1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (09:19 IST)

'पाच-सात सेकंदाच्या पावसानं दुकानातलं सगळं सामान खराब झालंय', आजकाल पुणे तुंबत का चाललंय?

rain
"आता असं झालंय की धंदा आता करायचाच नाही आपल्याला. सारखं नुकसान होतंय. दोन दिवसामध्ये, चार दिवसामध्ये पाणी साचतंय. अजून पूर्ण पावसाळा मागे आहे. चार महिने कसे काढायचे भीती वाटते”.
अमित गेहलोत हे सांगत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीती, तणाव, दु:ख असे सगळे भाव एकाच क्षणात उमटून गेले.
 
8 जूनच्या पावसानंतर गेल्या काही दिवसांपासून दररोज दुकानातला एक एक माल बाहेर काढून तो वाळवायचा हेच त्याचं काम झालं आहे. दुकानातली परिस्थिती अशी झाली आहे की, धंदा किंवा माल विक्रीचा विचारही ते करू शकत नाहीत.
 
दुकानाबाहेर पडलेली दोऱ्यांची रिळं, आतलं अस्ताव्यस्त पसरलेलं सामान दुकानात किती पाणी भरलं होतं याची साक्ष देतं आहे. काही सामान बाहेर वाळायला काढलं असलं, तरी अजूनही आत प्रचंड माल भिजलेल्या अवस्थेतच पडून आहे.आवरायचं तरी काय आणि सावरायचं तरी काय? या गोंधळात गेहलोत दुकानाकडं पाहत बसतात.
 
पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या माणिक बागेत गेहलोत यांची दोन दुकानं आहेत. एक स्टेशनरीचं आणि एक एम्ब्रॅायडरी आणि टेलरिंगच्या साहित्याचं.
 
काही वेळात पडून गेलेल्या पावसानं त्यांच्या दोन्ही दुकानांचं प्रचंड नुकसान झालं. नुकसानही एवढं की, आता धंदाच करू नये का? याचा विचार त्यांच्या मनात येत आहे.
शीनही झाले खराब
गेहलोत यांच्या दुकानात नुकसान झालेलं साहित्य हे किमान त्यांच्या मालकीचं तरी होतं. पण त्यांच्या शेजारच्या बॅास टेलर्स नावाच्या टेलरींगच्या दुकानात तर, ग्राहकांच्या साड्यांसह कपडे मशीन सगळ्याचंच नुकसान झालं आहे.
 
समोरासमोर दोन दुकानं असलेल्या उत्तम दबडेंच्या या दुकानांमध्ये शिवणकामासाठी आलेल्या महागड्या साड्या, ड्रेस तसंच विक्रीसाठीचं साहित्य असं सगळंच होतं. दुकानात वर टांगलेल्या ड्रेसवरही पाण्याचे डाग दिसतात. त्यावरून पाण्याची पातळी लक्षात येते.
त्यांना आता ग्राहकांना या नुकसानीची भरपाई तर द्यावीच लागणार आहे, शिवाय टेलरींगच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मशीन भिजल्यानं पुढं काय करायचं हा यक्षप्रश्नही त्यांच्यासमोर उभा ठाकलाय.
 
याबाबत दबडे सांगतात की, "चार तारखेला संध्याकाळी पाऊस सुरू झाला. सुरुवातीला नेहमीसारखाच पाऊस होता. पण अचानक वरून पाण्याचा लोंढा आला. फन टाईम पासून रामनगरचा ओढा ओव्हरफ्लो होऊन पाणी इथं दुकानात शिरलं. त्यामुळं एकदमच पाणी आलं. दोन्ही साईडची दुकानांची जी रांग आहे, त्यात प्रत्येकाच्या दुकानात पाणी शिरलं.
 
"पाणी जायला जागा नसल्यामुळं दुकानात तीन-तीन चार-चार फूट पाणी शिरलं. त्यामुळं प्रचंड नुकसान झालं. पूर्ण कापड व्यावसायिकांची गल्ली आहे. शिलाई मशीन भिजल्या. कस्टमरचे कपडे खराब झाले. आम्हाला लागणारं सगळं खराब झालं.”
 
ओढ्यांमध्ये साचला कचरा
माणिक बागेतल्या याच परिसरात 2019 मध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण एकदाच. यंदा मात्र इथं एकाच वर्षात दोनदा असं पाणी भरलं.
 
भर पावसात महापालिकेचे, फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत मदतीसाठी पोहोचले.
 
काय झालं? याचा शोध घेतला तेव्हा त्यांना सापडले बुजलेले ड्रेनेज आणि स्टॅार्म वॅाटर लाईन्समधून टाकलेल्या केबल. या सगळ्यामधून उरलेल्या जागेत कचऱ्यात चक्क गाद्याही वाहून आल्या होत्या असं ते सांगतात.
त्यातच इथं सहज पाहणी केली तरी रस्त्याच्या अलिकडच्या आणि पलिकडच्या ओढ्याच्या रुंदीत प्रचंड तफावत असल्याचं दिसतं. त्यामुळं ही परिस्थिती ओढावण्याची भीती होतीच, असं माजी नगरसेवक सांगतात.
 
बीबीसी मराठीशी बोलताना माजी नगरसेविका आणि भाजपच्या उपाध्यक्ष मंजुषा नागपूरे म्हणाल्या की, "पावसाळ्यापूर्वी काम केलं असं ते दाखवतात. पुन्हा पावसाळा आला की, पाणी साचतं हे आपल्याला दिसतंय ना. पुणेकर पाण्यात जातायत हे दिसलं. यावेळी ओढे स्वच्छ का झाले नाही? कुठं गेलं सगळं बजेट? सगळा कचरा दिसतोय तिथे अडकलेला."
 
एका दिवसांत तीन लाखांना फटका
शहराच्या अगदी दुसऱ्या टोकाला असलेल्या धानोरीतही पावसाने यंदा हाहाकार माजवला. इथल्या लक्ष्मीनगर भागात पावसाळ्यात पाणी येणं हे दुकानदारांसाठी नेहमीचंच. पण यावेळी इतका मोठा लोंढा आला की त्यात काही सामान वाचवायलाही वेळ मिळाला नसल्याचं नागरिक सांगतात.
 
दुकानातला माल या भरणाऱ्या पाण्यापासून वाचवण्यासाठी मुकेश रायका यांनी दुकानाच्या समोर भिंत बांधली. पण तीही पाणी अडवू शकली नाही. खाली ठेवलेलाच नव्हे तर, वरचा कपाटातला, फ्रीज मधला सगळा माल खराब झाल्याचंही ते सांगतात. एकाच दिवसात त्यांचं अडीच-तीन लाखांचं नुकसान झालं.सत्तर ते ऐंशी कट्टे माल त्यांना फेकावा लागला.
 
लखमाराम चौधरींनी या परिस्थितीतून वाचण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच चपलांचं दुकान हलवलं होतं. पण त्यानंही त्यांचा फायदा झाला नाही. 4 जून इथं झालेल्या पावसानंतर जवळपास त्यांचे 8-10 दिवस दुकानातला माल आवरण्यात गेले.
ओले झालेले खोके काढून ते बूट-चपलांचे जोड बाहेर काढत होते. त्यातून चांगले वेगळे करत होते. हा मालही आता निम्म्या किंमतीलाच विकावं लागणार असल्याचं ते म्हणाले
 
"पाऊस आला तेव्हा मी दुकानाच्या बाहेरच उभा होतो. अंदाज घेऊन मी खोक्यांची आवराआवर करत होतो, पण पाच ते सात सेकंदात पूर्ण दुकानात पाणी भरलं. आम्हाला कोणी नुकसान भरपाई देत नाही. त्यामुळं आता निम्म्या किंमतीत माल विकण्याशिवाय पर्याय नाही," असं ते म्हणाले.
 
कमी वेळात जास्त पाऊस?
सिंहगड रोड आणि धानोरीतील लहान व्यावसायिकांच्या या कहाण्या जवळपास संपूर्ण पुण्याचंच चित्र उभं करतात. पूर्वी कितीही पाऊस झाला तरी काही वेळातच पुण्यातल्या पाण्याचा निचरा व्हायचा.
 
ढगफुटीसदृश्य पाऊस पडला तेव्हा घरात शिरलेलं पाणी, आंबिल ओढ्याचा पूर असे काही अपवाद वगळले तर शहर तुंबणं हे पुणेकरांना माहीतच नव्हतं. पण गेल्या वर्ष दोन वर्षात सवयीचं व्हावं इतक्या सातत्यानं हे प्रकार घडत आहेत.
नालेसफाईकडे दुर्लक्ष, सिमेंटचे रस्ते अशी अनेक कारणं यामागं असल्याचं चर्चांमधून पुढं येत आहे. कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याचंही सांगितलं जात आहे. या घटना घडल्या तेव्हा 5 जूनच्या संध्याकाळी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात 101 मिलीमीटर, तर लोहगावला 115.6 मिलीमीटर पाऊस पडला. आता ही परिस्थिती सातत्यानं येणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण थोडं निरिक्षण केलं तर आणखी गंभीर कारणं समोर येतात.
 
आंबिल ओढ्याच्या घटनेच्या वेळी संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तेव्हा अनेक इमारती थेट ओढ्यावरच बांधल्या गेल्या असल्याचं अभ्यासातून पुढं आलं. शहरात कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
इतरही गोष्टी कारणीभूत
या विषयावरचे अभ्यासक जिओमॉर्लॉजिस्ट डॉ. श्रीकांत गबाले यांच्या मते, "वेगवेगळ्या विभागांच्या नकाशावरही ओढे नाले वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. त्यामुळं अनेकदा बांधकाम परवानग्या देताना नाल्यावर ओढ्याच्या मूळ प्रवाहावरच बांधकामं होतात.
 
"अधिकाऱ्यांकडं असलेल्या नकाशात मात्र, तशी नोंद नसते त्यामुळं हे बांधकाम कायदेशीर ठरतं. गुगल अर्थवर सॅटेलाईट इमेजिंगनं अगदी काही क्षणांमध्ये पाहणी करता येणाऱ्या या नोंदी सरकार दरबारी सुधारल्या मात्र जात नाहीत," असं ते सांगतात.
 
"पुणे शहराचा आकार बशीसारखा आहे आणि त्यात अगदी काही अंतरावर प्रचंड फरक दिसतो. म्हणजे उंच भाग 1100 मीटरवर असेल तर नदी 550 मीटरवर आहे. त्यात शहरात टेकड्याही आहेत. त्यामुळं पाणी वाहूनही येतं. टेरीचा रिपोर्ट पाहता, त्यांनी पाऊस वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे," गबाले पुढे सांगतात.
 
"पाऊस वाढणार म्हणजे काय? तर सुरुवातीला संपूर्ण शहरात पाऊस पडत होता. आता पॅाकेट्समध्ये पडताना दिसतो. अक्षरश: ढगफुटीसारखे प्रकार दिसतात. पण हे सर्रास कारण नाही. कमी वेळात जास्त पाऊस पडतो हे जेवढं सत्य आहे तेवढंच आहे की ते पाऊस कॅरी करण्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती कॅरिंग कॅपॅसिटी आपल्याकडे आहे का? तर ती नाहीये," असं ते म्हणतात.
 
"याचं कारण फक्त सिमेंटचे रोड नाही, तर आपल्याकडं एका ठिकाणी अनेकदा जी कामं होतात, त्यात अनेकदा रस्ते खोदले जातात. त्यात चेंबर डिस्टर्ब होतात. आधी आपल्याकडे टार रोड होते, बाजुला माती असल्यानं तिथून पाणी जात होतं. पाऊस आला तरी तो तिथून जात होता. पावसाचं जमिनीत जाण्याचं प्रमाण जास्त होतं. पण आता 90 टक्के पाणी वाहतं. ते जमिनीत जात नाही. अॅक्विफर्सचे पॅाकेट पाहिले तर त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. म्हणजेच पाण्याचा रन ऑफ एवढा वाढला आहे की,जागा मिळेल तिथे ते जातं," असंही त्यांनी म्हटलं.
 
पुण्याची परिस्थीती बिकट होत चालली असून, त्यावर उपाययोजना गरजेची असल्याची कबुली नेतेही देत आहेत. निवडणूक संपताच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी यासाठी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.
 
कमी वेळात जास्त पाऊस पडल्यावर पाणी साठत असल्यानं अनेकदा त्रास होत असल्याची कबुलीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अधिकाऱ्यांना उपाययोजनाही सुचवण्यात आल्या.
 
आंबील ओढ्याला पूर आला तेव्हा पुणे शहरातले नदी नाले प्रवाह याच्या पाहण्या करण्याच्या घोषणा झाल्या. हानी झाली आणि उपाययोजनाही आखण्यात आल्या. त्यानंतर आंबील ओढ्याचं खोलीकरण, भिंती बांधंणं असे प्रकार झाले. पण शहराच्या इतर भागात मात्र काहीच फरक दिसत नाही.
 
अगदी काही वर्षांपूर्वीच पुणे शहर मोस्ट लिव्हेबल सिटीच्या यादीत आलं होतं. मात्र आता हे शहर तुंबत चाललं आहे. अगदी पंधरा मिनिटं ते अर्धा तास कोसळणाऱ्या पावसानंही ते तुंबल्याचं दिसत आहे.
 
Published By- Priya Dixit