अनिल अवचट यांचं निधन
ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन झालंय. ते 74 वर्षांचे होते. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
सामाजिक प्रश्नांसोबतच अनिल अवचट यांनी विविध विषयांवर लेखन केलं. 'रिपोर्ताज' हा दीर्घ लेखन प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. लेखनासोबतच चित्रकला आणि ओरिगामीचीही त्यांना आवड होती.
अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. आज मुक्तांगण व्यसनमुक्तीसोबतच अनेक क्षेत्रांत कार्य करत आहे. अनिल अवचट यांची मुलगी डॉ. मुक्ता पुणतांबेकर आता मुक्तांगणचं काम पाहतात.
आनंदाची व्याख्या सांगताना अनिल अवचट यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलं होतं, "माझी आई पहाटे उठून सडा घालायची, घरासमोरचा रस्ता झाडायची आणि मग दररोज वेगवेगळी रांगोळी काढायची. ते बघायला आणि कौतुक करायलाही कुणी नव्हतं. मग ती रांगोळी पुसली जायची. त्याची तिला काही खंत नव्हती.
"तिच्यापासून मी एक शिकलो की, एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद. बाकी आनंद काही आपल्या हातात नाहीये. कुणीतरी कौतुक केलं पाहिजे, असं काहीही नाही. माझ्यासाठी प्रोसेसमधला आनंद हे महत्त्वाचं आणि तो मला माझ्या आईने शिकवला."