हस्तीनावती नगरात, भारतीय युद्धांतून मोकळा झालेला धर्मराजा आपणास कष्ट दिलेल्या धृतराष्ट्र गांधारीचेही अत्यंत भक्तिपूर्वक रक्षण करीत धर्माने राज्य करीत होता. या त्याच्या राज्यकारभारातील वैशिष्ठ्याने धर्मास ग्लानी न येता वेळोवेळी पाऊस पडून सर्व प्रकारची धान्याची समृद्धि होती व साधु-सत्पुरुष कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता निष्ठेने आपल्या नित्यनैमित्तिक कर्माचे यथाविध आचरण करून सुखाने रहात होते. सर्व संपत्ति येथील प्रजाजनांना सोडून न जाता जणू काय त्यांच्या आश्रयालाच येऊन राहिली होती अशी स्थिती असता मैत्रेयी मुनींचा सदुपदेश घेतलेले धर्मराजाचे चुलते विदुर एकदा हस्तिनावतीस आले. विदुरांचे यथोचित स्वागत करून व त्यांना साष्टांग नमस्कार करून धर्मराजा म्हणाला, "काका तुम्ही सर्व क्षेम आहात ना? आम्ही आजपावेतो आपल्या अनुग्रहास पात होऊन सुखरुप आहोत." हे ऐकून विदुर मुनि धर्मराजास आशीर्वाद देऊन म्हणाले "धर्मराजा तू तुझ्या सद्‌वर्तनाने ख्याति पावला आहेस व तू धन्य आहेस." नंतर त्यांनी आपल्या ठिकाणी परिपूर्णत्वाने वास करीत असलेले नैतिक विचारही धर्मराजास सांगितले. त्यावेळी तेथेच असलेल्या भीम-अर्जुन-नकुल-सहदेव-द्रौपदी वगैरेनी विदुर मुनीचे सत्कारपूर्वक आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केले. नंतर विदुर मुनि तेथेच रहात असलेल्या धृतराष्ट्राचे दर्शन घेण्याकरिता गेले व त्यास ते साष्टांग नमस्कार करून तत्वोपदेश करीत म्हणाले, "धृतराष्ट्रा तुझा वृद्धापकाळ झाला असताही तुझी प्राणाची आशा सुटेना; तसाच तुझा देहाभिमान व राज्यलोभही तुला अद्याप सोडवेना तुझे सारे पुत्र मरुन तू आपल्या आप्तेष्टांच्या हाती सापडलास, तरीही तुला अद्याप वैराग्य कसे आले नाही याचेच मला आश्चर्य वाटत आहे. हे पहा, तुम्ही नाना तर्‍हेचे कष्ट दिलेले धर्म-भीम-अर्जुन-द्रौपदी यांनी ते विसरून तुझे व गांधारीचे अत्यंत भक्तिने पालन केले आहे. हे पाहिले म्हणजे तेच धन्य व पुण्यवान होत. त्यांनाच पुढे सद्‌गति मिळणार आहे. त्यांची माता कुंतिदेवी हिचा महिमा वर्णन करणे आदिशेषासही शक्य नाही. मग मी तिचे अधिक काय वर्णन करणार ? हे विदुराचे हितवचन ऐकून गांधारी व धृतराष्ट्र विदुरासमवेत निघाले व विदुरांचे गुरु, मैत्रेयी मुनि यांचे दर्शन घेऊन. त्यांनी गंगा, भागिरथी इत्यादि नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि विषय पराङमुख होऊन परमेश्वर चरणी मन लावून मोक्षाची अपेक्षा करीत जपतपादी करू लागले. त्यांच्या वियोगाने व्यथित झालेले धर्मराज, विदुर काका, गांधारी, धृतराष्ट्रांसह आपणास न सांगता कोठे निघून गेले ? आपली काही चूक झाली नाहीना? अशा प्रकारे चिंता करू लागले. इतक्यात त्रिकालज्ञानी नारद तातडीने तेथे आले व त्यांनी गांधारी, धृतराष्ट्र विदुर वगैरेंची क्षेमकुशल धर्मराजास कळवून त्याची चिंता दूर केली. धर्मराजा संतुष्ट होऊन आनंदाने काही दिवस राज्यकारभार पाहू लागला. त्यावेळी द्वापार युगाचा शेवट व कलियुगाचा आरंभ काल आला हे जाणून श्रीकृष्णाने अर्जुनास बोलावणे पाठविले व त्यास आधीच उपदेशिलेल्या गीतारहस्याचे स्मरण करून दिले आणि म्हणाले की, "अर्जुना, जन्मलेल्याला मरण हे निश्चित आहेच, त्याप्रमाणे मी आता देह विसर्जन करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचा नातू परीक्षित याजवर राज्यकारभार सोपवून शिवसायुज्य पद मिळवावे" असा उपदेश करून श्रीकृष्णाने देहत्याग केला.
 
इकडे हस्तिनापुरीत धर्मराजा आपली आई कुंतिदेवी हिला बोलावून नमस्कार करून म्हणाला, "आई द्वारकेस गेलेला अर्जुन आला नाही याचे कारण काही कळत नाही माझ्या शरीराचा डावा भाग सारखा स्फुरण पावत आहे’ कोल्हे पूर्व दिशेकडे तोंड करून ओरडत आहेत; वरचेवर भूकंपाच्या बातम्या कानी येत आहेत’ गाई उलट बाजूने मला प्रदक्षिणा घालीत आहेत; या सर्व अनिष्ट गोष्टींच्या सूचनांवरून पाहता यापूर्वीच नारद मुनीनी मला श्रीकृष्ण देह विसर्जन करणार आहेत असे सांगितले होते ते खरे झाले असावे असे वाटते. काहीही असो, आतापर्यंत तरी द्वारकेकडील काहीच बातमी कळाली नाही. यास उपाय काय योजवा याचीच मला चिंता लागली आहे. यावर कुंतिदेवी धर्मराजास म्हणाली, बाळ, अर्जुन लवकरच परत येईल, त्याची चिंता तू सोड व निष्ठापूर्वक तुझ्या नित्यनैमित्तिक पूजोपचारादि कार्यास लाग’ यावर धर्मराजाने आपल्या आईच्या आज्ञेप्रमाणे पूजा वगैरे आटोपली व साधु-सत्पुरुषांची इच्छा नेहमीप्रमाणे तृप्त करून थोडा वेळ जातो न जातो इतक्यात द्वारकेहून आलेला अर्जुन धर्मराजास नमस्कार करून म्लान मुखाने त्याचे समोर उभा राहिला. अर्जुनाचे खिन्नवदन पाहून धर्मराजा त्यास म्हणाला, "अर्जुना तुझा चेहरा दुःख व्याप्त दिसतो, का बरे?" द्वारकेकडे सर्व क्षेम आहे ना?" इतके बोलण्याचाच अवकाश, अर्जुन जवळच असलेल्या आपल्या आईच्या पाया पडून. "आई श्रीकृष्ण आम्हाला सोडून गेले" असे म्हणून दुःखाने धरणीवर गडबडा लोळू लागला हे पाहून कुंतिदेवी, धर्म, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी सर्वजण अत्यंत दुःखीत होऊन शोकसागरात बुडून गेली. ही बातमी नगरात पसरताच सर्व लोक दुःखाने व्याकूळ होऊन धर्मराजाकडे सांत्वनासाठी येऊ लागले. धर्मराजा हे सर्व दुःख सहन करून शांत चित्ताने अर्जुनास म्हणाला, ’अर्जुना ऊठ ! आजपर्यंतचा आमचा भाग्योदय केवळ श्रीकृष्णामुळेच झाला. त्याचा वियोग झाल्यावर आम्ही जगावयाचे तरी कशासाठी ? आम्ही स्वर्गवासी व्हावे हेच बरे. आता कलिप्रवेशाचा काल आला आहे. या कलीचे सोबत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा संहार जोरात सुरू आहे ? आता आम्ही विलंब कशासाठी करावयाचा ? परिक्षितास सिंहासनावर बसवून त्याचेवर राज्यकारभार सोपवून पुढील आमच्या सद्‌गतीच्या मार्गास आम्ही लागावे हे बरे" हे धर्मराजाचे बोलणे ऐकून तेथे जमलेले सर्व लोक जगदीशाचे ध्यान करण्यात तत्परतेने लागले असे सूत मुनींनी शौनकादि ऋषींनी सांगितले.
 
वेदव्यासांचे हस्तिनावतीस आगमन
 
सूत - शौनकादि ऋषिगणहो ! कृष्णाच्या वियोगाने धर्म-अर्जुनादि दुःखित झाले आहेत हे जाणून वेदव्यास हस्तिनावतीस आले व त्यांनी धर्मराजाची भेट घेतली. वेदव्यासांच्या आगमनाने सर्वजण आपले दुःख विसरले व त्यांनी वेदव्यांसाना नमस्कार केला, धर्मराज वेदव्यासांना यथोचित आसनावर बसवून व त्यांच्यापुढे हात जोडून नमस्कार करून म्हणाला, "ऋषिवर्य ! श्रीकृष्ण आम्हाला सोडून गेले" त्यावर व्यास म्हणाले, "हे धर्मनिष्ट राजा ऐक. परंज्योति परब्रह्माच्या इच्छामात्रेकरून उत्पन्न झालेल्या शक्तिपासून सत्त्व-रज-तम हे तीन गुण उदभवले. या तीन गुणांचे आधिदैवत ब्रह्म-विष्णु-महेश्वर हे जगाची उत्पत्ति, स्थिति आणि लय करीत आहेत. त्या परवस्तूस शैव शंकर, वैष्णव, विष्णु, शक्ति, आदिशक्ति, गाणपत्य, गणपति व सौर सूर्य म्हणुन आपापल्या आवडीप्रमाणे नावे ठेवून त्या त्या देवतांची उपासना करीत आहेत. तरीही "एको देव परब्रह्म" म्हणून सकल श्रुति-स्मृति वेदागम (तो परब्रह्म एकच आहे) म्हणतात, त्या परवस्तुच्या सारांशापासून श्रीनारायण जगाचे रक्षण करण्यास समर्थ होऊन दुष्टांचा संहार व शिष्टाचे परिपालन करण्याकरिता दहा अवतार घेण्यास झाला आहे. यानंतर तू तुझ्या परिवारासमवेत तेथून निघून तीर्थयात्रा करीत शिवसाक्षात्कार करून घेऊन कैवल्यपद प्राप्त करून घे सांगून त्याचे दुःख दूर करून आपण तपश्चर्येकरिता निघून गेले.
 
मार्कंडेय मुनींनी धर्मराजास रेणुका (यल्लमा) देवीचे माहात्म्य सांगितले ती कथा-
 
सूत - शौनकादि ऋषिगणहो ! मार्कंडेय ऋषि धर्मराजाकडे आले तेव्हा धर्मराजाने त्यांची अर्ध्यपाद्यांनी पूजा करून व्यास-महर्षींनी आपणास केलेला सदुपदेश त्यांना कळविला. मार्कंडेय मुनींनी त्यास संमती दिल्यावर धर्मराजाने परीक्षितास सिंहासनावर बसविले व त्याचेवर राज्यकारभार सोपवून व अतिथीस मनसोक्त दानधर्म करुन आपणा परिवारसहित धर्मराजा मार्कंडेय मुनींबरोबर तीर्थयात्रेस निघाला ! वाटेत लागलेल्या निरनिराळ्या तीर्थामध्ये स्नान करीत, त्या त्या तीर्थांचे महात्म्य श्रवण करीत, ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ठिकठिकाणी धर्मराजाने दानधर्म केला. देवमंदिरांनी व गगनचुंबी वृक्षांनी युक्त अशा निबिड अरण्यांनी, त्याचप्रमाणे आकाशास भिडणार्‍या महामेरुपर्वताच्या नजीक असलेल्या तांबूस रंगाच्या पाण्याने शोभणार्‍या कुलिश नदीत स्नान करून. धर्मराजा किंचित हास्यमुखाने मुनीस म्हणाला, "मुनिराज या नदीचे पाणी असे तांबूस रंगाचे का हे कृपा करून मला सांगा !’ त्यावर मुनी म्हणाले, ’हे धर्मराजा, परशुरामाने आपल्या परशुने क्षत्रियांचा संहार केला व ते रक्तरंजित शस्त्र या नदीत धुतले त्यामुळे ही नदी रक्तवर्णाची झाली आहे व हिला कुलिशनदी हे नाव मिळाले आहे. "हे मार्कंडेय मुनींचे भाषण ऐकून धर्मराजा म्हणाला, "ऋषिवर्या, त्या परशुरामास क्षत्रियांचा संहार करण्याचा प्रसंग का प्राप्त झाला हे मला सांगावे." त्यावर ऋषि म्हणाले, धर्मराजा, परशुरामाचा बाप जमदग्नि यास क्षत्रिय कुलातील कार्तवीर्य याने ठार केले. त्यावेळी परशुरामाने आपला आजा रुचिकमुनि यांच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या मंत्रोदकाने निरपराध अशा जमदग्नीस सजीव केले व रुचिकमुनींच्या आज्ञेप्रमाणे त्या कार्तवीर्यादि दुष्ट क्षत्रिय वंशाचा समूळ नाश केला. त्याच्या पराक्रमास त्याची आई जगदंबा रेणुकादेवी हिची कृपाच कारण असल्याने. या जगन्मातेवर श्रद्धा ठेवलेल्या सर्व भक्तांचे इष्ट मनोरथ परिपूर्ण होतात. या देवीच्या पुण्याश्रम अशा रामश्रृंग पर्वताचा महिमा तर प्रसिद्धच आहे." श्री मार्कंडेय मुनींनी पूर्वीच्या ऋषींकडून समजलेली रेणुकादेवीच्या माहात्म्याची कथा अत्यंत कळकळीने धर्मराजास निवेदन केली. तीच कथा मी आपणास सांगतो. तरी भक्तियुक्त अंतःकरणाने आपण श्रवण करावी असे सूत मुनींनी शौनकादि ऋषीस सांगितले.
 
चक्रेशाची व नारायणाची ताटातूट
 
सुत - हे शौनकादि ऋषिगणहो ! श्री नारायणानी मत्स्य-कूर्म-नरसिंह-वामनादि अवतार घेऊन दुष्ट राक्षसांचा संहार केला व ते सुष्ट अशा देवतांवर अनुग्रह करून शांततेने क्षीरसमुद्रावर श्रीलक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. त्या आनंददायकसमयी, श्रीलक्ष्मी-नारायणांचा विनोद चालला होता. श्रीनारायण लक्ष्मीस म्हणाले, देवदानव व साधुसत्पुरुषांना कंटकप्राय होऊन भारी त्रास देत असलेल्या दुष्ट राक्षसांचा संहार करुन सर्वत्र शांतता प्रस्थापित केल्याचे श्रेय माझ्याशिवाय दुसर्‍या कोणालाही नाही हे तुला माहीत आहेच. म्हणून मी या बाबतीत जास्त काही सांगत नाही. असे हात वर करून श्री नारायण सांगत असता, नारायणांनी हातात धारण केलेला चक्रराज त्यांस म्हणाला की, "नारायण ! श्री शंकरास प्रसन्न करून घेऊन राक्षसांच्या नाशाकरिता तुम्ही मला मिळविले व माझ्या सहाय्याने तुम्ही राक्षसांचा संहार केला आणि जगद्‌विख्यात झालात हे सर्व विसरून तुम्ही देवीसमोर बढाई मारत आहात हे तुम्हास शोभते तरी कसे ? ही सर्व हकीकत त्रैलोक्यातही प्रसिद्ध आहे. हे तर राहू दे. एवढ्यावरच काही झाले नाही. श्री नारायणा ! यानंतर तुमच्यावर यापेक्षाहि खडतर प्रसंग येणार आहेत. त्यावेळी मात्र आम्ही दोघांचा पराक्रम विशेष प्रसिद्धीस येईल" असे चक्रराज मोठ्या धिटाईने म्हणाले. त्यावर नारायण म्हणाला, बरे तर, तसेच होऊ दे; पाहू आता तू मला सोडून ताबडतोब निघून जा. असे म्हणून त्यांनी आपल्याजवळील चक्र वेगळे केले. चक्रराज खाली उतरुन येउन म्हणाला, "नारायणा, मी येथे एक क्षणभरही न थांबता भूलोकी जाणार आहे तेव्या हा माझा आपण शेवटचाच नमस्कार घ्यावा.’ एवढे बोलून चक्रराज दुसरीकडे निघाले. अशी ही कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषींना सांगितली आणि ते पुढे म्हणाले,
 
शौनकादि ऋषिगणहो ! नर्मदानदी या काठी महिष्वती नामक एक वैभवसंपन्न नगर होते. त्या नगरीचा क्षत्रिय राजा क्रतुवीर आपल्या धर्मपत्‍नी राकादेवी समवेत गुरु शुक्राचार्याचे अनुज्ञेप्रमाणे राज्यकारभार चालवित प्रख्यात झाला होता. असे असता पौर्णिमेच्या चंद्रास थोडा काळसर डाग दिसून यावा त्याप्रमाणे या राजास पुत्र नसल्याची चिंता दिवसेंदिवस जाणवू लागली.
 
’पुत्रदुःखश्च नारीणां अशस्त्रवधमुच्येत" या वाक्याप्रमाणे राकावती राणी दिवसेंदिवस अत्यंत कृश होऊ लागली, तिचे पूर्वीचे लावण्य लुप्त झाले; हंसपक्षाप्रमाणे असणारी तिची चालण्याची ढबही नाहीशी झाली. ही गोष्ट क्रतुराजास कळून येताच तोही चिंतातूर होऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्श करू लागला. दिवसेंदिवस या राजदंपतीच्या चिंताग्नीची झळ गुरु शुक्राचार्यांपर्यंत जाऊन पोचली. त्यामुळे शुक्राचार्य तातडीने महिष्वतीस आले व त्यांनी राजदंपतीस-दर्शन दिले. राजा-राणींनी गुरुंना आपली चिंता निवेदन केली व भक्तिभावाने आणि वैभवोपचाराने गुरुची पाद्यपूजा करून अतिथि अभ्यासगतांना अन्नवस्त्रादि दाने देऊन त्यांची स्तुति केली. राजाच्या सत्काराने प्राप्त झालेल्या शुक्राचार्यांनी राजाराणीची पुत्रविषयक चिंता जाणून राकावती राणीस आपल्या सान्निध्य बोलावले व म्हणाले, "मुली तू गुरुदत्तात्रेयांच्या कृपेने वीरपुत्र प्रसवशील. तरी चिंता न करिता माझ्या श्रद्धावर विश्वास ठेवून सुखाने रहा. ही शुक्राचार्यांची अमृतवाणी ऐकून राणी राकावती आनंदित झाली व शुक्राचार्यांना म्हणाली, गुरुवर्य, आपण सांगितलेल्या पुत्रोत्पतीकरिता मी काही व्रत वगैरे आचरण करावयास हवे का?" यास शुक्राचार्य म्हणाले, "मुली, या करिता काही महान्‌ व्रत करणेची आवश्यकता नाही." तू उझ्या शरीर धर्माप्रमाणे प्रत्येक महिन्यास बाहेर बसतेसच. त्यावेळी ऋतूसूतक शुद्धीनंतर पाचवे दिवशी तू तुमच्या राजनियमाप्रमाणे दिवसा तुझ्या पतीशी पुत्रप्राप्तीकरीता समागम कर म्हणजे तुझी मनःकामना पूर्ण होईल, अशाप्रकारे गुप्त रीतीने सूचना देऊन व राजाराणीस आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या शिष्यपरिवारासह आश्रमास परत आले.
 
पुढे काही दिवस गेल्यानंतर राकावती राणीचे पापच जणू बाहेर पडले आहे असे वाटण्यासारखी ती ऋतुमति झाली सूतकाचे दिवस झाल्यावर, ते लाभ्यगदि स्नान करून, नित्यकर्माचे आचरण करून व पंचामृताचे भोजन करून राजाराणी तृप्त झाली व ऋतुवीर राजा राज्यकारभाराकरिता दरबारात गेला इकडे राकावती राणी आपल्या विश्रांतीगृहात गुरुध्यानात आपल्या पतीची मार्गप्रतीक्षा करीत विवश होऊन बसली. यावेळी क्रतुवीर राजास राजकारभाराचे काम फार पडल्यामुळे त्यास ते सर्व उरकून घेऊन राकावतीचे मंदिरात येण्यास उशीर झाला हे जाणून गर्भधारणेसाठी आतुर झालेली राकावती राणी बाहेर येऊन पाहते तो सूर्यास्ताचा समय होत आला. तेव्हा राणी तेथे न थांबता आपल्या विलास मंदिरात आली व तेथील दोर्‍यास तिने स्पर्श केला. त्या स्पर्शाने उत्पत झालेला घंटानाद क्रतुवीर राजाला बसल्या ठिकाणी ऐकू आला. तो नाद ऐकताच पुढील सर्व कामे मंत्र्यावर सोपवून क्रतुवीर राजा तातडीने राणीचे विलास मंदिरात आला. त्यास पाहून राणीस परमानंद झाला. राजाने तिची रतिविलास मुखमुद्रा पाहिली. तेव्हा राकावती राणी राजास म्हणाली, ’प्रणेशा, गुरु शुक्राचार्यांनीआजच्या या वेळेस आपणाकडून गर्भदान करून घ्यावे अशी आज्ञा केली आहे. या करिता मी अत्यंत उत्सुकतेने आपल्या आगमनाची मार्गप्रतीक्षा करीत बसले आहे. पण आपणास येणेस विलंब होत आहे हे जाणून मी शीघ्र येणेबद्दल आपणास सूचना केली." राजाराणीस आलिंगन देऊन म्हणाला, ’प्रिये आज दरबारात राजकारणाची कामे फार होती म्हणून मला येणेस विलंब झाला. मी तरी काय करणार ? सायंकाळची वेळ झाली. पहा राकावती हा काल समागमास उचित नव्हे हे तू जाणतेसच.’ यावर राकावती म्हणाली, ’प्राणप्रिया, गुरुवाक्याचा भंग येईल ना? यावेळी आपण विशेष विचार करण्यात वेळ न घालविता लवकर गर्भदान करावे.’ हे ऐकून राजाने गुरुचे ध्यान करून राणीची इच्छा तृप्त केली. या योगे दोघेही संतुष्ट झाले व स्नान, पूजा-भोजनाने तृप्त होऊन गुरुचे ध्यान करीत निद्रावश झाले.
 
चक्रच कार्तवीर्याजुन म्हणून जन्मले
 
ती रात्र निद्रानंदात घालविल्यावर अरुणोदयाचे वेळी पांढरा घोडा, शंख व पूर्णचंद्राचे दर्शन होऊन जाई, मल्लिका (मोगरा), पुन्नाग, सोनचाफा वगैरे सुगंधि पत्रि-पुष्पांनी व धूप, दीप, कर्पूर इत्यादि मंगलद्रव्यांनी गुरुपादपूजा केल्याचे राकावती राणीस स्वप्न पडले आणि त्याचवेळी आकाशातून वीज गर्जल्याप्रमाणे आवाज होऊन एक चक्र राकावती राणीने नेसलेल्या पीतांबराचे ओटीत येऊन पडले, हे पाहून राणी जागी झाली व सभोवार आश्चर्याने पाहू लागली. या विलक्षण घटनेने मिश्र अशा स्वप्नाचे काय फल मिळणार आहे कोण जाणे ! असो, पण त्यावेळी मी गुरुपूजा करीत होते म्हणून हे शुभ चिन्हच समजले पाहिजे. आता मी कसलीच चिंता करणेचे कारण नाही अशी राकावती राणीने आपल्या मनाची समजूत करून घेतली व गुरुध्यानासक्त होऊन तिने ही स्वप्नाची हकीकत आपल्या पतीस कळविली. हे ऐकताच राजा म्हणाला, ’हे स्वप्न आम्हा उभयतास शुभप्रद आहे. गुरुशुक्राचार्यांचे आशीर्वादाने तुला शूर पुत्रच होणार हे निश्चित. पतीचे बोलणे ऐकून राणी संतुष्ट झाली व राजा आपल्या राज्यकारभाराचे कामाकरिता दरबारात गेला.
 
पुढे १-२ महिने जाताच राणीचे मुखावर गर्भधारणेचे चिन्हे दिसू लागली व जसे दिवस जाऊ लागले तशी गर्भधारणा स्पष्टच झाली. क्रतुराज, त्याचे मांडलिक व प्रजाजन आनंदित झाली. पुढे राकावती राणीस पूर्ण नवमासभरताच कार्तिक कृष्ण ६ रविवारी, सायंकाळचे सुमारास हस्तरहित असा पुत्र राणीचे उदरी जन्मास आला. लागलीच ही बातमी सेवक लोकांनी राजास कळविली. त्यावर राजा खिन्न होऊन राणीचे मंदिरात आला व पुत्रांचे रूप नीटपणे पाहून राणीस म्हणाला प्रिय, असा अंगवैकल्याने-युक्त पुत्र आपणास झाला यात माझी काहीच चूक नसून, चूक तुझीच आहे. तू सायंकाळचे सुमारास अत्याग्रहाने माझेकडून गर्भधारणा करून घेतलीस. आता यास काय करावे? आमच्या पुत्र प्राप्तीच्या आकांक्षेचाच हा असा परिणाम झाला. असो; परमेश्वर कोपला तर गुरुच रक्षण करणार हे तर सर्वश्रुत आहेच. आमच्या पुत्राच्या अंगशुद्धीस मुख्य गुरुकृपाच पाहिजे. आता तू जास्त चिंता करू नकोस असे सांगून राजाने राणीचे समाधान केले. पुढे मुलास १२ वा दिवस लागण्याचे सुमारास ऋतुवीर राजाने गुरु शुक्राचार्यांना बोलावून घेतले व रत्‍नखचित पाळण्यात मुलास निजवून सुवासिनी स्त्रिया गीत गात असता गुरु शुक्राचार्यांना आपल्या मुलाचे नाव ठेवण्यास विनंती केली. शुक्राचार्यांनी राकावती राणीस आपल्या जवळ बोलावले व ते तिला म्हणाले,
 
"महाराणी आपला पुत्र कार्तिक कृष्ण षष्ठी रविवार सूर्यास्ताचे सुमारास जन्मला आहे. म्हणून मी यास कार्तवीर्याजुन असे नाव ठेवणार आहे असे सांगून शुक्राचार्य पाळण्याजवळ आले व मनाने गुरु दत्तात्रेयांचे ध्यान करीत त्यांनी मुलास नाव ठेवून मुलाचे अंगावर आपला हात फिरवला आणि श्रीगुरु दत्तात्रयाचे अनुग्रहाने सर्वांग शुद्ध होऊन जगप्रसिद्ध हो असा त्यास आशीर्वद दिला. हे गुरु वाक्य ऐकून राजा-राणि व तेथे जमलेल्या सुवासिनींनी मंगल गीत गात जयजयकार केला. नंतर राजाने या मंगल कार्यास आलेल्या सर्व सुवासिनींना वस्त्राभरणे देवून पाठविले.
 
दुसरे दिवशी गुरु शुक्राचार्यांनी राजा-राणीचे इच्छेप्रमाणे स्नान-पूजादि कामे आटपून त्यांचे आतिथ्य स्वीकारले व ते त्यांना म्हणाले. "हे राजा-तुम्हास हस्त हीन पुत्र झाल्याबद्दल चिंता करणेचे कारण नाही. गुरु दत्तात्रेयाचे कृपेने तुमचे सर्व मनोरथ सिद्धीस जातील. या मुलास ३-४ वर्ष संपताच तुम्ही त्याला घेऊन गुरु दत्तात्रेयाचे आश्रमास जावे व त्यांची पादसेवा घ्यावी. या योगे तुमची मनःकामना पूर्ण होईल असे राकावतीस सांगून आपण आपल्या आश्रमास जातो असे म्हणाले व "आता तुम्ही संतोषाने रहा" असा आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या आश्रमास गेले.
 
कार्तवोर्यार्जूनास घेऊन क्रतुवीर श्रीगुरु दत्तात्रेयाच्या आश्रमास गेले.
 
सूत - शौनकादि मुनिगणहो ! कार्तवीर्याजून दिवसेंदिवस वाढू लागला व त्यास ४ थे वर्ष संपून ५ वे वर्ष लागताच राजाराणी गुरु शुक्राचार्यांचे आज्ञेप्रमाणे राजवैभवासमवेत श्री दत्तात्रेयाचे आश्रमास आले आपल्या शिष्यांकडून राजाराणीच्या आगमनाची बातमी ऐकून गुरु दत्तात्रेयांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून घेतले. राजाराणींनी आपल्या पुत्रास गुरु दत्तात्रेयाचे पायावर घातले व नमस्कार करून आपला आशय त्यांना कळविला. ते ऐकून व त्यांचा क्षेम समाचार व कार्तवीर्यार्जूनाचे अंगशुद्धीची हकिकत समजुन घेऊन गुरु दत्तात्रेय म्हणाले, हे राजाराणि तुम्ही तुमच्या पुत्राच्या अंगशुद्धीबद्दल बिलकुल चिंता करू नये. हे गुरुवाक्य सत्य असे समजा. राकावती तू पुत्रासमवेत काही दिवस गुरुजवळ राहून गुरुसेवा कर. क्रतुराजा तू आजचा दिवस येथे रहा, व गुरुप्रसाद स्वीकारून उदईक प्रातःकाळी तुझे राज्यास जाण्याकरिता नीघ आणि तेथे जाऊन राज्यकारभार यथोचित कर. असा आशीर्वाद दिला. क्रतुवीर राजा त्याप्रमाणे आपल्या लोकांसह मदिष्वती नगरीस परत येऊन राज्यकारभार पाहू लागला.
 
श्री गुरु दत्तात्रेयाचा महिमा जगप्रसिद्ध झाला ही कथा
 
शौनकादि ऋषिगणहो ! भक्तश्रेष्ठ अशी राकावती राणी गुरु सेवेत काही वर्षे राहिल्यावर माघमासातील वाढत्या चंद्राचे वैभव पौर्णिमेस षोडश कलांनी युक्त होऊन अर्व जगास तेज देते त्याप्रमाणे कार्तवीर्यार्जूनास सहस्त्र बाहू उत्पन्न होऊन त्याच्या पराक्रमाचे तेज मुखावर झळकू लागले. हे पाहून राकावती राणी त्याचप्रमाणे तेथे असणारा शिष्यवर्ग या गुरु महिमेने आश्चर्यचकित झाला. अशा प्रकारे गुरुध्यानतत्पर असलेल्या राकावती राणीस कार्तवीर्य राजास बोलावणे पाठवून आपल्या राजधानीस परत जाण्याची इच्छा झाली. ही तिची इच्छा समजून घेऊन गुरु दत्तात्रेयांनी राकावतीस आपल्याजवळ येण्याची आज्ञा केली व ते तिला म्हणाले, "महाराणी, श्रीशंकराचे सुदर्शन चक्रच तुझा पुत्र अर्जुनी म्हणून तुझ्या उदरी आले आहे. त्याचे माहात्म्य मी काय वर्णन करू? हा अत्यंत बलाढ्य होऊन देवदानवांच्या शस्त्रास्त्रांना न भिता क्षत्रियकुल श्रेष्ठ होऊन आपल्या शौर्याने तिन्ही लोकात प्रख्यात ओईल. आता तु तुझ्या पुत्रासमवेत तुझ्या राजधानीस जा. तुझ्या पतीस या पूर्वीच येथे येण्याबद्दल आम्ही कळविले आहे, त्याप्रमाणे तोही आपल्या राजवैभवासहित थोड्याच कालात येथे येईल." हे गुरुचे वचन ऐकून राणी व कार्तवीर्याजुन काही वेळ तेथेच बसले. नंतर थोड्याच वेळात राजा अत्यंत वैभवाने गुरु दत्तात्रेयांचे सन्निध आला व त्यांना नमस्कार करून आणि आणलेली गुरुदक्षिणा पुढे ठेवून आपण तेथेच बसला. राकावती महाराणी पुत्रासह पुढे आली व गुरु दत्तात्रेयास व राजास नमस्कार करून बसली. सहस्त्र भुजांनीयुक्त व तेजस्वी अशा आपल्या अर्जुनी पुत्रास पाहून राजा आश्चर्यचकित झाला व मनामध्ये गुरुच्या माहात्म्याचे स्तवन करीत त्या दिवशी तेथेच राहिला. नंतर गुरुप्रसाद सेवन करून दुसरे दिवशी आपली राणी व पुत्र अर्जुनासह, परिवारासमवेत गुरुंना नमस्कार करून व गुरुचा निरोप घेऊन राजा नगरीस जाण्याकरिता निघाला.
 
त्यावेळी गुरु दत्तात्रेयांनी अर्जुनीस आपणाजवळ बोलावले व त्याचे मस्तकावर आपला हात ठेवून ते त्यास म्हणाले, "हे अर्जुना, तू आईबापाची सेवा हीच गुरु-सेवा समाज-सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून त्याप्रमाणे आचरण करीत जा. पुढे तुझ्यावर राज्याची जबाबदारी पडल्यावर तू लोककंटक अशा दुष्ट व दुर्जन लोकांच्या उपदेशास भुलू नकोस व देव-दानव आणि सत्पुरुष यांना कष्ट देऊ नकोस. तुझा पिता ऋतूवीर यांच्याप्रमाणे धर्माने राज्य चालीव म्हणजे तुला देव-दानव अगर इतर राजे लोकांच्या शस्त्रास्त्रांचे बिलकूल भय राहणार नाही. तूच पुढे क्षत्रिय कुलश्रेष्ठ होऊन पुष्कळ दिवस राज्य करशील. या आमच्या सदुपदेशाकडे किंचितही दुर्लक्ष करून तू वागलास तर तुझे समग्र क्षत्रिय कुलच तू अधोगतीत नेशील व दुष्कीर्तीस पात्र होशील." हे ऐकून अर्जुनाने गुरु दत्तात्रेयास साष्टांग नमस्कार केला व त्यांच्या सदुपदेशाप्रमाणे वागण्याचे वचन दिले. गुरुंनी केलेला उपदेश राजा-राणी व मंत्री वगैरेनी श्रवण केला व ते गुरूची स्तुती करीत म्हणाले, "गुरुवर्य अर्जुनास केलेला सद्‌बोध यासही योग्य आहे. यापुढेही यांजवर अशीच गुरुकृपा रहावी असे म्हणून सर्वांनी गुरुस नमस्कार केला, व तेथून निघून पल्लवतोरणांनी अलंऋत अशा महिष्वती नगरीस आले. यांच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेले नागरिक स्त्री-पुरुष समारंभाने त्यांना सामोरे गेले. राजाराणी अर्जुनीसहित राजधानीत येऊन सिंहासनावर विराजमान झाले. जमलेल्या सर्व प्रजाजनांनी राजाराणीचे त्याचप्रमाणे सहस्त्रबाहूंनी शोभणार्‍या अर्जुनाचे दर्शन घेतले. अर्जुनास आशीर्वाद दिलेल्या गुरु दत्तात्रेयाचे ध्यान करीत सर्वजण आपापल्या स्नानास निघून गेले.
 
पुढे काही दिवस लोटल्यावर अर्जुनाचा प्रभाव जिकडे तिकडे पसरू लागला हे पाहून क्रतुवीर राजाने सर्व लोकांना विदित होण्यासारखा आपला राज्यकारभार अर्जुनी पुत्रावर सोपविला आणि आपण गुरुसेवा-रत होऊन तीर्थाटनास निघाला. इकडे कार्तवीर्यार्जुन गुरु दत्तात्रेयांच्या अनुग्रहाने "अष्टदश महाद्वीप साम्राज्यमति" या नावाने प्रसिद्ध पावला, व कैदेत ठेवलेल्या दशकंठ रावणास पौलस्त्य ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सोडून देवून माझ्यापेक्षा शूर वीर या त्रैलोक्यात कोणीच नाही. या दुरहंकाराने राज्यकारभार पाहू लागला; त्याच्यापुढे सर्व राजे सामर्थ्यहीन झाले." अशा प्रकारची कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषीस सांगितली.
 
पहिला अध्याय समाप्त