गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (08:13 IST)

वाढदिवसाच्या पुण्यातील बॅनरबाजीवरून अजित पवार संतापले अन् म्हणाले…

‘द गॉड फादर’, कारभारी लयभारी, विकासाचे शिल्पकार, पुण्याचे कारभारी, विकासपुरूष, आक्रमक आणि आश्वासन नेतृत्व, नव्या पुण्याचे शिल्पकार वगैरे वगैरे राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांच्या चमकोगिरीची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे गेले दोन दिवस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात अत्यंत खमंग चर्चा रंगल्या आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोरोनाकाळात कुणीही बॅनरबाजी करू नये, अशा सुचना दिल्या असतानाच पुण्यातील स्थानिक नेत्यांनी चमकोगिरीसाठी आपला नेता किती पावरफुल हे दाखवण्याच्या नादात चक्क पुण्यात होर्डिंग वॉर चालू केले.
 
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांनीही होर्डिग लावले असल्याचे पत्रकारांकडून विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले,” गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केलं आहे. जर कोणी काही केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. मी पिपंरी चिंचवडमध्ये आज आलेलो नाही. माझी मतं पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत. तुम्ही काहीतरी नविन मुद्दा काढण्यासाठी प्रश्न काढायचा हे धंदे बंद करा. अनिधकृत होर्डिंग लावावं हे मी सांगितलं नाही. मी फार नियमांच पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग जर चूकीची लागली असतील तर भाजपाची इथे सत्ता आहे. तिथल्या आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी” असे अजित पवार म्हणाले.
 
पुणे शहरात दोन्ही नेत्यांनी हे आदेश दिल्यानंतरही शहरात जागोजागी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच नेत्यांचे आदेश धुडकाविल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रमुख चौकात, रस्त्यांवर फलक उभारून आपापल्या नेत्यांनी शहराचा विकास के ल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. कार्यकर्त्यांनी उभारलेल्या या शुभेच्छा फलकांवर महापालिकेकडून कारवाई होणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.