रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (08:15 IST)

BHR घोटाळ्याच्या आरोपीने ६४ ठेवीदारांच्या घरी जाऊन दिले १ कोटी १२ लाख

देशाच्या कोणत्याच आर्थिक घोटाळयात आजतागायत घडली नव्हती. अशी एक अभूतपूर्व घटना बीएचआर घोटाळ्यात घडली आहे. चक्क एका संशयित आरोपीने अटकेच्या भीतीपोटी थोडथोडके नव्हे, तर चक्क १ कोटी १२ लाख रुपये ६४ ठेवीदारांना घरी जाऊन परत केले आहेत. यातील बहुतांश ठेवीदारांनी पुणे आर्थिक शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके मॅडमांचे आभार मानले आहेत. तसेच नवटके मॅडमांच्या कारवाईच्या भीतीमुळेच हे शक्य झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या घोटाळ्यातील संशयितांनी अटकेपूर्वी ठेवीदारांचे पैसे परत केल्यास कदाचित त्यांना दिलासा मिळू शकतो. तर दुसरीकडे अटकेतील आरोपी देखील आम्ही पैसे भरण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगत आहेत. थोडक्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईच्या भीतीमुळे ठेवीदारांचे पैसे परत मिळायला आता जोरात सुरुवात झाली आहे.

देशात आजपर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत. बँक, पतसंस्था बुडाल्या की, ठेवीदारांना आपल्या कष्टाचा पैसा मिळवण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक वर्ष कोर्टात केसेस चालतात. अगदी निकाल लागल्यानंतरही पैसा मिळत नाही. त्यामुळे अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो.अनेकांचे शैक्षणिक नुकसान होते.

तर अनेक मुलींचे लग्नही होऊ शकलेले नाहीत. थोडक्यात एकदा बुडालेला पैसा परत मिळणे कठीणच असते. परंतू बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या भाग्यश्री नवटके मॅडमांनी मागील वर्षापासून अनेक बड्या लोकांना बेड्या घातल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी राज्यातील विविध शहरातून ११ लोकांना अटक केली होती.तेव्हापासूनच या अटकसत्रामुळे संशयित आरोपींच्या मनात धडकी भरलेली आहे. याचाच परिपाक म्हणून आज बीएचआर घोटाळ्यात  पैसे परत करण्यासारखी अभूतपूर्व घटना घडली.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव-केतकी येथील संशयित आरोपी प्रमोद किसन कापसे याने ६४ ठेवीदारांचे ५० लाख रुपये चक्क घरी जाऊन परत दिले आहेत. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ठेवीदार हे शेतकरी आहेत. कापसे याने ४० टक्के रक्कम देऊन ठेवीदारांकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र करून घेतले होते. परंतू पुणे आर्थिक गुन्हे शाखेने निमगाव-केतकी येथील ठेवीदारांचे जबाब घेतले होते. त्यानुसार त्यांना फक्त ४० टक्के रक्कम मिळाली होती.

त्यामुळे पोलिसांनी कापसेला अटक करण्याची तयारी सुरु केली होती. परंतू अटकेच्या भीतीनेच कापसे याने मागील दोन दिवसात ६४ ठेवीदारांन घरी जाऊन उर्वरित ६० टक्के रक्कम देखील परत केली आहे. कापसेने आतापर्यंत तब्बल १ कोटी १२ लाखाची रक्कम परत केली आहे. तसेच पुढील काही दिवसात तो आणखी काही ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे कळते.

दुसरीकडे अटकेतील आरोपी देखील आम्ही पैसे भरण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगत आहेत. बीएचआर घोटाळा प्रकरणात कर्जदार तथा संशयित आरोपी अंबादास मानकापे व आसिफ तेली या दोघांनी कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नुकताच पुण्याच्या विशेष न्यायालयात अर्ज सादर केले होते. यापूर्वी भागवत भंगाळे यांनी देखील अशाच पद्धतीने पैसे भरायची तयारी दर्शवली आहे.

आर्थिक घोटाळ्यांमध्ये गुन्हे दाखल होतात. आरोपींना अटक केली जाते. अनेकांना शिक्षा होते. परंतू ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाही.‘सहकारातून समृद्धीकडे’, विना सहकार नाही उद्धार..सहकारी संस्थांचे हे ब्रीद वाक्य खरं तर लोकांसाठी आहे.

परंतू गेल्या काही वर्षांत संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे अनेक पतसंस्था आर्थिक नुकसानीत गेल्याची काही उदाहरणे पुढे आली. त्यामध्ये ठेवीदारांचे अधिक नुकसान झाले आहे आणि सरकारला फारशी मदत करता आलेली नाही, हे देखील एक सत्य आहे. म्हणूनच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईच्या भीतीपोटी एकाच वेळी १ कोटी १२ लाखाची रक्कम ठेवीदारांना परत मिळाल्यामुळे ही घटना अभूतपूर्व अशीच मानली जात आहे. त्यामुळेच उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि त्यांचे तपासधिकारी सुचेता खोकले, पोलीस निरीक्षक संदीप भोसलेंसह आर्थिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे ठेवीदार आभार मानत आहेत.