रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (15:18 IST)

ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन

Veteran singer and actress Kirti Shiledar passes awayज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन Marathi Pune News  In Webdunia Marathi
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज(शनिवार) पहाटे निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

२०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी फार मोठं योगदान दिलं.

संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार  काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.
 
शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
 
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.