गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (15:19 IST)

साधा चष्मा, खिशात हात आणि रौप्य पदक पटकावणारा नेम, तुर्कीच्या नेमबाजाची शैली जगभर व्हायरल

shooter Yusuf Dikech
पॅरिस ऑलिंपकमध्ये 30 जुलैच्या ज्या सामन्यात भारताच्या मनु भाकर आणि सरबजोत सिंहने 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकरात कांस्यपदक पटकावलं, त्याच सामन्यातील एका फोटोची जगभरात चर्चा सुरू आहे.
 
या फोटोबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काहींनी शंका उपस्थित केली आहे.
 
हा फोटो आहे तुर्की (तुर्कीये) चे 51 वर्षीय नेमबाज युसूफ डिकेच यांचा.
 
युसूफ डिकेच यांच्या नेमबाजीच्या शैलीचं अनेकजण कौतुक करत आहेत. त्यांच्यासंबंधी पोस्ट आणि कमेंट्सना सोशल मीडियावर अक्षरश: पूर आला आहे.
मनु आणि सरबजोत यांनी कांस्यपदक पटकावलेल्या या सामन्यात युसूफ आणि त्यांची सहकारी सेव्वल इल्यादा तरहान यांनी रौप्यपदक आपल्या नावावर केलं.
 
मात्र, 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकरातील सामन्यात कोणत्याही उपकरणांची मदत न घेता, केवळ एक साधा चष्मा लावून खिशात हात टाकून नेम साधणाऱ्या युसूफ डिकेच यांच्या शैलीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
 
युसूफ यांच्या शैलीची एवढी चर्चा का होतेय?
नेमबाजी स्पर्धेत समान्यत: खेळाडू कानावर मोठमोठे हेडफोन असतात, नेम साधण्यासाठी मदत करणारा एक विशिष्ट चष्मा वापरतात. सोबत मूमन लेन्स, ब्लाईंडर आणि इअर प्रोटेक्टर अशी उपकरणेही असतात. ही उपकरणं नेमबाजी स्पर्धेत आवश्यक मानली जातात.
 
नेमबाज प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी डोळ्यांवर एक वायझर कॅप आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी एका डोळ्यावर ब्लाइंडर लावतात.
मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुर्कीचा (तुर्कीये) नेमबाज युसूफ डिकेच यांनी वरीलपैकी एकाही उपकरणाची मदत न घेता लक्ष्य साधत रौप्य पदक पटकावलं. त्यांचा स्पर्धेदरम्यानचा वावरही फार सहज होता.
 
युसूफ यांनी गोंगाटामुळे लक्ष विचलीत होऊ नये म्हणून केवळ एक लहानसा इअरप्लग कानात लावला होता.
 
त्यामुळे हा सामना होऊन काही दिवस उलटले, तरीही समाजमाध्यमांवर युसूफ यांच्या सहजपणे वावरण्याची आणि युनिक शैलीचीच चर्चा सुरू आहे.
 
सोशल मीडियावर युसूफ डिकेच यांचीच चर्चा!
10 मीटर एअर पिस्टल प्रकारात तुर्कीच्या (तुर्कीये) युसूफ डिकेच आणि तरहान यांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रदर्शन करताना तरहानने नेमबाजीसाठी वापरली जाणारी एअर डिफेंडर, वायझर इत्यादी सर्व उपकरणं वापरली. तसंच, तिच्या वेणीमध्येही तुर्कीच्या झेंड्याचे रंग वापरण्यात आले होते. अर्थात तिचाही एक हात खिशातच होता.
 
मात्र, युसूफ डिकेच यांनी कोणत्याही उपकरणाशिवाय अत्यंत सहजपणे वावरत असल्यासारखं उभं राहात लक्ष्य साधले. त्यामुळे तो जगभरात चर्चेचा विषय ठरले.
 
युसूफ डिकेच यांच्या या आगळ्यावेगळ्या शैलीचं जगभरात कौतुक होत आहे.
 
यावर समाजमाध्यमांवर सामान्य व्यक्तीपासून ते उद्योगपती इलॉन मस्कपर्यंत अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
 
एक युजर म्हणतो, "तुर्कीने या 51 वर्षीय व्यक्तीला स्पेशलाईज लेन्स, आय कव्हर, एअर प्रोटेक्शन यापैकी कोणत्याही उपकरणाविणा पाठवलं, अन् तो रौप्यपदक घेऊन गेला."
तर दुसरा युजर म्हणतो, "हे फारच कुल आणि रिलॅक्स वाटलं."
 
एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडियाचे मालक इलॉन मस्क यांनाही युसूफ डिकेच यांच्या या शैलीवर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही.
 
त्यांनी एका युजरचे ट्वीट रिपोस्ट केले. ज्यामध्ये त्या युजरने फेसबुक, मेटा आणि लिंक्डइन या माध्यमांची तुलना एक्ससोबत केली आहे. एक्सच्या या तिन्ही प्रतिस्पर्धी समाजमाध्यमांना स्पेशलाईज्ड लेन्स व वायझरसह खेळणाऱ्या खेळाडूंच्या स्वरूपात दाखवण्यात आलं तर युसूफ यांना एक्स म्हणून दर्शविण्यात आलं.
दरम्यान, दीपेंद्र नावाच्या एका फेसबुक युजरने मात्र काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणतात, "तुर्कीच्या या खेळाडूने खूप शानदारपणे ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत रौप्यपदक मिळवलं, पण मी त्याच्या या शैलीच्या विरोधात आहे.
 
"एवढ्या मोठ्या स्पर्धेत नेमबाजी करत असताना काही मापदंड ठरलेले आहेत. डोळ्यांना स्पेशल लेन्स लावणे, कानांत इअर पॅड वापरणे आदी अनेक खबरदारी घेऊन नेमबाजी केली जाते. याने असं काहीही न वापरता नेमबाजी केली.
 
"अर्थात हा काही नियमावलीचा भाग नाही. त्याने सर्व मापदंड मोडले असले तरी रौप्यपदक जिंकलं आहे हे वास्तव आहे. मला वाटतं त्याने हात खिशात न टाकता लक्ष्य साधले असते तर तो सुवर्णपदकही जिंकू शकला असता. पुढच्या वेळी त्याने हे लक्षात ठेवावं."
 
कोण आहेत युसूफ डिकेच?
51 वर्षीय युसूफ डिकेच हे काही पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेत नाहीत. ते 2008 पासून ऑलिंपिकमध्ये तुर्कीचे प्रतिनिधित्व करत आहेत.
 
यंदाच्या ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक प्रकारात ते 13 व्या स्थानी होते. मात्र, मिश्र दुहेरीमध्ये पदक पटकावण्यात त्यांना यश मिळालं
इन्स्टाग्रामवर युसूफ यांनी एक पोस्ट केलीय, ते म्हणतात, "तुर्कीसाठी पहिले ऑलिंपिक पदक मिळवता आल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्या कोट्यवधी तुर्की नागरिकांना हे पदक समर्पित करतो. 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेतही आपण पदक पटकावू."
 
युसूफ यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांचे अनेक व्हीडिओ आपल्या इन्स्टा पेजवर एकत्रितपणे शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही तुर्की भाषेतील मीमसुद्धा आहेत.
 
नियम काय सांगतात?
ऑलिंपिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत खेळाडूंना आपल्या मनाप्रमाणे पोषाख घालण्याचे आणि क्रीडासाधनांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य आहे. याबाबत कोणतीही अशी नियमावली नाही.
 
स्पर्धेदरम्यान काही नेमबाज प्रकाशामुळे डोळे दिपू नये म्हणून डोळ्यावर वायझर घालतात. तर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी दुसरा बंद करण्यासाठी ब्लाईंडर वापरता जेणेकरून लक्ष्य साधण्यासाठी लक्ष केंद्रित होईल.
 
युसूफ यांच्याप्रमाणेच या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी चीनची रायफल शूटर ल्यू युकून हिनेसुद्ध नेमबाजीदरम्यान केवळ इअरप्लगच वापरले होते. तिने वायझर किंवा ब्लाइंडर वापरणे टाळले होते.
 
दरम्यान, या ऑलिंपिकमध्ये युसूफ डिकेच यांच्या व्यतिरिक्त दक्षिण कोरियाई नेमबाज किम येजी याच्या आत्मविश्वासाबाबतही खूप चर्चा झाली.
 
ऑलिंपिक स्पर्धेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून किम येजी आणि युसूफ यांचे फोटो प्रसारित करण्यात आले व कॅप्शन देण्यात आलंय की, "ऑलिंपिकचे हे शूटिंग स्टार आहेत, ज्यांचं महत्व आम्हाला कळलं नव्हतं."
Published By- Priya Dixit