मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (12:13 IST)

अविनाश साबळे : वीट भट्टी कामगाराच्या मुलाचा बीड ते पॅरिस ऑलिंपिकपर्यंतचा संघर्ष

6 ऑगस्ट 2022 चा दिवस. बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता. त्याचवेळी या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले त्याचे आई-वडील मात्र, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्राच्या बीडमधील एका छोट्याच्या खेड्यात शेतातमध्ये खुरपणीचं काम करत होते.
 
3000 मीटर स्टिपलचेस प्रकारातील या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता. पण अखेरच्या 500 मीटरमध्ये त्यानं असाकाही वेग वाढवला की जणू त्यानं केनियन धावपटंच्या घशातून रौप्य पदक हिसकावलं.
 
अगदी काही मायक्रो सेकंदांच्या फरकानं त्याचं सुवर्ण पदक हुकलं. पण तरीही त्यानं केलेली ही कामगिरी अभूतपूर्व आणि ऐतिहासिकच होती.
हा तरुण म्हणजे भारताचा 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीतील धावपटू अविनाश साबळे.
बरोबर दोन वर्षांनंतर पॅरिस ऑलिंपिकमध्ये धावण्यासाठी अविनाश सज्ज आहे. एवढंच नाही तर भारतीय ऑलिंपिकच्या चमूमध्ये पदकांची सर्वाधिक अपेक्षा असलेल्यांच्या यादीतही अविनाशचं नाव बरंच वर आहे.
पण यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा अविनाशचा आजवरचा प्रवास हा शब्दशः खडतर असाच राहिला आहे.
शाळेच्या कच्च्या रस्त्यांवरून अनवाणी धावण्यापासूनचा हा प्रवास पॅरिसच्या ट्रॅकपर्यंत पोहोचला आहे.
अविनाशच्या या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करुया.
आई-वडील वीट भट्टी कामगार
महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेल्या मांडवा या लहानशा गावी 13 सप्टेंबर 1994 रोजी अविनाशचा जन्म झाला.
 
वैशाली आणि मुकुंद साबळे या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या अविनाशनं अगदी बालपणापासून गरिबी आणि संघर्ष अनुभवला. वीट भट्टी कामगार असलेल्या आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणाला मात्र कायम महत्त्व दिलं असं अविनाशनं, एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं होतं.
 
तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या अविनाशला त्याला अगदी बागडण्याच्या वयात म्हणजे 5-6 वर्षांचा असतानाच आई-वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली होती.
"आई-वडिलांना वीट भट्टीवर कामासाठी जायचं असायचं. त्यामुळं सकाळी आम्ही उठाच्या आधीच आई आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची आणि ते निघून जायचे. सकाळी ते दोघं गेल्यानंतर थेट रात्रीच आम्ही त्यांना पाहायचो. त्यामुळं ते घेत असलेल्या कष्टाची जाणीव होत होती," असं अविनाश सांगतो.
 
त्यामुळं त्यांच्या संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणापासूच अविनाशच्या मनात होतं. त्यासाठीच सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात अपयश आल्यानंतर लष्करात भरती होण्याचा निर्णय अविनाशनं घेतला. त्यानंतर लष्करामुळंच पुन्हा अविनाशला नियतीनं पुन्हा एकदा शर्यतीच्या ट्रॅकवर परतता आलं.
 
शिक्षक गाडीवर कडेवरही उचलून न्यायचे
अविनाशला अगदी लहानपणापासूच धावायची सवय लागली होती. सुरुवातीला गरज म्हणून सुरू झालेल्या धावण्यानं नंतर अविनाशच्या जीवनात छंदाचं स्थान मिळवलं होतं. त्यामुळं मग सगळी कामं धावत करायला आवडायची असं अविनाश यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
 
अविनाश पहिल्या वर्गात होता तेव्हाची आठवण सांगताना अविनाश म्हणाला की, त्यावेळी त्याची शाळा घरापासून अंदाजे 6-7 किलोमीटर अंतरावर होती. कधी कधी शाळेला उशीर व्हायचा म्हणून अविनाश शाळेत लवकर पोहोचण्यासाठी धावत जायचा. इतर मुलं पायी, सायकलवर जायचे पण मला मात्र धावायला आवडायचं. त्यामुळं मी सहा-सात किलोमीटर धावायचो. तेव्हापासूनच धावायची आवड लागली, असं अविनाश सांगतो.

त्यावेळी शाळेतल्या शिक्षकांनी प्रचंड मदत केल्याचंही अविनाश सांगतो. कुलकर्णी सर, तावरे सर अविनाशला त्यांच्या गाडीवरून शाळेत न्यायचे. वेळप्रसंगी अगदी कडेवर उचलून त्यांनी शाळेत नेल्याचंही अविनाश सांगतो.
शाळेतल्या शिक्षकांनी माझं धावणं पाहून मोठ्या वर्गातल्या मुलाशी माझी शर्यत लावली. त्यात मी जिंकलो तेव्हा या क्रीडाप्रकारात लक्ष द्यावं म्हणून अविनाशच्या शिक्षकांनीही प्रयत्न केले.
 
पहिली स्पर्धा आणि 100 रुपयांचे बक्षीस
अविनाश लहानपणी शाळेत असताना अभ्यासातही चांगलाच हुशार होता. शाळेत त्याचा कायम पहिला-दुसरा नंबर यायचा. त्यामुळं शिक्षकांचं अविनाशवर विशेष प्रेम होतं. त्याची धावण्याची आवड आणि वेग पाहून शिक्षकांनीच अविनाशसाठी क्रीडा क्षेत्रात प्रयत्न करायला सुरुवात केली होती. जीवनातल्या पहिल्या शर्यतीविषयी सांगताना अविनाश म्हणाला की, "प्राथमिक शाळेत असताना ओडते सर, मुटकुळे सर आणि तावरे सर मला रेससाठी घेऊन गेले होते. ती 500 मीटरची स्पर्धा होती आणि मी त्यावेळी 9 वर्षांचा होतो. ती माझी पहिली स्पर्धा होती."
 
अविनाशची काहीही तयारी नव्हती, पण चांगला धावतो हे माहिती असल्यानं ते त्याला घेऊन गेले होते. अविनाशनं जीवनातली ती पहिलीच शर्यत जिंकली. त्यात अविनाशला मिळालेलं बक्षीस होतं 100 रुपये.
त्यानंतर धानोरा मॅरेथॉनमध्येही शिक्षक त्याला दोन वर्ष घेऊन गेले तिथं दोन्ही वेळा अविनाशनं शर्यत जिंकली. पण ही वर्षातून एकदा असायची.
 
पहिल्या पायरीवरचं अपयश
शिक्षकांनी अविनाशला क्रीडा क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला आणि अविनाशनंही त्यादिशेनं प्रयत्न केले. अविनाश सातवीत असताना क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्र क्रीडा प्रबोधनीच्या नैपुण्य चाचणीत सहभागी झाला.
याठिकाणी प्रवेश मिळाल्यास मोफत शिक्षण मिळतं शिवाय क्रीडा क्षेत्रासाठीचं प्रशिक्षण आणि संधीही उपलब्ध होतात. त्यामुळं शिक्षकांनी अविनाशला हा मार्ग सुचवला होता.
 
अविनाशला याठिकाणी प्रवेश मिळाला आणि अ‍ॅथलेटिक्ससाठी त्याची निवड झाली. पण अविनाशला अपेक्षित असं पुढं घडलं नाही. सुरुवातीला अविनाशची उंची कमी होती. त्याचा अविनाशच्या कामगिरीवरही परिणाम जाला. त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. प्रबोधनीनं त्याला दहावीनंतर आणखी चार वर्षांचा वेळ दिला, पण कामगिरीत सुधारणा झाली नाही, त्यामुळं अविनाशला प्रबोधनितून बाहेर पडावं लागलं.

100 रुपयांचे बक्षीस ते 100 रुपये मजुरी
अविनाशनं क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी सराव करत असताना त्याचं अभ्यासाकडं दुर्लक्ष झालं. प्रबोधिनीतूनही बाहेर पडावं लागलं आणि अभ्यासातही मागे पडल्यानं त्याचं जणू दुहेरी नुकसान झालं. दहावी झाल्यानंतर मात्र अविनाशनं आता आई-वडिलांना आपण मदत करायलाच हवी असं ठरवलं. त्यामुळं मित्र शिक्षणाचेच कोर्स आणि इतर मार्ग निवडत असताना अविनाशनं कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचं ठरवलं.
 
अविनाशच्या वडिलांनी जमीन विकून त्याला शिकवायची तयारी दाखवली. पण अविनाशच्या मनाला ते पटत नव्हतं. अखेर त्यानं काकाबरोबर गवंडी कामाला मजुरीसाठी जायचं ठरवलं. कारण तिथं दिवसाला 100 रुपये मजुरी मिळणार होती. अविनाशनं अत्यंत संघर्ष करत हे काम सुरू ठेवलं. हाताची बोटं फुटल्यानं जेवताना त्याच्या हाताची अक्षरशः आग व्हायची. पण, तेही सहन करत अविनाश झगडत राहिला.
 
अगदी बारावीला असतानाही सकाळी कॉलेज आणि दुपारनंतर मजुरी हे तो करत राहिला. पूर्णवेळ येत नसल्यानं इतरांना मिळणाऱ्या 150 रुपयांऐवजी अविनाशला मात्र 100 रुपयेच मजुरी मिळायची.
 
पण पहिली शर्यत जिंकून मिळालेलं 100 रुपयांचं बक्षीस ते 100 रुपये मजुरी हा काही वर्षांचा काळ अविनाशला बरंच काही शिकवून गेला आणि त्या शिकवणीचा त्याला आजही फायदा होत आहे.
 
लष्कराने घडवले करिअर
बारावी पास झाल्यानंतर अविनाशच्या जीवनातलं सर्वात महत्त्वाचं वळण आलं ते म्हणजे लष्कर भरतीचं. मित्रांबरोबर अविनाशनंही लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न केले आणि त्यात तो यशस्वीही झाला.
 
लष्करात भरतीसाठी निवड झाल्याचा आनंद अविनाशच्या संपूर्ण कुटुंबासाठी गगनात मावेनासा असा होता. जीवनाचं सार्थक झाल्याची भावना त्या सगळ्यांच्याच मनात होती.
 
पण खरं तर ती अविनाशसाठी एका नव्या वेगळ्या नव्या जीवनाची सुरुवात होती. अविनाशनं अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि चार वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं ड्युटीही केली.
 
ऑलिंपिकच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, लष्करातील नोकरीच्या पहिल्याच्या दोन वर्षातच अत्यंत कठिण अशा परिस्थितीचा सामना अविनाशला करावा लागला. एकिकडे सियाचीनमधील गोठवून टाकणारी थंडी आणि दुसरीकडे राजस्थानातील गर्मी अशा परिस्थितीचा सामना अविनाशनं केला.
पण 2015 मध्ये लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीच्या निमित्तानं अविनाश पुन्हा एकदा धावण्याकडं वळला. अवघ्या एका वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत तो पाचव्या स्थानावर आला.
 
काहीही झालं तरी जिंकायचंच ही जिद्द अविनाशला लष्करा मिळाली आणि त्या जोरावर त्यानं यश मिळवायला सुरुवात केली.पण लष्करात वाढवलेलं वजन त्याला अडचणीचं ठरत होतं. त्यामुळं त्यावेळी 24 वर्षांच्या असलेल्या अविनाशनं वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली.

ड्युटीमधून वेळ मिळेल तेव्हा पहाटे 3 वाजता असेल किंवा दुपारी 12 वाजता तो थेट धावायला निघायला. त्यातून 15 किलोपेक्षा जास्त वजन कमी करत अविनाश पुन्हा धावायला लागला. अशाच एका स्पर्धेत प्रशिक्षक अमरिश कुमार यांची अविनाशवर नजर गेली.
 
30 वर्षे जुना विक्रम मोडला
क्रॉस कंट्री स्पर्धेनंतर अविनाश पुण्यात आर्मी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला होता.अविनाश याठिकाणी सराव करत असताना स्टिपलचेसच्या स्पर्धकांबरोबर सराव करायचा.
 
हा सराव करत असताना अमरिश कुमार यांनी अविनाशला पाहिलं. अविनाशला 5000 मीटर किंवा 10000 मीटर स्पर्धेत धावायचं होतं. पण त्याची धावण्याची स्टाईल पाहून अमरिश यांनी त्याला स्टिपलचेससाठी प्रयत्न करण्यास सांगितलं.
 
अविनाशबाबत बोलताना प्रशिक्षक अमरिश म्हणतात की,"अनेक अ‍ॅथलिट होते, पण अनेक अ‍ॅथलिट होते, पण अविनाशची मेहनत आणि त्याचं बॅकग्राऊंड पाहता परिश्रम करण्याची त्याची तयारी दिसत होती. तसंच त्याच्या शरीराची रचनाची खास होती. त्यामुळे स्टिपलचेससाठी त्याची निवड केली."
अमरिश यांनी अविनाशला प्रशिक्षण दिलं आणि त्याचं फळंही त्याला लवकरच मिळालं. 2018 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अविनाश साबळेनं 3000 मीटर स्टेपल चेस प्रकारातील 30 वर्षे जुना विक्रम मोडत नवा राष्ट्रीय विक्रम केला.
 
भुवनेश्वरमध्ये झालेल्या या रेसमध्ये अविनाशनं 1981 मधील गोपाल सैनी यांच्यापेक्षा 0.12 सेकंदानं कमी वेळ नोंदवत 8.29.88 मिनिटांचा नवा विक्रम केला.
 
त्यानंतर अविनाशनं 3000 मीटर स्टिपलेस प्रकारात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वेळा नवीन राष्ट्रीय विक्रम करत अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली.
 
यश आणि संघर्षाची समांतर रेष
अविनाशला एकिकडं नवी क्षितिजं खुणावू लागली होती. पण त्याचवेळी जबाबदाऱ्यांच्या ओझ्याची जाणीवही कायम होती. त्यामुळं आर्थिक अडणींवर तोडगा काढ्यासाठीही त्याचं बरंच बळ वाया जात होतं.
 
अविनाशनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सुरुवातीला ट्रेनिंग सुरू झालं तेव्हा 18-20 हजार पगार होता. त्याला घरी पैसे द्यावे लागायचे त्यामुळ पैसे वाचत नव्हते. त्यामुळं ट्रेनिंग करताना, शूज खरेदी करताना असा अनेक बाबींचा विचार त्याला करावा लागत होता.
यावर त्यानं स्वतः आणखी एक मध्य मार्ग निवडला होता. तो म्हणजे मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्याचा
 
अविनाश सांगतो की, "10 हजार, 20 हजार बक्षीसं असलेल्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये मी धावायला जायचो. त्यावेळी स्पर्धा जिंकून मिळणारा पैसा गरजेचा होता. इतर खर्च नको म्हणून तेव्हा, हॉटेलवर खर्च न करता मॅरेथॉनच्या टेंटमध्ये झोपायचो. त्यातून खर्च निघायचा. नंतर काही मोठ्या मॅरेथॉन जिंकल्यानंतर बहिणीचं लग्नं केलं आणि छोटंसं घरंही बांधलं."
 
पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय पदक
अमरिश कुमार यांच्या साथीनंच रशियाचे निकोलाई स्नेसारेव्ह यांनीही अविनाशची कामगिरी सुधारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं अविनाशनं 2019 मधील फेडरेशन कप आणि त्यानंतर दोहा इथं झालेल्या IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली.
 
आंतराष्ट्रीय स्पर्धेत अविनाशनं 2019 मध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला. दोहामध्ये झालेल्या या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदत जिंक अविनाशनं भविष्यातील यशाची झलक दाखवून दिली होती.
याच स्पर्धेत अविनाशनं दोन वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. टोकियो ऑलिम्पकसाठीही अविनाश या स्पर्धेत पात्र ठरला होता.
 
1952 नंतर स्टिपलचेस प्रकारात ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारा अविनाश पहिलाच भारतीय होता. 1952 मध्ये गुलझारा सिंग मान यांना या प्रकारात भारताचं नेतृत्व केलं होतं.
 
मात्र, ऑलिंपिक स्पर्धेत त्याच्या क्षमतेला साजिसी कामगिरी करण्यात अविनाशला अपयश आलं. स्पर्धेपूर्वी दोन वेळा झालेला कोव्हिड आणि त्यामुळं आलेल्या अशक्तपणामुळं चांगली कामगिरी करता आली नसल्याचं अविनाश सांगतो.
 
थोडक्यात हुकले सुवर्ण पदक
टोकियो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर अविनाशनं पुन्हा एकदा प्रचंड मेहनत घेतली.
 
2022 मध्ये झालेल्या बर्मिंघममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याची मेहनत कामी आली आणि त्यानं पुन्हा राष्ट्रीय विक्रम करत रौप्य पदकाची कमाई केली.
 
या स्पर्धेत अविनाशचं सुवर्णपदक हे अवघ्या 0.05 मायक्रो सेकंद म्हणजेच एका सेकंदाच्या पाचव्या भागाएवढ्या वेळेच्या अंतरानं हुकलं. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविनाशचं विशेष कौतुक केलं होतं.
 
राष्ट्रकुल स्पर्धेतलं भारताला मिळालेलं 3000 मीटर स्टिपलचेस प्रकारातलं हे भारताचं पहिलं पदक ठरलं. त्यानंतर अनेक चांगल्या कामगिरींमुळं 2023 वर्ष अविनाशसाठी आणखी खास ठरलं.
 
सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेतल्या कामगिरीनं अविनाशनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.
त्यानंतर हाँगझाऊमध्ये झालेल्या 2023 च्या आशियाई स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरी करत अविनाशनं सुवर्ण पदक मिळवलं. तसंच स्पर्धेचा 8:19.20 मिनिट असा नवा विक्रमही त्यानं प्रस्थापित केला.
 
त्याचबरोबर याच स्पर्धेत अविनाशनं 5000 मीटर स्पर्धेतही 30 वर्ष जुना विक्रम मोडत चमकदार कामगिरी केली.
 
आशियाई स्पर्धेत या क्रीडा प्रकारातही त्यांनी रौप्य पदकाची कामगिरी केली. या प्रकाराचाही राष्ट्रीय विक्रम 13:18.92 मिनिट अविनाशच्या नावावर आहे.
 
अविनाशनं 1:00:30 अशा टायमिंगसह हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रमही स्वतःच्या नावावर केला आहे. 2020 मध्ये दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये त्यानं ही कामगिरी केली होती.
 
61 मिनिटांपेक्षा कमी वेळात हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्याची कामगिरी केलेला अविनाश हा आजवरचा एकमेव भारतीय धावपटू आहे.
 
अविनाशला 2022 मध्ये अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. क्रीडापटूंना दिला जाणारा हा भारतातील दुसरा सर्वात मोठा सन्मान आहे.
 
अविनाशनं एकदा बोलताना म्हटलं होतं की, "कोणत्याही किंवा विशेषतः मोठ्या पातळीवरील शर्यतींमध्ये धावताना सगळं काही आठवत असतं. संघर्ष, दुःख सगळं आठवतं. पण तरीही लक्ष ध्येयावर केंद्रीत ठेवावं लागतं. कारण जो संघर्ष आठवत असतो, तोच आणखी वेगानं पुढं जाण्याचं बळ देत असतो."
 
पॅरिसमधील स्पर्धेत ट्रॅकवर धावतानाही अविनाशला त्याच्या संघर्षानं असंच बळ द्यावं आणि भारतीय क्रीडा इतिहासात अजरामर कामगिरी त्यानं करावी याच सदिच्छा अविनाशला कोट्यवधी भारतीयांकडून आहेत.
Published By- Priya Dixit